रद्द केलेल्या उपक्रमांचे शुल्क न घेण्याची मागणी
लातूर । प्रतिनिधी :-
*"सद्य:स्थितीत कोरोनाच्या या परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या भटक्या समूहांवर आर्थिक संकट ओढावल्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची परिस्थिती हालाखीची बनली आहे. विद्यापीठाने पदवी, पदव्युत्त्र तसेच संशोधक विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क रद्द करावी तसेच महाविद्यालयांना सूचना करून अतिरिक्त वसूली थांबवावी, तसेच प्रवेश शुल्क परत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते "- श्रीकांत मुद्दे यांनी केली आहे.
"कोरोना संसर्गाच्या भीषण परिस्थितीत अतिरिक्त शुल्काने विद्यार्थी जेरीस आले आहेत. चालू शैक्षणिक वर्षात रद्द करण्यात आलेल्या उपक्रमांचे शुल्क रद्द करून, प्रवेश शुल्क परत करून विद्यार्थ्यांना दिलासा देत विद्यापीठ प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी मा. मुख्यमंत्र्यांकडे निवदनाद्वारे केली आहे."
सध्या पदवी आणि पदव्युत्तर वर्गाची परीक्षा सुरू आहे. प्रवेश शुल्कात सर्व उपक्रमांचे शुल्क वसूल करीत आहेत. या लॉकडाऊनमुळे भटक्या-विमुक्त, बारा बलुतेदार समूहातील पालकांचा व्यवसाय पूर्णता डबघाईस आला आहे. अशा परिस्थितीत कसे जगावे हाच त्यांच्यापुढील प्रश्न आहे. अशा परिस्थितीतही काही महाविद्यालयांनी भटक्या समाजातील पदव्युत्तर वर्गातील प्रवेशासाठी पुरेशा प्रमाणात विद्यार्थीसंख्या नसतानाही (एम.ए.) विलंब झाला म्हणून विद्यापीठाचे नियम म्हणून विलंब एक हजार रूपये अधिकचे घेतल्याचे उघड झाले आहे.
या भीषण परिस्थितीत असे विलंब शुल्क घेणे योग्य आहे का? हाही प्रश्न आहे. दुसरीकडे पदव्युत्तर प्रवेश शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. अशा बिकट परिस्थितीत निर्धारीत शुल्क भरण्याची या समूहातील विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही. या पार्श्वभूमीवर इतर उपक्रमांचे शुल्क रद्द करावे अशी मागणी केली आहे.
या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत संशोधक विद्यार्थ्यांचीही खूप मोठी परवड झाली आहे. आर्थिक परिस्थिती हालाखीची बनत असल्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची फीस आणि संशोधन केंद्राची फीस कसे भरावे हा त्यांच्यापुढील बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांची पीएच्.डी. संशोधन केंद्राची आणि विद्यापीठाने आकारलेला शुल्क रद्द करून किंवा शुल्क कमी करून अशा भटक्या-विमुक्त, बारा बलुतेदार समूहातील विद्यार्थ्याना दिलासा द्यावे असेही श्रीकांत मुद्दे म्हणाले.
कोरोना परिस्थितीत विद्यापीठ व महाविद्यालये कमी संसाधने वापरत असल्याने खर्च घटला आहे. त्यामुळे विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील शुल्क रद्द करा, अशी मागणी वडार समाज संघ,महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क काही प्रमाणात कमी करावे, १५ टक्के शुल्क भरून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे, विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी चार टप्प्यात मुभा द्यावी, भटक्या-विमुक्त, बारा बलुतेदार समूहातील लोकांचे आर्थिक परिस्थिती खालावल्याने पालकांना शैक्षणिक शुल्क भरणे अशक्य आहे. अशा विविध मागण्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी मा. मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

