भारताने चेन्नई येथे झालेला दुसरा क्रिकेट सामना इंग्लंडला आरामात हारवून जिंकला. मागच्या आठवडयात चेन्नईच्या याच एम.ए. स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा २१७ धावांनी पराभव केला होता. त्या पहिल्या कसोटीपूर्वी १५ दिवस अगोदरच ऑस्ट्रेलियात तेथील भक्कम संघाला भारताच्या दुय्यम, तिय्यम दर्जाच्या संघाने पराभूत केल्याने भारताकडून इंग्लंडला लिलया हरविण्याच्या अपेक्षा होत्या. मात्र भारताने त्या सामन्यात संघ निवडीपासून खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात गलथान खेळ केल्याने भारताला इंग्लंडकडून मायदेशातील सर्वात मोठा पराभव स्विकारावा लागला.
पहिल्या सामन्यासाठी लाल मातीची टणक पाटा खेळपट्टी वापरण्यात आली. त्या खेळपट्टीवर इंग्लंडने पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर रचल्यावर भारताला ३३७ धावात गुंडाळले त्यानंतर इंग्लंडने भारताला फॉलोऑन न देता स्वतः खेळणे पसंत केले. मात्र दुसऱ्या डावात खेळपट्टीने आपले दाखविताच इंग्लंड फलंदाजांचीही गाळण उडाली होती. भारताने इंग्लंडला त्या डावात १७८ धावात गुंडाळले असले तरी पहिल्या डावातील २४१ धावांच्या अधिक्यामुळे भारताला विजयासाठी ४२० धावांचं लक्ष्य मिळालं. मात्र भारताचा डाव १९२ धावांत आटोपल्याने इंग्लंडला भारतातील सर्वात मोठा विजय मिळाला.
वास्तविक त्या सामन्यातील खेळपट्टी इंग्लंडला पहिला डाव वगळता फलंदाजांना त्रासदायकच होती. मायदेशातही भारताला खराब खेळपट्टीवर खेळावे लागले. तरीही भारतीय संघाने अथवा भारतातील क्रिकेट पंडित, माजी खेळाडू यांनी एक चकार शब्दही काढला नाही.
पहिल्या कसोटी नंतर अवघ्या तीन दिवसात दुसरी कसोटी त्याच एम.एचिदंबरम स्टेडीयममध्ये वेगळ्या खेळपट्टीवर खेळविण्यात आली. या सामन्यात भारतीय संघाने मागील चुका टाळत पहिल्या कसोटीत न खेळलेल्या कुलदिप यादव, अक्षर पटेल व मोहम्मद सिराजला खेळविले. अपेक्षेप्रमाणे नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला खरा पण भारताचे तीन गडी ९० च्या आत परतले. त्यामध्ये गिल व कोहली शुन्यावर परतले. त्यानंतर रोहीत शर्मा व उपकर्णधार अजिंक्य राहणे यांच्यात १६२ धावांची सामन्याला निर्णायक वळण देणारी भागीदारी झाली. रोहीतने धडाकेबाज १६१ कुटल्या तर अजिंक्य राहाणेने बहुमूल्य ६७ धावा जोडल्या. रोहीत इतकेच मोल राहाणेच्या खेळीलाही होते. परंतु रोहीतची खेळी मोठी असल्याने राहाणेचा डाव झाकोळला गेला. भारताचा डाव ३२९ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडचा डावही मात्र १३४ धावात संपला.
इंग्लंड संघ मामुली धावात गुंडाळला गेला. त्यातील ७ बळी फिरकी गोलंदाजांनी मिळविले. वास्तविक भारताच्या फलंदाजांनाही खेळपट्टीवर खूप त्रास झाला. तरी त्यांनी जिद्द व जबाबदारीने खेळत आपले कर्तव्य बजावले. इंग्लंडच्या डावात भारताच्या फिरकी गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपुर फायदा उठविला. मात्र हिच बाब माजी इंग्लिश खेळाडू, पिटरसन, मायकेल वॉन यांच्या काळजाला चटका देऊन गेली. या दोघांबरोबर इंग्लिश प्रसार माध्यमांनीही पराचा कावळा करून खेळपट्टीला व्हिलन बनविण्याचा प्रयत्न केला.
भारताचा दुसरा डावही इंग्लिश फिरकी माऱ्यासमोर ६ बाद ११६ असा गडगडला. त्यानंतर कर्णधार कोहली ६२ व फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्वीन १०६ यांच्या खेळानंतर भारताचा डाव २८६ धावांपर्यंत पोहोचला. शिवाय तळाच्या इशांत शर्मा व मोहम्मद सिराजने आश्वीनसह फिरकी घेणाऱ्या खेळपट्टीवर धैर्याने खेळ करून खेळपट्टीत विशेष असे काहीच भितीदायक नसल्याचे दाखवून दिले. त्यानंतर इंग्लिश टिकाकार काही अंशी शांत झाले.
भारताने नंतर इंग्लंडला ४८२ धावांचा पाठलाग करताना १६४ धावात गुंडाळून इंग्लंडवर ३१७ धावांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळविला. भारताकडून सर्व १० बळी फिरकी गोलंदाजांनी मिळविल्यानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधारांनी नक्राश्रू गाळण्यास पुन्हा सुरूवात होती. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने तर कहरच केला. त्याने भारतीय संघाचे विजयानंतर अभिनंदन केले. परंतु त्यात इंग्लंडच्या ब संघावरील विजय असा उल्लेख केला. वास्तविक इंग्लंडचा अंतिम संघ त्यांच्या व्यवस्थापनाने निवडला. त्यात कोणाला खेळवायचे हा त्यांचा प्रश्न होता. त्यात भारतीय संघाचा काही एक संबंध नसताना भारताच्या विजयाला अपघात दाखविण्याचा इंग्लंडचा पोरकटपणा पुन्हा एकदा जगासमोर आला.
भारताने मिळविलेला विजय सांघिक असला तरी त्याचे श्रेय आश्विन, रोहीत, कोहली, अक्षर, पंत यांना दिले परंतु अजिंक्य राहाणे ने पहिल्या डावात रोहीतसह १६२ धावांची भागीदारी केली नसती तर कदाचित आजचा विजय दिसलाही नसता. तसेच कोहलीच्या गैरहजेरीत राहाणेने ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या विजयालाली पाहीजे तितके श्रेय मिळाले नाही. प्रसिद्धी माध्यमांनी राहणेला त्याच्या कामाची पावती न देणे हे जरा जास्तच संकुचितपणाचे वाटते.
शिवाय या सामन्यात अनेक दिवसानंतर खेळणाऱ्या कुलदिप यादवला सापत्न वागणूक दिली जात असल्याचे जाणवले.
बरे असो. अखेर विजयाने मालिका बरोबरीवर आली असली तरी पुढील दोन सामने दोन्ही संघासाठी जीवनमरणाचे आहेत. त्यामुळे क्रिकेटरसिकांना चांगल्या खेळाची मेजवानी मिळणार एवढे मात्र नक्की !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

