shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टि-२० विश्व करंडकासाठी वेस्ट इंडिजने कंबर कसली..!!



                   सन १९८० व १९९० या दोन दशकात जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजविणाऱ्या विंडीज संघाची तत्कालिन संघातील प्रमुख खेळाडूंच्या निवृत्तीनंतर तसेच तेथील अंतर्गत राजकारणामुळे जागतिक क्रिकेटमध्ये फार मोठी पिछेहाट झाली. वरील दोन दशकांच्या काळात विंडीज क्रिकेटच्या दहशतीसमोर लोटांगण घालणारे संघ नंतर याच विंडीज संघाला "कोणीही या टिकली मारून जा"  या उक्तीप्रमाणे सहज हरवून जायचे. 


या सर्व उलथापालथीत विंडीज क्रिकेटमध्ये अनेक रथी महारथी खेळाडू आले. परंतु त्यांना एकजीव ठेवण्यात तेथील क्रिकेट प्रशासनाला अपयश येत होते. खेळाडूंनाही विंडीजच्या राष्ट्रीय संघात योग्य तो मान सन्मान मिळत नसल्याने ते बेदिल झाले होते. त्याच कालखंडात टि- २० क्रिकेटचा उदय झाला. वेगवेगळ्या देशात टि -२० च्या लिग स्पर्धा सुरू झाल्या आणि त्याचबरोबर जगभरातील तमाम खेळाडूंसह विंडीज खेळाडूंनाही आपल्या बेधुंद खेळाचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. आपल्या आक्रमक व जिगरबाज खेळासाठी प्रसिध्द असलेल्या विंडीज खेळाडूंना जगभरातील लिग स्पर्धांतून मोठी मागणी होऊ लागली. याचा लाभ त्या खेळाडूंना मोठया प्रमाणात अर्थार्जन करण्यात झाला. मोठया प्रमाणात पैशांची आवक झाल्याने खेळाडूही स्थिरस्थावर झाले.

विंडीज क्रिकेट प्रशासन एके काळी खेळाडूंना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल होईल इतके मानधनही देत नव्हते. नेमक्या त्याच कालखंडात सन २०१२ मध्ये श्रीलंकेत तर सन २०१६ मध्ये भारतात झालेल्या टि-२० विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद या डिवचल्या गेलेल्या खेळाडूंनी एकजूटीने खेळ करत आपल्याच क्रिकेट बोर्डाच्या नाकावर टिच्चून खेळ करत मिळविले. त्यानंतर विंडीज क्रिकेट प्रशासनात बदल झाले व भरकटलेले सर्वच खेळाडू संघात परतले. 

सन १९८०-९० च्या दशकात एकदिवसीय सामन्यांचे सुरुवातीचे दोन विश्वकरंडक जिंकणाऱ्या विंडीज संघाची त्यानंतरच्या दोन दशकात अतिशय ससेहोलपट झाली. ते बघून विंडीजच्या क्रिकेट समर्थकांनाच नव्हे तर समस्त क्रिकेट रसिकांना वाईट वाटायचे विंडीजकडे आक्रमक व ताकदवान खेळाडूंची कधीही कमतरता नव्हती. परंतु त्यांच्या जिगरबाज खेळाची कदर करणारे प्रशासक त्यांच्याकडे नव्हते. हेच विंडीजच्या जागतिक क्रिकेटमधील पिछेहाटीचे प्रमुख कारण होते. आज या सर्वच कमकुवत बाबींबर योग्य तो तोडगा निघाल्याने विंडीज क्रिकेटला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

येत्या ऑक्टोबर -नोव्हेंबरमध्ये भारतात टि-२० विश्व करंडक होणार आहे. शिवाय विंडीज गतविजेता असल्याने आपले जगज्जेतेपद राखण्यासाठी विंडीज क्रिकेट बोर्डाने जोरदार कंबर कसले असून आपले इतरत्र पांगलेले सर्व खेळाडू पुन्हा एकत्र जमा केले आहेत. त्या सर्वांना एकजीव होण्यासाठी टि-२० विश्वकरंडकाच्या तयारीच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान या संघांविरूध्द प्रत्येकी पाच सामन्यांच्या मालिका मायदेशांत आयोजित करण्यात आल्या आहेत.

किरॉन पोलॉर्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विंडीज संघात निकोलस पूरन ( उपकर्णधार ) फॅबीयन अॅलन, ड्वेन ब्राव्हो, शेल्डन कॉट्रेल, फिडेल एडवर्डस, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर , अकील हुसेन, एर्विन लुईस, आंद्रे रसेल, लेंडल सिमंस, केव्हिन सिंकलेअर, ओशेन थॉमस, हेडन वॉल्श ( ज्युनियर ) या टि-२० च्या निष्णात खेळाडूंचा संघ निवडला आहे.                       

नव्या जुन्या खेळाडूंचा उत्तम समन्वय असलेला हा संघ विंडीजला त्यांचे जुने वैभव पुन्हा मिळवून देईल का ? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. परंतु विंडीज क्रिकेट बोर्डाने त्या दृष्टीने केलेले तयारी नियोजन अतिशय उत्कृष्ठ आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूध्द पाच टि २० सामने ग्रेनेडा नॅशनल क्रिकेट स्टेडीयमवर २६, २७, २९ जून, १ जुलै व ३ जुलै रोजी होणार आहेत.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूध्द सेंट लुशिया येथे ९, १०, १२, १४ व १६ जुलै रोजी पाच टि-२० सामने होणार आहेत. तसेच पाकिस्तान २७, २८, ३१ जुलै, १ ऑगष्ट व ३ ऑगष्ट या दिवशी आपले पाच सामने विंडीज विरूद्ध खेळेल. त्यातील पहिले दोन सामने बार्बाडोस व शेवटचे तीन सामने गयाना येथे खेळविण्यात येणार आहेत.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close