shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चौथ्या कसोटीची खेळपट्टी कशी असेल ?


मागच्याच आठवडयात जगातील सर्वात मोठे स्टेडीयम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत व इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या पावणेदोन दिवसात संपला होता. डे नाईट झालेला तो सामना पारंपारीक लाल चेंडू ऐवजी गुलाबी चेंडूने खेळविला गेला. त्या सामन्यात इंग्लंडचे दोनही डाव ११२ व ८१ असे मिळून फक्त १९३ धावांत संपुष्टात आले होते. तर भारताचा पहिला डाव सुध्दा १४५ धावांत आटोपला होता. तरीही या सामन्यात भारताला दहा गडी राखून विजय मिळाला होता. परंतु सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या समर्थक मंडळीनी खेळपट्टीला दोषी ठरविले होते.

पाच दिवस चालणारा कसोटी सामना पावणेदोन दिवसात संपल्याने खेळपट्टीच्या दर्जा विषयी जगभर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. प्रत्यक्षात इंग्लिश संघाने खेळपट्टी संदर्भात कुठलीही अधिकृत तक्रार आयसीसीकडे केली नसल्याने मोटेरा स्थित या मैदानावर कुठलीही कारवाई होण्याची शक्यता नाही.

या सर्व गोंधळात सदर मालिकेतील चौथा कसोटी सामनाही याच मैदानावर होणार असल्याने बीसीसीआय या सामन्यासाठी वाद टाळण्यासाठी त्या खेळपट्टीपेक्षा जरा वेगळी खेळपट्टी देण्याची शक्यता आहे. साधारणत: या खेळपट्टीवर फलंदाजांना अनुकूल अशी परिस्थिती राहील व सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाजांनाही मदत करेल व चौथ्या - पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजही या खेळपट्टीचा लाभ उठवू शकतात.  खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही खेळपट्टी सपाट असणार असून खेळपट्टीवर चेंडू समतोल राहू शकेल व फलंदाज आपला धावांचा दुष्काळ थांबवू शकतील.

अहमदाबादचे हे स्टेडीयम नवीन असून यावर प्रथमच कसोटी सामने खेळले जात आहेत. शिवाय येत्या काही दिवसात येथे आयपीएल व टि-२० विश्ववचषकाचे सामने खेळायचे असल्यामुळे बीसीसीआय व भारतीय संघ प्रबंधन पुन्हा एकदा आखाडा खेळपट्टी देण्याची शक्यता कमी आहे. जर भारताने पुन्हा एकदा पहिल्या सारखीच खेळपट्टी दिली तर आयसीसीकडून सदर मैदानावर कारवाई देखील केली जाऊ शकते.

डे नाईट कसोटीत गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जातो. त्यावर लाल चेंडूच्या तुलनेत रंगाचा एक लेप जास्त लावल्यामुळे त्याला चकाकी मिळते व तो खेळपट्टीवर पडल्यानंतर झपकन निघायचा. त्यामुळे ३० पैकी २१ फलंदाज सरळ येणाऱ्या चेंडूवर बाद झाले होते. वास्तविक खेळपट्टीत कुठलाही दोष नव्हता. जर हा सामना लाल चेंडूने खेळला असता तर अशी परिस्थिती दिसली नसती व वाद वाढायला मुद्दा मिळाला नसता. परंतु डे नाईट सामन्यात गुलाबी चेंडूवरच खेळणे बंधनकारक आहे.


बीसीसीआयने या प्रकारच्या खेळपट्टया बनविण्यापूर्वी अनेकदा विचार करायची गरज आहे. इंग्लंडचा संघ मजबूत फिरकी गोलंदाजांसह खेळत नव्हता अन्यथा हा डाव भारतावर देखील उलटू शकला असता. ते आपण भारताच्या पहिल्या डावात बघितले आहेच.

या मालिकेतील ३ सामन्यानंतर भारत २ -१ असा आघाडीवर असून येत्या १८ ते २२ जून दरम्यान लॉर्डस येथे होऊ घातलेल्या कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामना खेळण्यास पात्र होण्यास भारताला इंग्लंडविरूध्दचा चौथा कसोटी सामना जिंकणे किंवा अनिर्णित राखणे गरजेचे आहे. सध्याचा भारतीय संघाचा फॉर्म व इंग्लंडची पराभूत मानसिकता बघता भारताने खेळपट्टी बाबत विशेष असे काहीच वेगळे करण्याची गरज नाही.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close