कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर औषध उपलब्ध करून देण्यात राज्यमंत्री अपयशी
- भाजप तालुकाध्यक्ष जामदार
इंदापूर : प्रतिनिधी( दि.१० एप्रिल २१)
कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा इंदापूर तालुक्यात सध्या तीव्र तुटवडा जाणवत आहे. परिणामी, कोरोना रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. इतर तालुक्यांमध्ये हे औषध उपलब्ध होत असताना, इंदापूर तालुक्यात मात्र रेमडेसिवीर औषध उपलब्ध करून देण्यात इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असणारे राज्यमंत्री अपयशी ठरले आहेत. परिणामी, रेमडेसिवीर औषधाअभावी कोरोना रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे, अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी आज (दि.10) दिली.
इंदापूर तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मात्र कोरोना रुग्णांवर वेळेवर व प्रभावी उपचार करणेसाठी वैद्यकीय सुविधा तसेच रेमडेसिवीर औषध उपलब्ध करून देण्यामध्ये राज्यमंत्री अपयशी ठरले आहेत. परिणामी, तालुक्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. ऑक्सीजन, व्हेंटीलेटरची उपलब्धता व रेमडेसिवीर इंजेक्शन हे पुरेशा प्रमाणात सहजपणे मिळाल्यास रुग्ण लवकर बरा होतो. मात्र तालुक्यात या वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणावरती उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात राज्यमंत्री अपयशी ठरले आहेत, असे ॲड. जामदार यांनी स्पष्टपणे सांगितले.
भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांचा फोन आल्यास उपचारासाठी बेड मिळवून देणे, रेमीडेसिवीरचे औषध मिळवून देणेसाठी सतत सहकार्य करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, रेमीडेसिवीर औषधांचा साठा करून ठेवणेची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी असणाऱ्या राज्यमंत्र्यांची असताना त्यांच्याकडे असलेल्या नियोजनाच्या अभावामुळे कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. राज्यमंत्र्यांनी तालुक्यात रेमडेसिवीर औषधांचा साठा हा पुरेशा प्रमाणावरती उपलब्ध करून द्यावा, असे आवाहनही ॲड. जामदार यांनी केले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या नावाखाली तालुक्यातील व्यवसायिक, दुकानदार, हॉटेल चालक, सलून आदी विविध व्यावसाय करणाऱ्यांवरती घातलेले निर्बंध शासनाने शिथिल करावेत, अशी मागणीही भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी केली आहे.
________________________________

