shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पहिल्या टि-२० सामन्यासाठी असा असू शकेल भारताचा अंतिम संघ.., !



                        भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टि२० सामन्यांची मालिका १२ मार्चपासून अहमदाबाद मध्येच खेळवली जाणार असून आगामी टि २० वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने या मालिकेकडे दोन्ही संघ बघत आहेत. या मालिकेसाठी १९ जणांचा भारतीय चमू सञ्ज आहे. परंतु पहिल्या सामन्यासाठी यातील १६ खेळाडू आपला दावा सांगत असल्याने संघ व्यवस्थापनाापुढे अंतिम संघ निवडण्याचा मोठा पेच उभा राहीला आहे. खेळाच्या प्रत्येक क्षेत्र व जागेसाठी भारतीय संघात प्रचंड स्पर्धा आहे. तर त्या तुलनेत पाहुण्या इंग्लिश संघाची डोकेदुखी कमी आहे. चा पार्श्वभूमिवर भारताचा अंतिम अकरा खेळाडूंचा संघ कसा असू शकतो. यावर एक प्रकाशझोत टाकूया.

सफेद चेंडूच्या खेळातील भारताचा उपकर्णधार रोहीत शर्मा टि-२० तील एक प्रतिभावान खेळाडू असून त्याचा सध्याचा फॉर्मही उत्तम असून सलामीवीराची एक जागा त्याने पक्की केली आहे. टि-२० मध्ये सर्वाधिक चार शतके त्याच्याच नावावर आहे.

सलामीवीराच्या दुसऱ्या जागेसाठी डावखुरा शिखर धवन व के.एल. राहुल यांच्यात चुरस असून दोघेही फॉर्ममध्ये आहे. धवन डावखुरा असून रोहीतसह त्याने अनेकदा भारताला चांगली सुरूवात दिली असल्याने डावा उजवा असा समन्वय साधून प्रतिस्पर्धी गोलंदाजांची लय बिघडविण्यासाठी रोहीतसह धवनला पसंती दिली जाऊ शकते.

भारताचं कर्णधारपद असलेला विराट कोहलीचे संघातील स्थान पक्के असून त्याचा तिसरा क्रमांकही अबाधीत असणार आहे.मागील काही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या श्रेयस अय्यरची कामगिरी चांगली असून विजय हजारे ट्रॉफीतही त्याने चांगला फॉर्म दाखविला आहे. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची मोठी शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएल व देशांतर्गत स्पर्धात सर्वांची झोप उडविणारी कामगिरी करणारा मुंबईचा सुर्यकुमार यादव यंदाही चांगलाच जोमात असल्याने त्याला संघात संधी मिळू शकते. त्याच्या जवळ परिस्थितीला धरून कामगिरी करण्याची कला असल्याने निर्णायक मत त्याच्या पारडयात पडू शकतं.

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या तोडफोड फलंदाजीसाठी प्रसिद्ध असून ऑस्ट्रेेलियात झालेल्या टि-२० मालिकेत मालिकावीर ठरला होता. त्यानंतर तो प्रथमच मैदानावर उतरणार आहे. गोलंदाजी ही त्याची जमेची बाब असल्याने पहिल्या सामन्यात त्याचे स्थान पक्के समजले जाते.

मागील काही सामन्यात सफेद चेंडूच्या खेळात भारताच्या अंतिम संघात स्थान मिळवू न शकलेला रिषभ पंत ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरूध्द कसोटीत शानदार खेळ करून पुन्हा एकदा टि २० संघात परतल्याने तोच भारताचा यष्टीरक्षक असणार हे निश्चित आहे. त्यामुळे के. एल राहुल पुढे संघातील स्थान टिकविण्याचे मोठे आव्हान बनले आहे. के.एल राहुल रिषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षण करत होता.

वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर फलंदाजीतही उठावदार खेळ करत असल्याने त्याला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात टि-२० व कसोटी सामन्यात त्याचा खेळ लाजवाब झाला होता. शिवाय मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीत त्याने बॅट व बॉलने कमाल करणारी कामगीरी केली आहे.

अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर यांच्यात स्पीन ऑलराऊंडर या जागेसाठी मोठी स्पर्धा आहे. सुंदरने ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरूध्द स्वतःला सिध्द केले आहे. तर अक्षर पटेल इंग्लंडविरुद्ध चांगलाच चमकला आहे. टि २० मध्ये दोघांनाही चांगला अनुभव आहे. परंतु या एका जागेसाठी वॉशिंग्टन सुंदर बाजी मारण्याची शक्यता आहे.

भारताच्या संघातला सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज असलेला यजुवेंद्र चहल कोणत्याही परिस्थितीत व खेळपट्टीवर चांगली कामगिरी करण्याची क्षमता बाळगून असल्याने त्याचे संघातील स्थान पक्के आहे.अचूक टप्पा व दिशा सांभाळून डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर बरोबरच स्वींग गोलंदाजीची अदभूत कला अवगत असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतला आहे. मोहम्मद शमी व जसप्रित बुमराहाच्या गैरहजेरीत तो संघाचे वेगवान आक्रमण सांभाळू शकतो.

प्रत्यक्ष सामन्यात प्रशिक्षक व कर्णधार वातावरण, खेळपट्टी व इतर बाबींचा विचार करून अंतिम संघ निवडण्याचा हक्क बाळगून असल्याने नाणेफेकीच्या वेळी अकरा जणांचा शेवटचा संघ आपल्याला कळेल.
 लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close