प्रतिनिधी । सुर्यकांत होनप:
मुंबई : वाहन चालवण्याच्या शिकाऊ परवान्यासाठी
(लर्निंग लायसन्स) प्रादेशिक परिवहन कार्यालयात
(आर.टी.ओ.) जाऊन परीक्षा द्यावी लागते.
आता ही परीक्षा घरबसल्या ऑनलाइनही देणे शक्य होणार आहे.
त्यासाठी आधार क्रमांक जोडणे आवश्यक असून फक्त ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पार पाडावी लागेल.
राज्यात दर दिवशी वाहनांची संख्या वाढत आहे.
त्याचप्रमाणे शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हा परवाना मिळवण्यासाठी अनेक खटाटोप करावे लागतात. परिवहनच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करताना बरीच माहिती भरावी लागते.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आर.टी.ओ.कडून उपलब्ध सत्रानुसार वेळ दिली जाते.
कधी कधी या परीक्षेची तारीख पटकन मिळते,
नाही तर किमान एक महिना तरी प्रतीक्षा करावी लागते.
हा खटाटोप टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.
त्यासाठी परीक्षार्थीकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. परीक्षा देण्यासाठी परिवहनच्या संकेतस्थळावर जावे लागणार आहे.संकेतस्थळावरील उपलब्ध सारथी सेवेत प्रवेश करताच परवाना सुविधा उपलब्ध होईल.
त्यात आधार क्रमांक नमूद केल्यानंतर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती येईल आणि तो अर्ज करू शकेल.
शिकाऊ परवान्यासाठी घरात बसून ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे.
त्यामुळे आर.टी.ओ.त येण्याची गरज लागणार नाही.
ही नवीन योजना एका आठवड्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे, परंतु आर.टी.ओ.त येऊन परीक्षा देण्याचा पर्यायही कायम असेल.
अविनाश ढाकणे,
परिवहन आयुक्त

