चौदावे आयपीएल सत्र रंगात आले असतानाच कोरोनाच्या आक्रमणानंतर स्थगित करण्यात आले. या घटनेला चार दिवस होतात नाही तोच आगामी इंग्लंड दौरा व इंग्लंडमध्येच न्यूझिलंडविरूध्द होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या निवड समितीने विस सदस्यसीय संघ निवडला. त्यापैकी वृद्धीमान साहा हा आयपीएल स्पर्धेदरम्यान कोरोना बाधीत झाल्याने तर के एल राहुल अपेंडिक्सचं ऑपरेशन झाल्याने तंदुरुस्ती सिध्द केल्यावरच दौऱ्यावर जाऊ शकतील. तर चार राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे.
१८ ते २२ जून २०२१ दरम्यान साऊथॅम्प्टन येथे भारत व न्यूझिलंड या दोन संघात कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळविण्यात येणार आहे. त्या एकमेव कसोटीसाठीही हाच संघ असणार आहे. तसेच या सामन्यानंतर ४० दिवसांनी भारत इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. न्यूझिलंड विरूध्द कसोटी खेळल्यानंतर भारताचा संघ मायदेशी परतणार नसून इंग्लंडमध्येच थांबणार असून या दरम्यान ते इंग्लंडमधील विविध कौंटी संघांविरूध्द सराव सामनेही खेळणार आहेत.
सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले असल्याने भारत या दौऱ्यात २५ ते ३० खेळाडूंचा संघ निवडेल असे वाटत होते. त्याचे कारण म्हणजे एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याला रिप्लेस करणारा खेळाडू भारतातून लगोलग बोलवणे कोरोंटाईन नियमामुळे अवघड असल्याने संघात जास्तीच्या खेळाडूंची गरज होती. आपल्याला माहीतीच आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या खेळाडूंना दुखापतींनी हैराण केले होते. शेवटी गाबाच्या अंतिम कसोटीत भारताला अकरा जणांचा संघ निवडणेही किती कठीण गेले होते.
भारताने आपला २० जणांचा संघ निवडताना वेगवान व फिरकी गोलंदाजांचा भक्कम ताफा उभा केला आहे. परंतु फलंदाजांची फळी जरा काहीशी कमजोर वाटते. सलामीवीर म्हणून रोहीत शर्माचे स्थान पक्के असले तरी इंग्लंडमध्ये कसोटीत तो प्रथमच सलामीवीराची भूमिका बजावणार असल्याने त्याच्याची कामगिरी विषयी शाश्वती देता येणार नाही. तर शुभमन गिलने ऑस्ट्रेलियात जोरदार सुरूवात केल्यानंतर मायदेशात इंग्लंडविरूध्द चारही कसोटयात सपशेल फेल गेला असल्याने त्यालाही आपले कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. शिवाय तिसरा सलामीवीर मयंक अग्रवाल ऑस्ट्रेलियात आपल्या लौकीकाला न्याय देऊ शकला नव्हता.
मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा कडून मोठया अपेक्षा आहेत. परंतु सध्या त्याच्याही कामगिरीत सातत्य नसते. कर्णधार विराट कोहलीही सध्या विशेष टच मध्ये दिसत नसून दोन वर्षांपासून त्याच्या बॅटमधून शतक दिसले नाही. तर त्याच्या कमकुवत दुव्यांचा विरोधी संघांने विशेष अभ्यास केला असल्याने त्याचे शुन्यावर बाद होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हि बाब भारतासाठी चिंतेची ठरू शकते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीच्या गैरहजेरीत अफलातून नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य राहाणे कडून फार मोठया अपेक्षा आहेत. तसे बघाल तर परदेशात त्याची फलंदाजी चांगलीच बहरते. विशेष म्हणजे कसोटीत त्याने केलेल्या शतका वेळी भारत कधीही पराभूत झाला नाही. परंतु अजिंक्यपुढेही सातत्यपूर्ण खेळ करण्याचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरूध्द यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने चमकदार खेळ केल्याने त्याची इमेज सुधारली आहे. परंतु इंग्लिश गोलंदाज त्याला सहजा सहजी यशस्वी होऊ देणार नाहीत.
के एल राहुलवर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने त्याचे संघात निवडणे अनिश्चित वाटते. अष्टपैलू हार्दीक पांडया निवड समितीला प्रभावित करण्यात अपयशी ठरला. तर सध्या तुफान फॉर्मात असलेला पृथ्वी शॉ आपले नाणे वाजविण्यात अपयशी ठरला. वास्तविक श्रेयस अय्यर व सुर्यकुमार यादव यांना संघासोबत ठेवायला हवे होते. हनुमान विहारी संघात असला तरी त्याला किती संधी मिळते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
रविंद्र जडेजा व रविचंद्रन आश्विन हे फिरकी गोलंदाज चांगल्यापैकी फलंदाजी करू शकत असल्याने ते अंतिम संघात स्थान मिळवू शकतात. कदाचित खेळपट्टी व वातावरण बघून यापैकी एखादा जण वगळलाही जाऊ शकतो. अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर हे देखील संघात असल्याने गरजेनुसार त्यांनाही संधी मिळू शकते.
जलदगती गोलंदाजात जसप्रित बुमराहा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज संघ प्रबंधनाची पहिली पसंत ठरू शकतात. तर शार्दूल ठाकूर आपल्या फलंदाजी करण्याच्या क्षमतेमुळे संघात स्थान मिळवू शकतो. ईशांत शर्मा, व उमेश यादव हे देखील आपला दावा सांगण्यात सक्षम आहे. यामध्ये भुवनेश्वर कुमारचे नाव नसल्याने आश्चर्य वाटले.
राखीव खेळाडूत अभिमन्यू ईश्वरन हा सलामीवीर, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा व अर्जुन नागवसवाला यांचा समावेश आहे.
इंग्लंडमध्येच नव्हे तर परदेशात खासकरून सेना देशात भारताची फलंदाजी विशेष यशस्वी ठरत नसल्याने भारताची या देशांमधील कामगिरी समाधानकारक नाही. शिवाय इंग्लंडने भारताचा नुकताच जो दौरा केला त्यामध्ये त्यांना फिरकीला धार्जीण्या खेळपट्यांवर खेळावे लागल्याने यावेळी इंग्लिश क्रिकेट बोर्ड भारताला हिरवा गालीचा नक्कीच देईल हे मात्र खरं ! त्यामुळे इंग्लिश जलदगती गोलंदाज या दौऱ्यात खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाजांची सत्व परिक्षा घेणार हे परमसत्य असणार !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

