येणारा काळ अडचणीचा नागरीकांनी स्वतःची जबाबदारी ओळखावी-दत्तात्रय भरणे
इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आढावा बैठकीत चर्चा करताना
इंदापूर प्रतिनिधी:-आगामी दहा दिवस हे अडचणीचे आहे. या संकटकाळात नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरवासियांना केले. दि.१५ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना विषयी आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे तसेच सर्वच खात्यांचे प्रमुख त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आवर्जून या बैठकीस उपस्थित होते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विभागाचा आढावा घेतला. व तालुक्यातील कोरोनाची सद्यपरिस्थिती जाणून घेतली. ते म्हणाले की, सध्या तालुक्यात १७०९ अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. तर आजपर्यंत ३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ९५ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण झाले असल्याचे सांगितले.
परंतु तालुक्याचा पॉझिटिव्ह रेट हा जास्त असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे सांगितले. आपल्याकडे बेडची अधिकची उपलब्ध संख्या, औषधे, आॅक्सिजनचा सुरळीत पुरवठा पाहता नागरिकांनी काळजी करण्याचे काहीच कारण नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. खाजगी रुग्णालयांनी उपचारासाठी रुग्णांकडून घेण्यात आलेले वाढीव बीले रुग्णांच्या नातेवाईकांना परत केली असल्याचे राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, दि. १८ रोजी पासून तालुक्यातील लाॅकडाऊन शिथील होणार आहे. असे असले तरी नागरिकांनी शासनाच्या सुरु असलेल्या लाॅकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. या काळात पोलीस प्रशासनाने अधिकचे लक्ष देऊन कडक भूमिका घेऊन बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे, जो कोणी नियमांचे पालन करणार नाही त्याच्या कारवाई करण्यात यावी अशा सूचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेची सूचना देऊन या काळात काय उपाययोजना कराव्यात याविषयी विस्तृत माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या.