shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीयांची जिगरबाज कामगिरी तर इंग्लंडची हाराकीरी..!!



                   भारताच्या दौऱ्यावर असलेला इंग्लंड संघ या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात जसा भक्कम वाटला तसा मजबूतपणा नंतरच्या तीन कसोटयात वाटला नाही. त्यानंतरच्या टि २० मालिकेतील पहिला व तिसरा सामना जिंकल्या नंतर सफेद चेंडूच्या खेळातील हा अव्वल क्रमांकाचा संघ पुन्हा एकदा आपली लय हरवून बसला. कसोटी पाठोपाठ टि २० मालिकाही त्यांनी गमावली. वनडेचे विद्यमान विश्वविजेते असलेल्या इंग्लंडकडून एकदिवसीय सामन्यात जोरदार प्रतिकाराचीच नव्हे तर विजयाचीच अपेक्षा होती. मात्र पुणे येथे सुरू झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडची हाराकिरीच जास्त दिसली तर यजमान भारताने बिकट परिस्थितीतही कधीही सामन्यावरचे नियंत्रण हटू दिले नाही. याचे फळ म्हणजे भारताला ६६ धावांचा मोठा विजय मिळाला.
                         डे नाईट सामन्यात शेवटच्या टप्प्यात मैदानात दव (डयू) पडत असल्याने चेंडू ओला होऊन जातो. त्यामुळे गोलंदाजांना गोलंदाजी करताना खूप त्रास होतो. तोही खास करून फिरकी गोलंदाजांना. चेंडू ओलसर झाल्यामुळे त्यावर ग्रीप मिळविणं फिरकीपटूंना अवघड जाते. त्यामुळे खास करून भारतात होणाऱ्या सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणं सर्वच संघ पसंत करतात. ही बाब लक्षात घेऊन इंग्लिश कर्णधार ओएन मॉर्गनने नाणेफेक जिंकताच कुठलाही विचार न करता भारताला फलंदाजीस निमंत्रण दिलं.
                          भारताने आपल्या संघात कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णाला पदार्पण करण्याची संधी दिली. तर यष्टीरक्षण रिषभ पंतला आराम देत फॉर्मात नसलेल्या लोकेश राहुलचं पुनर्वसन करण्यासाठी त्याला यष्टीरक्षक म्हणून संघात घेतलं. भारताचे सलामीवीर रोहीत शर्मा व शिखर धवनने धिमी परंतु आश्वासक सुरुवात करून देत मजबूत पाया भरला. रोहीत जखमी झाल्यामुळे त्याची लय बिघडली व बाद झाला. मात्र दुसरा सलामीवीर शिखर धवनने कर्णधार कोहलीसह शतकी भागीदारी केली परंतु स्वतःचं शतक पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला. कर्णधार कोहलीने आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक केले. परंतु या दोघां पाठोपाठ श्रेयस अय्यर व हार्दिक पांडया लगोलग बाद झाले तेंव्हा भारत २५० धावांचा टप्पाही गाठेल का ? अशी शंका निर्माण झाली. मात्र त्याच वेळेस पदार्पण करणाऱ्या कृणाल पांड्याने धुवाँधार खेळ करत २६ चेंडूत अर्धशतक ठोकून पदार्पणातच कमी चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विश्वविक्रम केला. कृणालचा रुद्रावतार बघून फॉर्मात नसलेल्या के एल राहुललाही हुरूप आला व त्यानेही ४३ चेंडूत वादळी ६२ धावा ठोकल्या. त्यामुळे भारताने ३१७ अशी भक्कम धावसंख्या रचली.
                         विश्वविजेत्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी अशी काही धडाकेबाज सुरुवात केली की भारताचे भुवनेश्वर सोडून सर्वच गोलंदाज त्यांनी फोडून काढले. ८९ चेंडूत १३५ धावा अशी मजबूत परिस्थिती असताना दुसऱ्या स्पेलसाठी आलेल्या  प्रसिद्ध कृष्णाने खतरनाक मारा करत इंग्लंडचे कंबरडेच मोडले. त्याने पदार्पणात चार बळी घेत भारताकडून पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज बनला. तर दुसऱ्या बाजूने शार्दूल ठाकूरने आपला गोल्डन हॅंड दाखवत ३ बळी मिळवून इंग्लंडच्या शिडातली हवाच काढली. शार्दूलने सलग तिसऱ्या सामन्यात एकाच षटकात दोन गडी बाद करण्याचा पराक्रम साधला. भुवनेश्वर पुन्हा एकदा किफायतशीर ठरला, त्यालाही दोन बळी मिळाले तर कृणाल पांडयाने एक बळी मिळवून आपले वनडेतील बळींचे खाते उघडले.
                       शानदार सुरूवातीनंतर इंग्लंडने मधल्या षटकात गडी बाद होत असताना कुठेही संयम दाखविला नाही. त्यांच्या प्रत्येक फलंदाजाने चेंडू मैदानाबाहेर पिटाळण्यातच धन्यता मानली. याची फार मोठी किंमत त्या प्रत्येक फलंदाजाला आपले बळी गमावून मोजावी लागली. त्यामुळे सोपा व सहज दिसणारा विजय त्यांच्या केवळ हाराकिरीमुळे पराभवात रूपांतरीत झाला. या दरम्यान भारतीय संघाने कुठलाही संयम न गमावता शांतपणे विजयाकडे कूच करत त्याची प्राप्तीही केली. इंग्लंडने जर पुढील सामन्यात हाच वेंधळेपणा चालू ठेवल्यास व्हाईटवॉश त्यांच्यासाठी दोन्ही हात पसरून उभा असेल. इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन व फलंदाज सॅम बिलिंग्ज जखमी झाल्याने त्यांच्या संकटात मोठी वाढ झाली आहे.
                          भारताच्या डावात फलंदाजी करताना रोहीत शर्मा जखमी झाला तर इंग्लंडची फलंदाजी चालू असताना आठव्या षटकात सिमारेषेवर चेंडू अडविताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो या मालिकेला मुकणार तर आहेच परंतु आगामी आयपीएललाही मुकण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहेच की तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close