मागील जवळ जवळ दोन महिन्यांपासून भारताच्या लांबलचक दौऱ्यावर असलेला इंग्लिश क्रिकेट संघ सध्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात असून येत्या २३ मार्च पासून पुणे येथील गहुंजे स्थित महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर तीन वनडे सामने असलेल्या मालिकेला सुरुवात होणार असून तीनही सामने तेथेच खेळले जाणार आहेत.
यापूर्वी झालेल्या कसोटी व टि २० मालिका भारताने अनुक्रमे ३-१ व ३-२ अश्या खिश्यात घातल्या आहेत. या वनडे मालिकेपूर्वी इंग्लंडचा क्रिकेट संघ आयसीसीच्या वनडे मानांकनात सध्या अव्वल स्थानावर आहे. परंतु सदर मालिकेत भारताचेच पारडे जड असण्याची शक्यता अधिक आहे.
आयसीसीच्या वनडे मानांकनात भारत इंग्लंड पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर असून हे दोन संघ निव्वळ कागदावरच नव्हे तर मैदानातही तुल्यबळ सिध्द झाले असले तरी यापूर्वी भारताने इंग्लंडवर अनेक दिमाखदार विजय मिळविले आहे. आज आपण भारताने इंग्लंडवर वनडे सामन्यात मिळविलेल्या मोठया विजयी कामगिरीवर प्रकाशझोत टाकणार आहोत.
भारताने इंग्लंडवरील सर्वात मोठा विजय सन २००८ मध्ये मिळविला. त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ३८७ धावा बनविल्या परंतु प्रत्युत्तरा इंग्लंडला केवळ २३९ धावा बनविता आल्या.परिणामत: भारत १५८ धावांनी विजयी झाले.
त्यानंतर सन २०१४मध्ये झालेल्या सामन्यात भारताने ३०४ धावा फटकविल्यानंतर इंग्लंड १६४ धावाच करू शकले. अशा रितीने भारताने इंग्लंडवरील आपला दुसरा मोठा विजय १३३ धावांनी मिळविला.
सन २०१३ मध्ये भारताने इंग्लंडवर धावांनी मिळविलेला आपला तिसरा मोठा विजय नोंदविला. भारताच्या २८५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सर्व गडी १५८ धावांत बाद झाल्याने भारताला १२७ धावांनी विजय मिळविला.
भारताने इंग्लंडवरील आपला सर्वात मोठा चौथा विजय सन २०११ मध्ये मिळविला. त्यामन्यात भारताच्या ३०० धावांपुढे इंग्लंड केवळ १७४ धावात गुंडाळले गेले. त्यामुळे भारत १२६ धावांनी विजयी झाले.
तर सन २०११ मध्येच भारताला इंग्लंडवरील आपला सर्वात मोठा पाचवा विजय मिळाला. भारताने त्या सामन्यात २७१ धावा केल्या नंतर इंग्लिश संघाला केवळ १७६ धावाचकाढता आल्या. त्यामुळे भारत ९५ धावांनी विजयी झाले. विशेष म्हणजे भारताचे इंग्लंडवरील हे पाचही मोठे विजय महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातच मिळाले आहेत.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

