सन २००८ ची शुभारंभाची आयपीएल स्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नच्या नेतृत्वात जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या कामगिरीला ओहोटी लागली. संघात अनेक गणमान्य खेळाडू आले, गेले, व आहेतही तरी या संघाची कामगिरी काटा बदलायला तयार नाही. सन २०२० च्या युएई मध्ये झालेल्या सत्रात आर आर चा संघ अगदी तळाच्या म्हणजे शेवटच्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्हन स्मिथने त्या सत्रात अतिशय गचाळ नेतृत्व करताना संघाची घडी पुरी बिघडून टाकली होती.
चुकाची संघ निवड करायचा. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही क्रमाकांवर फलंदाजीला पाठवा. गोलंदाजांचेही तसेच परिस्थितीनुसार गोलंदाजीत बदल करत नसायचा. सतत चुकीचे निर्णय घ्यायचा. या पायी तर तीन हातातले सामने त्यांना गमवावे लागले होते. विशेष म्हणजे तो बिलकुल फॉर्ममध्ये नव्हता. शिवाय बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल या बिनीच्या खेळाडूंचा गरजेप्रमाणे त्याला उपयोग करून घेता आला नाही. शेवटी याची फलनिष्पत्ती व्हायची तीच झाली. राजस्थानचा संघ गुणतालिकेत तळाला राहीला व स्मिथची संघातूनच हकालपट्टी झाली.
संघ मालक राज कुंद्रा याने मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग घेतल्याचे उघड झाल्या नंतर सन २०१६ व २०१७ या दोन वर्षात बीसीसीआयने राजस्थान संघाला आयपीएलमधून निलंबीत केले होते. शिवाय सन २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सचे एस. श्रीशांत सह चार खेळाडू स्पॉट फिक्सींग प्रकरणात जेलची हवा सुध्दा खाऊन आलेत.
या सर्व वाईट प्रसंगांना विसरून राजस्थानने संघ बांधणी करण्याचा प्रयत्न केला. गुडलक व्हावे म्हणून यंदा त्यांनी संजू सॅमसनच्या रूपात नवा कर्णधार आणला. संघाचा युनिफॉर्मही बदलला. सव्वा सोळा कोटी ही आयपीएल इतिहासामधील सर्वात मोठी रक्कम देऊन द.आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरीसला संघात आणले. परंतु त्यांचे दुर्देव असे की त्यांचा हुकुमाचा एक्का जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे बहुतेक संपूर्ण स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.
तरी बेन स्टोक्स, राहुल तेवतीया, जोस बटलर, डेव्हीड मिलर यांच्या सारखे मॅचविनर खेळाडू त्यांच्या ताफ्यात आहेत. शिवाय त्यांच्याकडे कर्णधार संजू सॅमसन, बेन स्टेक्स, जोस बटलर, रियान पराग, यशस्वी जयस्वाल, लियाम लिव्हींगस्टोन, असे मातब्बर फलंदाज असले तरी त्यांची सलामी जोडी अद्याप निश्चित नाही.
बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, ख्रिस मॉरीस, मुस्तफिजुर रहेमान, चेतन सकारीया सारखे वेगवान गोलंदाज व मयंक मार्कंडेय, श्रेयस गोपाल, राहुल तेवतीयासारखे चांगले फिरकी गोलंदाजही त्यांच्या ताफ्यात आहे.कागदोपत्री राजस्थान संघ मजबूत दिसत असला तरी नवा कर्णधार संजू सॅमसनाला अनुभवी खेळाडूंचे सहकार्य कसे मिळते यावरही राजस्थानच्या यशाचे भवितव्य अवलंबून आहे.
चौदाव्या सत्रासाठी राजस्थानने निवडलेला आपला संघ असा असेल : --
संजू सैमसन (कप्तान), बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडेय, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन होरा, ख्रिस मॉरीस, लियाम लिविंगस्टोन, मुस्तफिजुर रहमान, शिवम दुबे, चेतन सकारिया, केसी करिअप्पा, कुलदीप यादव व आकाशसिंग.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

