श्रीरामपूर(प्रतिनिधी)- तालुक्यामध्ये नुकताच गोदावरी नदीपात्रातील मातुलठाण ता.श्रीरामपूर या गावी वाळूचा ठेका लिलावाद्वारे देण्यात आलेला आहे . संबंधीत ठेकेदाराने योग्य ती रक्कम भरुन सदरील ठेका ताब्यात घेवून ठेका सुरु देखील केलेला आहे.
मात्र सदर ठेकेदाराने नदीपात्रामध्ये ५ जेसीबी, ४ पोकलेन आदी मशिनच्या सहाय्याने नदी पात्रातील वाळूचे उत्खनन सुरु केलेले आहे . शासन निर्णयामध्ये दर्शविल्याप्रमाणे नदीपात्रात यंत्रसामुग्रीने वाळू उचलू नये असे असताना देखील अयोग्य आणि बेकायदेशिररित्या एका दिवसात जवळपास ३०० ते ३५० वाहने या यंत्राच्या सहाय्याने वाळू नदीपात्रातून बाहेर काढून सदर ट्रकमध्ये (हवा) भरण्याचे काम जोमात सुरु झालेले आहे.
सुर्योदय आणि सूर्यास्त या कालावधीमध्येच वाळू उत्खनन करुन तीची वाहतुक नियमाप्रमाणे केली जाते. मात्र सदरचा नियम अक्षरशः पायदळी तुडवून बिनधास्तपणे दिवसातर सोडाच चक्क रात्रभर देखील या ठिकाणाहून मोठमोठया वाहनांमध्ये वाळू भरून तिची राजरोसपणे वाहतुक केली जात आहे,. या सर्व गैरप्रकारांमध्ये स्थानिक महसूल अधिकार्यांचा छुपा आशिर्वाद असल्याचा आम्हास दाट संशय निर्माण झालेला असून याची वरीष्ठ पातळीवरुन तात्काळ सखोल चौकशी होणे गरजेचे बनले आहे.
कारण संबंधीत अधिकार्यांसमोर अयोग्य आणि बेकायदेशिररित्या नियमापेक्षा जास्त वाळूचा उपसा करुन रात्रंदिवस वाळूची वाहतूक केली जात असताना त्यांनी कोणतीच कारवाई न करता केवळ गप्प बसावे याचाच अर्थ असा की पाणी कुठे तरी मुरते,याकरीता सदरील प्रकरणी स्वतंत्र अधिकारी नेमून त्वरीत चौकशी करुन आजपर्यंत झालेले उत्खनन, खड्डयाचा पंचनामा करून संबंधीत ठेकेदार त्याचबरोबर दिवसा व रात्रभर वाळू वाहतूक करणा-या ट्रक् चालकांविरुध्द सरकारी मालमत्ता (नैसर्गिक संपत्ती) चोरीचे गुन्हे दाखल करुन तसेच ओव्हरलोड वाहतुकीबाबत संबंधीत आर.टी. ओ. अधिका-यांना त्वरीत कारवाईचे आदेश द्यावेत व संबधीत ठेकेदाराविरुद्ध दंडात्मक कारवाई करून सदरचा लिलाव जोपर्यंत पूर्णपणे मोजमाप होत नाही तोपर्यंत त्वरीत बंद करण्यात यावा व सरकारी गौणखनिजाची चोरी तथा मोठया प्रमाणात उत्खनन होवू नये याची योग्यती खबरदारी घेण्यात यावी अशा अशयाचे निवेदन जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएब जमादार यांच्याकडून मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांना देण्यात आले आहे.
सदरील निवेदनावर जे जे फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार,फिरोज पठाण,तौफिक शेख, मोसीन कुरैशी, नरेंद्र लोंढे, सुलतान पठाण, आदींच्या सह्या आहेत.

