shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हालाखीचे जीवन काढून आयपीएल पर्यंत पोहोचणारे खेळाडू..!!



                           
इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएल ही जगातील सर्वात मोठी खाजगी लिग आहे. या स्पर्धेची लोकप्रियताही जगातील इतर कोणत्याही लिग पेक्षा अफाट आहे. या स्पर्धेत खेळण्याचे जगभरातील खेळाडूंचे स्वप्न असते. त्यातील अनेकांचे ते स्वप्न सत्यात उतरले तर काहींचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहीले. बरेचसे क्रिकेटपटू असे आहेत की जे सधन कुटुंबातून येतात तर काही असे क्रिकेटपटू आहेत जे अतिशय बिकट परिस्थितीतून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आयपीएल पर्यंत पोहोचले आहेत.
    
                   
गेल्या वर्षभरापासून जगभर कोरोना व्हायरसचा प्रभाव आहे. तरी या महाभयानक परिस्थितीवर मात करुन आयपीएलने सन २०२० चे आयोजन भारताबाहेर यशस्वीपणे पार पाडले. तसेच सन २०२१ च्या आयपीएल सत्रासाठी सहभागी संघात निवड करण्यासाठी नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रीस मॅरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याने यंदाच्या १४ व्या सत्राच्या लिलावात १६.२५ कोटी भारतीय रुपये इतके मोल मिळविले. राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या चमूत घेतले. यापूर्वी सन २०१५ मध्ये तत्कालिन दिल्ली डेअर डेव्हील्सने युवराज सिंगला १६ कोटी रूपयांत खरेदी केले होते. भारताचा विराट कोहली सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार असून आजवरच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक रक्कम १७ कोटीला तो विकला गेला होता.
                            
तामिळनाडूचा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू शाहरूख खानला पंजाब किंग्जने ५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. शाहरूखची पायाभूत किंमत अवघी वीस लाख रुपये होती. त्याच्या अनेक पट किंमत त्याला लिलावात मिळाली. शाहरूख अजून कोणत्याही प्रकारचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसून त्याच्या खात्यात आतापर्यंत फक्त पाच प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असून त्यामध्ये सर्वोच्च नाबाद ९२ धावांसह दोन अर्धशतकीय खेळ्या केल्या आहेत. मात्र नुकत्याच संपलेल्या मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत त्याच्या तामीळनाडू संघाने विजेतेपद मिळविले. त्यामध्ये तळाला फलंदाजी करताना त्याने अतिशय आक्रमक खेळ केला होता. त्यामुळे यंदाच्या लिलावात त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच संघात चढाओढ होती. विशेष म्हणजे मागच्या वर्षी झालेल्या लिलावात कोणीही ढुंकून देखील बघीतले नव्हतेे. हाच शाहरूख खान अतिशय गरीब परिस्थितीतून वर आला आहे.
                           
राजस्थान रॉयल्सने यंदाच्या लिलावात २२ वर्षीय वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याला १ कोटी २ लाखांना विकत घेतले. चेतनची पायाभूत किमंत फक्त २० लाख रुपये होती. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातून आलेल्या चेतनच्या कुटुंबीयांना अतिशय बिकट आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागत होते. मागच्या वर्षापर्यंत तर त्याच्या घरी साधा टिव्हीही नव्हता. त्याच्या घरचे लोक त्याची टिव्हीवरील मॅच बघायला शेजाऱ्यांच्या घरी जायचे. एमआरएफ पेस फौंडेशनमध्ये ग्लेन मॅकग्राथच्या मार्गदर्शना खाली शिकलेल्या चेतनने कुचबिहार करंडक स्पर्धेत लक्ष वेधक कामगिरी केल्याने यंदा त्याची आयपीएल लॉटरी लागली.
                               
या दोघांप्रमाणेच गरीबीचे जीवन जगलेला केरळचा मोहम्मद अझहरुद्दीन यंदा मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई विरुद्ध केलेल्या ३७ चेंडूतील झंझावाती शतकामुळे प्रकाशझोतात आला. त्या शानदार खेळीचा लाभ त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू संघात स्थान मिळून झाला. आरसीबीने त्याला त्याच्या पायाभूत २० लाख रुपये इतक्या किंमतीत आपल्या ताफ्यात ओढले.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close