आता केवळ भारत कसोटी विश्व अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यातच पोहोचले आहे. अजून तर तो सामना खेळून जिंकणे बाकी आहे. तरी भारत कसोटी मानांकनात अग्रक्रमांकावर पोहोचले आहे. नुकतीच भारत व इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका संपन्न झाली. भारताने मालिकेतील पहिला सामना हरल्यानंतर तमाम क्रिकेट तज्ञांना चक्रावून टाकणारी कामगिरी करत ३-१ असा विजय मिळविला. भारताने याच बरोबर पहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. भारताचा हा पराक्रम भारताला तमाम क्रिकेट खेळणाऱ्या देशांपेक्षा वेगळे बनवून गेला. आयसीसीद्वारे घेतल्या जात असलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे वनडे विश्वकप, टि-२० विश्वचषक, चँपियन्स ट्रॉफी व कसोटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला देश भारत बनला आहे. विशेष म्हणजे यापैकी भारताने खेळलेल्या आयसीसी स्पर्धेचे किमान एकदा तरी विजेतेपद देखील मिळविले आहे.
भारताने फार मोठया खडतर प्रयत्नानंतर अंतिम फेरी गाठली आहे. भारत कसोटी विश्व अजिंक्यपदाच्या स्पर्धेत फक्त न्यूझिलंडविरूध्दची मालिका हारले आहे. तर ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी नामुष्कीजन्यरित्या गमावल्यानंतर संघातील सर्व प्रमुख खेळाडूंच्या जखमी होणे, अथवा संघ सोडून जाणे यामुळे भारताचा संघ पुरता पंगू झाला होत्या. या स्थितीत अजिंक्य राहाणेच्या त्या भारताच्या आजवरच्या सर्वात दुबळ्या संघाने प्रबळ व मजबूत अशा ऑस्ट्रेलियाला तेथे जाऊन जोरदार चपराक दिली व इतिहास घडविला.
त्यानंतर भारतात आलेल्या इंग्लंडच्या संघाने पहिल्याच सामन्यात भारताला हरविल्याने भारताचा संघ काहीसा हवालदिल झाला होता. परंतु त्यानंतर भारताने जो पलटवार केला तो इतिहास अगदी ताजा आहे.
भारतात भारताला एखाद दुसऱ्या सामन्यात हरविणे सोपे आहे. परंतु कसोटी मालिकेत हरविणे किती मुश्किल असतं हे इंग्लंडला चांगलेच समजले असेल. भारतातील वातावरण उष्ण असतं त्यामुळे येथील खेळपट्टया येथील कडक उन्हामुळे लवकर फाटतात व त्या फाटलेल्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज आपले कौशल्य बेमालूमपणे सादर करतात. त्यासाठी परदेशी संघाने भारतात येण्यापूर्वी फिरकी गोलंदाजी खेळण्याचे कसब चांगल्या प्रकारे घोटून येण्याची गरज असते. शिवाय आपल्या ताफ्यात निष्णात फिरकी गोलंदाज आणणेही महत्वाचे आहे. जेणे करून ते भारताच्या फिरकी गोलंदाजी खेळण्यात पटाईत असलेल्या फलंदाजांनाही लगाम घालू शकतील.
भारत दौऱ्यावर आलेला इंग्लंडचा संघ या दोन्हीही बाबीत कंगाल होता. ना त्यांना भारतीय फिरकी मारा धड खेळता आला नाही वा भारतीय फलंदाजांना त्यांचे फिरकी गोलंदाज काबूत ठेऊ शकले. इंग्लंडच्या या कमजोर दुव्याचा भारतीय संघाने अचूक लाभ उठविला व पिछाडीवरुन मालिका ३-१ अशा मोठया फरकाने खिश्यात घातली.
या दरम्यान भारत दिवसेंदिवस आपल्या कामगिरीत सुधारणा करत होते तर इंग्लिश संघ व त्यांचे समर्थक खेळपट्टयांच्या नावे खडे फोडत होते. वास्तविक दोष खेळपट्टयांचा नव्हे तर इंग्लंडचा प्रत्येक सामन्यात सदोष संघ निवडण्यात होता. शिवाय इंग्लंडकडे जे फलंदाज होते ते फिरकी गोलंदाजी खेळण्याचे तंत्र फारसे जाणून नव्हते तर त्यांच्या फिरकी गोलंदाजांनाही फिरकीला साथ देत असलेल्या खेळपट्टीचा लाभ उठविता आला नाही. शिवाय भारतासारख्या बलाढय संघाशी खेळताना आपला सर्वोत्तम अकरा जणांचा संघ प्रत्येक सामन्यात खेळविण्यात इंग्लिश संघ प्रबंधनाला अपयश आले व हेच खरं इंग्लंडच्या भारत दौऱ्यावरील नामुष्कीजन्य पराभवावे कारण आहे.
भारताच्या संघावर एक नजर टाकली तर ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेल्या यशामुळे म्हणा किंवा अतिआत्मविश्वासामुळे म्हणा चेन्नईमधील पहिला सामना भारताने गमावला. भारतात भारताचे फिरकी गोलंदाज यशस्वी होतात मग जो गोलंदाज खेळवू तो यशस्वी होतोच हा भारतीयांचा समज पहिल्या सामन्यात खोटा ठरला. शाहबाद नदीमला खेळविण्याचा प्रयोग भारताच्या चांगलाच अंगलट आला. त्यांनतर भारताने खेळाकडे लक्ष देत आपले प्रत्येक सामन्यात विजयाचे ध्येय साकार केले.
शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहणे हे प्रमुख फलंदाज या मालिकेत निष्प्रभ ठरल्यानंतरही उपेक्षित असलेले रोहीत शर्मा, रिषभ पंत, रवीचंद्रन आश्विन व नवोदित वॉशिंग्टन सुंदरने सातत्यपूर्ण खेळ केल्याने भारताला आपली इज्जत राखण्यात यश आले.
भारताने या मालिकेत अक्षर पटेल सारखा हिरा कमावला. अक्षरने स्वप्नवत गोलंदाजी करत आश्चर्यजनक यश मिळविले. तीन कसोटयात २७ बळी व त्यामध्ये ४ वेळा ५ किंवा अधिक बळी मिळविण्याचा कारनामा केला. तर रवीचंद्रन आश्विनने आपल्या फिरकी गोलंदाजीची हुकूमत कायम ठेवत कसोटीत ४०० बळींचा टप्पा गाठून भारताला विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. तर रिषभ पंत ऑस्ट्रेलियात मिळालेल्या यशामुळे चांगल्या पैकी पक्व झाल्याचे त्याच्या बॅटींग व यष्टीरक्षणातील सुधारावरून दिसले.
एकदंर भारतीय संघाने समस्त क्रिकेट विश्वाला भारतातील क्रिकेटमध्ये असलेल्या मजबूत पायाची जाणीव करून देत भारताची बेंच स्ट्रेंग्थ शक्तिशाली असल्याची जाणीव करून देत कसोटीचे अधिकृत विश्वविजेतेपद मिळविण्याकडे एक महत्वाचे पाऊल टाकले आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

