shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रिकेटच्या तीनही प्रारूपात भारताचे वेगवेगळे कर्णधार असावेत ?


   
                            भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज व निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी आगामी काळात रोहीत शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटचं नेतृत्व करू शकतो. असं मत मांडून एका वेगळ्या विषयाला चालना दिली. 
                           सध्या क्रिकेटच्या सर्व प्रारूपांत भारताचा कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजात केली जाते. काही अंशी ते खरेही आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारात त्याचे यशाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. 
          कोहली भारताचे कसोटीत सन २०१४ पासून तर सन २०१६ पासून सफेद चेंडूच्या खेळात नेत्तृत्व करत आहे. गेल्या सात वर्षात त्याने ६० कसोट्यात भारताचे नेतृत्व केले असून त्यातील ३५ सामन्यात विजय, १४ सामन्यात पराभव मिळाले आहेत तर १० सामने अनिर्णित राहीले आहेत. त्याच्याच कर्णधार पदाच्या कालखंडात भारताने कसोटीतील सर्वोच्च व निच्चांकी धावसंख्या नोंदविली आहे.


                         कोहलीच्याच नेतृत्वात येत्या १८ जून पासून भारत न्यूझिलंड विरूध्द विश्व कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळणार आहे. आपणास चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की, सन २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या कसोटीत भारताचा डाव अवघ्या ३६ धावांत गडगडला होता. ती भारताची कसोटीतील निच्चांकी धावसंख्या ठरली. भारताला त्या सामन्यात अतिशय लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला होता. त्या पराभवाने भारतीय संघाच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला होता. सर्व जण हताश झाले होते. अशा स्थितीत हे कोहली महाशय स्वतः संघाचा कर्णधार व प्रमुख फलंदाज असताना संघाला वाऱ्यावर सोडून बायकोच्या बाळंतपणासाठी मायदेशी आला होता. त्याच वेळी त्याच दौऱ्यावर असलेला त्याचाच सहकारी मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते, तरी तो पूर्ण दौऱ्यावर थांबला. संघाच्या यशात मोलाचा वाटाही उचलला.
                         कोहलीच्या गैरहजेरीत, प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीनंतर अजिंक्य राहाणेने दिमाखदार फलंदाजी व कल्पक नेतृत्व करत ऑस्ट्रेलियाला २-१ असे पाणी पाजले. आता इंग्लंडमध्ये भारत अंतिम खेळणार आहे तो याच मालिका विजयाच्या जीवावर. त्याचं श्रेय मिळतंय विनाकारण कोहलीला.
                            कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य राहणेने पाच कसोटयात भारताचं नेतृत्व केलं. त्यातील ४ सामने जिंकले व एक अनिर्णित राहीला. यावरुन अजिंक्य राहणे कोहली सारखा जगविख्यात फलंदाज संघात नसताना संघाला विजयी करू शकतो. याचा अर्थ आज भारत कसोटीत अव्वल स्थानी आहे ते कोहलीच्या नेतृत्वामुळे नव्हे तर त्याच्या संगतीला असलेल्या इतर सर्व गुणवान व मेहनती खेळाडूंमुळे !
                           सफेद चेंडूच्या खेळाचा विचार केला तर कोहलीने ९४ वनडेत नेतृत्व केले असूून ६५ सामने जिंकले, २७ हारले तर ३ अनिर्णित राहीले. टि २० सामन्यांच्या बाबत बघायचं तर कोहलीने नेतृत्व केलेल्या ४५ पैकी २७ सामने जिंकले, १४ गमावले तर ४ सामन्यांचा निकाल लागला नाही.
                           या उलट कोहलीच्या गैरहजेरीत रोहीत शर्माने वनडेत भारताचे १० सामन्यात नेतृत्व केले असून त्यातील ८ सामने जिंकले व केवळ दोन सामने गमावले. शिवाय १९ टि-२० सामन्यांपैकी १४ सामने भारत जिंकले व पाच गमावले.
                          रोहीत शर्मा व अजिंक्य राहाणेच्या कामगिरीकडे बघितले तर या दोघांची विजयाची टक्केवारी कोहलीच्या तुलनेत अधिक आहे, आणि ती सुध्दा कोहलीसारख्या अव्वल फलंदाजाच्या गैरहजेरीत ! त्यामुळे कोहलीच संघाचा कर्णधार पाहीजेच असं कुठल्या ग्रंथात लिहून ठेवले नाही.
                          रोहीत शर्माने जगातील अव्वल दर्जाची आयपीएल स्पर्धा त्याच्या नेतृत्वात आठ पैकी पाच वेळा मुंबई इंडियन्सला जिंकून दिली आहे. तर कोहलीच्या नेतृत्वात त्याचा आरसीबी संघ एकदाही आयपीएल जिंकू शकला नाही. तसेच कोहलीने नेतृत्व केलेल्या आयसीसीच्या स्पर्धात भारत एकदाही विजेतेपद मिळवू शकला नाही. शिवाय निर्णायक व महत्वाच्या सामन्यात एक फलंदाज म्हणून त्याचे अपयशी होण्याचे प्रमाण मोठे आहे.
                          विराट कोहली सध्या सर्वात तंदुरूस्त खेळाडू असून तो क्रिकेटच्या तीनही प्रकारात खेळत असून त्याच्या तब्बेतीवर कळत नकळत परिणाम होत आहे. त्यामुळे त्याची फलंदाजी पूर्वीसारखी होत नाही. हे त्याच्या मागील दोन वर्षात नसलेल्या शतकावरून व शुन्यावर बाद होण्याच्या प्रमाणावरून सहज सिद्ध होत आहे.
                           त्यामुळे किरण मोरे म्हणतात ते बरोबर असून सफेद चेंडूच्या खेळात रोहीत शर्माला भारताचं कर्णधारपद द्यायला हवं. परंतु सध्या एक वेगळी मतप्रणाली जोर घेत असून कसोटीतही कोहलीने नेतृत्वाचे सुत्र राहाणेकडे द्यावेत व सचिन तेंडुलकर प्रमाणे निव्वळ फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करून देशाला मोठमोठे विजय मिळवून द्यावेत व फलंदाजीतले सगळे विक्रम स्वतःच्या नावे करावेत.
                            क्रिकेटमध्ये कुणा एकाची मक्तेदारी राहील्याने गटबाजी तयार होते व संघ ऐनवेळी महत्वाच्या सामन्यात पराभूत होतो. याचे उदाहरणे आपण बघितलेच आहे. शिवाय भारत सध्या क्रिकेटच्या तीनही प्रकारात वेगवेगळे संघ खेळविण्याच्या मुडमध्ये असल्याने तीन संघांचे तीन वेगवेगळे कर्णधार राहील्यास त्यांच्यातील चढाओढीमुळे भारतीय संघास लाभच होईल.


लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close