राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठक संपन्न..!!
नागरिकांनी गाफील न राहता शासनाच्या आदेशांचे पालन करावे : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
- इंदापूर येथील कोरोना आढावाच्या पहिल्या बैठकीत सूचना.
इंदापूर : प्रतिनिधी
सध्या तालुक्यात ग्रामीण भागातील भिगवण, पळसदेव तसेच व शहरातील आंबेडकरनगर च्या परिसरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त असून हा परिसर हॉटस्पाॅट बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गाफिल न राहता शासनाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरवासियांना केले.
इंदापूर शहरासह तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२७) रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट तसेच सर्व विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना संपला आहे असे न वागता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे,आदेशांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. सध्या ग्रामीण भागातील भिगवण, पळसदेव या भागात कोरोनाची रुग्णसंख्या ७६ आहे. तसेच शहरातील आंबेडकरनगर भागांमध्ये रुग्णसंख्या ही ३८ असून हा भाग कोरोनाचा हॉटस्पाॅट बनत चालला असल्याचे आ. भरणे यांनी यावेळी सांगितले.
तालुक्यातील हॉटस्पाॅट परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. भिगवण येथील नागरिकांचा सर्वे पूर्ण झाला आहे. शहरातील नागरिकांचाही सर्व्हे करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी वर्गाला आ. भरणे यांनी यावेळी दिल्या.
ते पुढे म्हणाले, सध्या शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. मात्र अभ्यासिका, वाचनालये यांना मुभा देण्यात आली आहे. नागरिकांनी आठवडे बाजार, मंडई याठिकाणी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. नागरिकांवर शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असून जे नागरिक आदेशांचे, नियमांचे पालन करणार नाहीत अश्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागाला दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, इंदापूर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी आढावा घेवून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हॉटस्पॉट असलेल्या भागातील,ज्या ठिकाणी पाच पेक्षा कमी रुग्णसंख्या आहे त्या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपास मोहीम हाती घेण्यात येत आली असून शासनाच्या कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, आपणा सर्वांना कोरोना मृत्यू दर कसा कमी होईल याकरिता लक्ष देणे गरजेचे आहे.शहरातील आंबेडकरनगर परिसरात ५० लोकसंख्येच्या मागे एक टीम तयार करुन या परिसरात नागरिकांची तपासणी कराव्यात. पूर्वी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, कोरोना सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र ठिकाणचे मनुष्यबळ कमी करण्यात आले होते. तेथे मनुष्यबळ वाढविण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अश्या आयोजित कार्यक्रमांवर अधिकारी वर्गांनी लक्ष ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

