shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिपचा अंतिम सामना अनिर्णित राहिल्यास न्युझिलंड फायद्यात राहणार..!



                  जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवणारी जगातील सर्वोच्च क्रिकेट संस्था आयसीसी द्वारे आयोजित पहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून पासून इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन येथील रोझ बाऊल स्टेडियमवर भारत व न्यूझिलंड या दोन संघात होणार आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. या सामन्यासाठी आयसीसीने नवीन नियमावाली नुकतीच जाहीर केली असून नेहमीप्रमाणे हा अंतिम सामना पाचव दिवसांचाच असणार आहे. मात्र या साठी सहावा दिवस राखीव ठेवला असून त्यासाठी काही अटीही आयसीसीने ठेवल्या आहेत.

 आयसीसीने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत या सामन्याचा निकाल लागला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यापूर्वी साखळी प्रकारात भारताचे ५२० तर न्युझिलंडचे ४२० गुण होते. या निकषावर सरस गुण व सर्वाधिक विजयांच्या आधारे भारताचे पारडे वरचढ ठरते. 

प्रत्यक्षात हा अंतिम सामना म्हणजे विजेता ठरविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तसेच कोणत्याही स्पर्धेचा विजेता एकच असावा असे संकेत आहेत. त्यामुळे आयसीसीने विजेता ठरविताना निकष लावणे गरजेचे होते. मात्र आयसीसीने अनिर्णित सामन्यानंतर दोन्ही संघांना संयुक्त विजेता ठरविणे काहीसे ढोबळ व जुनाट पध्दतीचे वाटते.

सन २०१९ या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझिलंड व इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना मूळ ५०-५० षटकांच्या खेळानंतर (टाय) बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर षटकाचा खेळ झाला. तो सुध्दा टाय झाला. त्यानंतर पुन्हा दुसरा सुपर षटकाचा सामना झाला. तो पण टाय झाला, त्यावेळी आयसीसी खऱ्या अर्थाने दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करणे गरजेचे होते. मात्र त्यावेळी आयसीसीने तसे न करता इंग्लंडला सामन्यात सर्वाधिक (बाऊंड्रीज) षटकार -चौकार मारण्याच्या निकषावर विजेते घोषित केले. वास्तविक हा न्यूझिलंडवर अन्याय होता. परंतु त्यावेळी आयसीसीचे धोरण स्पष्ट होते की, कोणत्याही जागतिक स्पर्धेचा विजेता एकच संघ असावा.

आयसीसीचं एवढं स्पष्ट व सरळ धोरण असताना या वेळी त्यांनी सामना अनिर्णित राहील्यास संयुक्त विजेतेपद देण्याचं धोरण काहीसं संशयास्पद वाटतं. सन २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला विजेते ठरविण्याचा चंगच आयसीसीने बांधला होता. तर यावेळी कुठल्याही परिस्थितीत भारताला विजेते ठरू द्यायचे नाही असेच दिसते. त्याचं प्रमुख उदाहरण आपल्यासमोर आहे.
                     
आयसीसीने जेंव्हा कसोटी विश्व अजिंक्यपदाची सुरुवात केली तेंव्हा गुणानुसार क्रमवारी ठरविण्याचं जाहीर केलं होतं. परंतु भारताने सुरुवातीपासून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले होते. त्यानंतर साखळी मालिका मध्यावर आली असताना आयसीसीने आपले धोरण बदलले व जो संघ सर्वाधिक विजय मिळवेल तो गुणतालिकेत अव्वल ठरेल असे ठरवून भारताला मागे सारण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात व इंग्लंडला भारतात जोरदार तडाखे देत या स्पर्धेत सर्व संघांच्या तुलनेत निव्वळ गुणांच्याच नव्हे तर विजयातही अव्वल स्थान मिळविले.
                        
वास्तविक आयसीसीने या मानाच्या स्पर्धेचा विजेता ठरविताना हा सामना निकाल लागेपर्यंत खेळवायला हवा होता. यापूर्वी कसोटी सामने १० दिवसांपर्यंत चालल्याचेही इतिहासात नोंद आहे. जर असे करायचे नव्हते तर सामन्यात दोन्ही संघाच्या पहिल्या डावानंतर आघाडी घेणाऱ्या संघाला विजयी ठरविता येऊ शकते. भारतातील रणजी स्पर्धात हा नियम पूर्वीपासून चालत आला आहे. हे ही नसेल तर प्रत्यक्ष त्या सामन्यात प्रत्येक सत्रात जो संघ जास्त वेळा वर्चस्व गाजवेल त्यालाही विजेते ठरविले जाऊ शकत होते.
                        
१८ ते २२ जून २०२१ या काळात इंग्लंडमधील हवामान खात्याच्या अंदाजानुसार तीन दिवस पाऊस असणार आहे हे माहीती असताना तसेच पूर्ण खेळ न झाल्याने सामन्याचा निकाल लागू शकणार नसल्याची कल्पना आली असूनही आयसीसीने गोऱ्या न्यूझिलंडला संयुक्त का होईना विजेता ठरविण्याचा डाव रचल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
                        
भारत व न्यूझिलंड संघांचा विचार केला तर कागदोपत्री भारतीय संघाचे पारडे वरचढ वाटते. भारत हा सामना व कसोटीचे अधिकृत विजेतेपद मिळविणार हे उघड असल्याने आयसीसीने रचलेला हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी भारतीय संघाने एकजूट होऊन सामना होईल तितक्या वेळेत तडफेने खेळ करून खिशात घालावा. हिच तमाम भारतीय क्रिकेट शौकीनांची अपेक्षा आहे. ती खेळाडूंनी यशस्वीपणे पार पाडावी हिच अपेक्षा व शुभेच्छा !
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close