shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नामदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज या राष्ट्रीय संतांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्यात यावी...!

खेड ।  विद्याधर साळवे :
दिनांक :- १५-०२-२०२१
सन २०२१ मध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जयंतीदिन हा मंत्रालयात व शासकीय , निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य नामदेव शिंपी समाज युवक संघाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सन २०२१ मध्ये मंत्रालय व शासकीय , निमशासकीय कार्यालयात राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात दिनांक १५ डिसेंबर २०२० रोजी परिपत्रक निर्गमित केल्या होते. सदर चे परिपत्रक अधिक्रमित करून दिनांक १४ जानेवारी २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाने पुन्हा परिपत्रक निर्गमित केलेले आहे. सदर दोन्ही परिपत्रकांमध्ये श्री संत नामदेव महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव समाविष्ट नसल्यामुळे
महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव वारकरी, फडकरी संप्रदायातील लाखो लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

सन २०२१ हे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे ७५१ वी जयंती वर्ष असून श्री विश्व संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्म पंजाब, गुजरात, राजस्थान मध्ये पोहोचवला तसेच सन २०२१ हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७२५ वे समाधी वर्ष आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी लहानपणात आई-वडिलांचे छत्र नसताना समाजाने केलेला छळ सोसून आपल्या भावंडांसह केलेले सामाजिक कार्य बहुमोल आहे.

भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

आज अनुकूल परिस्थिती असताना साधू संताच्या महाराष्ट्रात सरकारला संताच्या कार्याचा विसर पडला आहे का? असा प्रश्न खेड तालुका नामदेव शिंपी समाज अध्यक्ष किशोर कुमठेकर यांनी बोलून दाखविला. 

शासन स्तरावर नामदेव महाराज यांचे ७५१ वी जयंती वर्ष विविध उपक्रमाने साजरे करण्यात यावे तसेच वरील संदर्भीय परिपत्रके अधिक्रमित करून नवीन परिपत्रकात श्री संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज या राष्ट्रीय संतांची जयंती दिनाचा समावेश करून सन २०२१ मध्ये मंत्रालयात सर्व शासकीय , कार्यालयात साजरे करण्या बाबत शासनस्तरावर निर्गमित करण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे पुणे जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.

अशा मागणीचे लेखी निवेदन निवासी पुणे उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी नामदेव शिंपी समाज युवक संघ अध्यक्ष सिद्धेश हिरवे, खेड तालुका शिंपी समाज अध्यक्ष किशोर कुमठेकर ॲड. सागर मांढरे, सुशांत नामदास, सुनील गुजर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
close