अतिवृष्टीतील १७००० नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई त्वरित त्यांच्या खात्यात वर्ग करावी- इंदापूर तहसीलदार यांच्याकडे काँग्रेसची मागणी..!!
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या १७००० नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई त्वरित खात्यात वर्ग करावी अशी इंदापूर तालुक्यातील काँग्रेसची मागणी असल्याचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी म्हटले आहे.
इंदापूर तालुक्याला फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला होता . सरकारने मदत घोषित केली व ती दिली ही, पण इंदापूर तालुक्यात अजून १७००० लोक मदत मिळण्या पासून वंचित आहेत . हाच मुदा घेत आज इंदापूर तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळाने इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे यांची भेट घेतली.
यावेळी इंदापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की , संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी आहे की, इंदापूर तालुक्यात एकूण अंदाजे ३४००० लोकांना शासनाची मदत आलेली आहे. त्या मध्ये १७००० नुकसानग्रस्तांना दिवाळीत साधारण ९ कोटी मदत खात्यावर जमा झाली आहे . नंतरच्या दुसऱ्या टप्यात जानेवारी महिन्यात ९ कोटीची मदत आली आहे. पण काही त्रुटी मुळे ती अद्याप नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा झाली नाही . ह्यात एकूण ५६ गावांचा व जवळपास १७००० लोकांचा समावेश आहे .
तहसीलदार व संबंधीत अधिकारी यांच्याशी समक्ष चर्चा झाल्यानंतर येणाऱ्या १५ दिवसात सर्व पैसे नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा होतील असेही ते म्हणाले .
या वेळी तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत सह कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर , जिल्हा सरचिटणीस जकिरभाई काझी, शहर अध्यक्ष चमन भाई बागवान, भगवान पासगे, निवास शेळके, प्रदीप शिंदे , राहुल वीर , महादेव लोखंडे, युवक जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास पाटील , मिलिंद साबळे , डॉ संतोष होगले , विकास बनकर आदी उपस्तिथ होते.

