shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोणी बेड देता का, बेड...!


आमच्या आयुष्यात आलेला वाईट अनुभव, घडलेला प्रसंग सांगून मन हलके करण्याचा प्रयत्न करीत आहोत...!
दिनांक १२ एप्रिल २१ ची काळरात्र रात्री १२.२१ मिनिटानी आमच्या वडिलांना म्हणजे आदरणीय रामदासजी पवार यांना थोडा दम लागू लागला.saturation लेवल अगदी ७५ पर्यंत आले, तेंव्हा आमचे फॅमिली डॉक्टर अनुप गायकवाड यांच्या सल्ल्याने त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये आम्ही व आमचे मित्र जय गायकवाड आणि काळू विटकर यांनी धावपळ करून घेऊन गेलो. दादा हे नेहमी त्याच दवाखान्यात उपचार घेत असल्याने दुसरीकडे कुठे जाण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु त्या दिवशी आलेला पूना हॉस्पिटल चा अनुभव खुपच वाईट होता.
      ‌   कै.रामदासजी पवार,माजी उपमहापौर, पुणे


पुना हॉस्पिटलमध्ये जागा नाही म्हणून त्यांनी आम्हाला गेट मधून आत घेण्यास ही नकार दिला. माणुसकी म्हणून चेक अप देखील करायला तयार नव्हते.तेंव्हा दादांचे जुने स्नेही व जनसेवा फौंडेशन चे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा यांनी त्यांना फोनवर सज्जड दम दिला तेव्हा casualty मध्ये चेक अप सुरू करण्यात आले.एक्स रे ,सी टी स्कॅन करण्यात आले. त्यात थोडा प्रॉब्लेम वाटला म्हणून तिथल्या डॉक्टरांनी दादांना कोविड नसताना फक्त एक शंका वाटते व आमच्याकडे बेड नाही हे कारण देत, आम्हाला दादांना येथून हलवा असा तगादा सतत लावला, आणि त्यांनी दादांना causality ward च्या बाहेर आणून ठेवले.

रात्रीचे १.३० वाजलेले आणि इतर सर्व लोकांच्या सदैव मदतीला धाऊन जाणारे आम्ही दोन्ही बंधू, अगदी हवालदिल झालेलो, कारण पूर्ण पुण्यात एक ही ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचे आम्हाला सांगू लागले. तेव्हा आम्ही रात्री माजी सभागृह नेते निलेश भैया निकम यांना, तसेच खासदार वंदना ताई चव्हाण ,माजी नगरसेवक अजित आपटे,नगरसेवक अभय छाजेड साहेब,कामगार नेते सुनील शिंदे,महापालिका क्षेत्रीय आयुक्त नितीन उदास साहेब,डॉक्टर अनुप गायकवाड या सर्वांकडे मदतीचा हात मागितला. ही सर्व मंडळी केवळ दादांच्या प्रेमापोटी रात्री २ ते पहाटे ६ पर्यंत ऑक्सिजन बेड मिळण्याकरिता प्रयत्न करीत राहिली. या सर्वांचे  दर १५ मिनिटांनी फोन यायचे व आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न हे सर्व करीत होते, शेवटी अभय छाजेड (काका)व सुनील शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाना यश आले. दादांना ७ वाजता दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले, ICU मधे जागा उपलब्ध झाली. परंतु तो पर्यंत खूप उशीर झाला होता.दादांची oxygen level कमी झाली होती.बी पी कमी झाला होता.

मूत्रपिंड निकामी होत होते.तरी देखील डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करीत होते. कारण हॉस्पिटलमध्ये येण्याआधी, दादांसाठी ज्या- ज्या लोकांनी फोन केला होते त्यावरून ही व्यक्ती कोणीतरी विशेष असावी हे हॉस्पिटलमधील लोकांना समजले. दादांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आमच्या आई ला म्हणजे कै.सुमन पवार यांना जाऊन १९ महिने झाले होते.आई गेल्यापासून दादा खूप एकटे पडले होते.त्यात कोरोना मुळे सतत घरातच होते . आलेला एकाकीपणा त्यांना खुप खात होता,  दादा  उपचाराला हवतसा  प्रतिसाद देत नव्हते.आणि त्यांची तब्येत ढासळली.आणि १४ एप्रिल २१ रोजी स्वामी समर्थ जयंती,आंबेडकर जयंती,रमजान चा पहिला पवित्र दिवस आणि प्रभू श्री रामाचे नवरात्रीमध्ये भरणी नक्षत्रावर दुपारी ४.०५ मिनिटाने अनंताच्या प्रवासाकडे निघाले.आणि नकळत माझ्या डोळ्यासमोर चलचित्र सुरू झाले.भूतकाळ डोळयासमोर आला.

सोलापूर जिल्ह्यातील भिगवण येथे जन्म घेतलेले दादा, एक गरीब कुटुंबातील सात भावंडासोबत पुण्यात रहात होते.वडिलांचे म्हणजे कै. भिमाजी पवार यांचे छत्र लहानपणी हरपलेले ही सर्व भावंडे आपल्या आई समवेत त्यांची मावशी कै भीमाबाई विटकर यांच्या आश्रयाला आली.मावशी चा या सर्व भावंडा पैकी दादांवर खूप जीव होता .आणि दादा हुशार देखील खूप होते.१९४९ साली भावे स्कुल मधील मिडल स्कुल स्कॉलर होते.परंतु आर्थिक परिस्थिती मुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही.कै एकबोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ते संघ परिवारात  कार्यरत होते. काही काळ सेवादलात देखील होते.तिकडे त्यांचा संबंध निळू फुले,राम नगरकर यांच्याशी आला.वडार समाजातील नेते कै संगाण्णा  धोत्रे यांच्या समवेत त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील खेडोपाडी जाऊन वंचित लोकांना न्याय मिळवून देण्याचे  कार्य अविरतपणे  सुरू ठेवले.असे सामाजिक कार्य करीत असताना त्यांनी १९७४ साली अपक्ष महापालिकेची निवडणूक लढविली व ते विजयी झाले.पुढे काँग्रेस पक्षाकडून त्यांनी सलग १९८५,१९९२,१९९७,२००२ अशी सलग चार वेळा निवडणूक लढवली.त्यात ते सलग तीन वेळा विजयी झाले.१९९३-९४ साली कै. जयंतराव जी टिळक (सभापती, विधान परिषद) यांच्या मुळे ते पुण्याच्या उप महापौर पदी विराजमान झाले.महापालिकेत त्यांनी जास्त काळ त्यांनी आरोग्य समितीवर काम केल्यामुळे त्यांना डॉक्टर ही उपाधी मिळाली होती.

ते नेहमी महापालिकाअधिकारी वर्गाच्या बाजूने असत.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वॉर्डात शाळा,विद्यनिकेतन, उद्याने,समाज मंदिरे,रस्ते इ. खुप लोकपयोगी कामे केली.त्यांनी कमीत कमी १५०-२०० तरुणांना महापालिकेत कायम स्वरूपी नोकरी वर कामास लावले.त्यांना सिने कलाकारांबद्दल विशेष प्रेम होते.ते प्रति वर्षी हिंदी मराठी कलाकारांचा ५ नोव्हेंबर रोजी सत्कार आयोजित करीत असत.त्यांचे अशोक कुमार,दिलीपकुमार, राज कपूर,सुनील दत्त,कादर खान,देवेन वर्मा,राजा गोसावी,निळू फुले,ललिता पवार,उषा चव्हाण,लीला गांधी,लक्ष्मीकांत बेर्डे,महेश कोठारे,वर्षा उसगावकर इ कलाकारांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. दादांसाठी हे कलाकार आवर्जून कार्यक्रमास उपस्थित रहात.दादानी पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांना नर्गिस दत्त,गीतकार शैलेंद्र,गायक मुकेश,संगीतकार शंकर जयकिशन यांची नावे देखील दिली आहेत.

असे एक अष्टपैलू  व्यक्तिमत्त्व असलेले दादा आमचे वडील होते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे व रहाणार. दादांच्या जाण्याने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.झालेले दुःख आपल्यासमोर मांडून आम्ही थोडे दुःख हलके करण्याचा  प्रयत्न केला.खरच सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे.काळजी घ्या.  या दुःखद प्रसंगी ज्यांनी ज्यांनी वॉट्सअप्प ,फेसबुक ,फोन वरून प्रत्यक्ष भेटून आम्हाला आधार दिला आमचे सांत्वन केले त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आमच्या दुखात सहभागी झालात, आपणा सर्वांना वंदन....


महेंद्र रामदास पवार आणि समस्त पवार परिवार
पुणे.
close