९ एप्रिल २०२१, शुक्रवार रोजी चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्डेडीयमवर चौदाव्या आयपीएल सत्राचा श्रीगणेशा गतविजेता मुंबई इंडियन्स व आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यातील सामन्याने झाला. गेली दोन वर्ष संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे तेरावी आयपीएल तिच्या नियोजित वेळेच्या सहा महिने उशीराने युएईत संपन्न झाली.
तब्बल ६९७ दिवसानंतर आयपीएल मायदेशात होत आहे. परंतु सलग दुसऱ्या वर्षी या लोकप्रिय व जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेला प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन खेळ बघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पाचवेळचा विजेता मुंबई इंडियन्सचा संघ मागील दोन स्पर्धा जिंकून विजेतेपदाची हॅट्रीक घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला खरा पण त्यांना पहिल्याच सामन्यात पराभवाचा कडवा डोस पचवावा लागला. तसं बघाल तर मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यातील पराभव म्हणजे आपण नवीन मराठी वर्षाच्या अर्थात चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी जसं कडू लिंबाचं पान खाऊन सुरू करतो तसं म्हणावं लागेल. सन २०१३ पासून म्हणजे रोहीत शर्माने मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची धुरा हाती घेतल्यापासून मुंबई आपल्या या व्रताला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत आहे. मुंबईने गेली आठ वर्ष जरी पहिल्या सामन्यात पराभव पत्करला असला तरी त्यापैकी पाच वेळा विजेतेपदही पटकविलं आहे. त्यामुळे हा पराभव मुंबई इंडियन्ससाठी वेकअप कॉल आहे असं म्हटलं तरी कोणी गैर समजू नये.
मुंबई इंडियन्सचा संघ खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात इतर संघांपेक्षा अनेक पट भक्कम असल्याने मुंबईचा पराभव पचवणे हितचिंतकांना जड जात आहे. आरसीबीने मुंबईला हरविलं असल तरी यात आरसीबी पेक्षा मुंबई इंडियन्सच्या चुकाच जास्त कारणीभूत आहेत. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर क्विंटॉन डिकॉक ऐवजी ख्रिस लिन सह कर्णधार रोहीत शर्मा मैदानात उतरला. परंतु या दोघांत ताळमेळ नसल्यामुळे लिनच्या एका चुकीच्या कॉलचा रोहीत बळी पडला व धावचित झाला. या चुकीमुळे मुंबईने भक्कम पायाभरणी गमावली. सुर्यकुमार यादव, ईशान किशन व ख्रिस लिन चांगल्या खेळीचे मोठ्या धावांत रूपांतर करू शकले नाही. तर हार्दिक पांड्या, किरॉन पोलॉर्ड व कृणाल पांडया यांनी आपली घणाघाती प्रतिमा स्वतःच फोडली.
हाणामारीच्या शेवटच्या ४ ते ५ षटकात खोऱ्याने धावा ओढणाऱ्या मुंबईच्या या बहाद्दरांना हर्षल पटेल या नवख्या गोलंदाजाने निव्वळ लगामच घातला नाही तर मुंबईची भक्कम फलंदाजी अक्षरशः कापून काढली. यामध्ये पटेलच्या कर्तबगारी पेक्षा मुंबई इंडियन्सच्या बेजबाबदार फलंदाजांचाच मोठा वाटा होता. एकवेळ २०० च्या वर धावा मुंबई फलकावर लावेल असे वाटत असताना त्यांना कशाबशा १५९ धावाच जोडता आल्या.
ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरला स्लिपच्या जाळ्यात ढकलले परंतु कर्णधार रोहीत शर्मानेच तो झेल धरणी मातेला अर्पण केला. त्यानंतर हार्दिक पांडयाने कर्णधार कोहलीला धावचित करण्याची सुवर्ण संधी गमावली. मागच्या वर्षी पंजाबकडून सफशेल अपयशी ठरल्यानंतर आरसीबीकडे आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने जोरदार खेळ केला. परंतु बुमराहा, बोल्ट व नवोदीत मार्को जेनसनने सामन्यात रंगत भरली. मात्र अब्राहम बेंजामिन डिव्हीलर्स नामक सुपरमॅनने मुंबईच्या तोंडातला विजय हिरावून घेतला, तरीही मुंबईच्या जिगरबाज खेळाडूंनी व सुपर ब्रेन कर्णधार रोहीतने अंतिम चेंडूपर्यंत झुंज दिली.
मुंबई इंडियन्सने क्षेत्ररक्षण सुधारणे अतिमहत्वाचे असून अतिआत्मविश्वास यंदाचं सत्र संपेपर्यंत बासनात गुंडाळून ठेवणे गरजेचे आहे तरच विजेतेपदाची हॅट्रीक साधता येईल. अन्यथा मुंबईला सिंहासनावरून खाली खेचण्यास अनेक जण उतावळे झाले आहेत.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

