भारताचा संघ येत्या २ जून पासून इंग्लंड दौऱ्यावर जात असून या तीन महीन्यांच्या लांबलचक दौऱ्यात भारतीय संघ सर्वप्रथम १८ जून पासून साऊथॅम्पटन येथे विश्व कसोटी अजिंक्यपदाची फायनल न्यूझिलंड विरूध्द खेळणार असून त्यानंतर हा संघ इंग्लंडविरूध्दही पाच कसोटींची मालिका खेळणार आहे. फक्त कसोटी सामने असलेल्या या दौऱ्यासाठी भारताने २० जणांचा संघ घोषित केला असून सोबत चार राखीव खेळाडूही निवडले आहेत. त्यामध्ये तीन वेगवान गोलंदाज असून एकमात्र फलंदाज आहे तो उजव्या हाताने खेळणारा सलामीचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन !
उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे ६ सप्टेंबर १९९५ रोजी जन्मलेल्या अभिमन्यू ईश्वरनने बंगाल रणजी संघातून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. २५ वर्षाच्या अभिमन्यूने सन २०१८-१९ रणजी सत्रात आपल्या बॅटने जोरदार करिश्मा करताना अवघ्या ६ सामन्यात ८६१ धावा ठोकल्या.या चांगल्या कामगिरीचे फळ म्हणजे सन २०१८ च्या दुलिप ट्रॉफीसाठी शेष भारत संघात त्याला स्थान मिळाले. अंतिम सामन्यात त्याने केलेल्या १५३ धावांनी त्याला भारत अ संघाचा दरवाजा उघडून दिला. याच वर्षी इंग्लंडने भारताचा दौरा केला. त्या दौऱ्यातही तो भारताच्या संघात राखीव खेळाडू म्हणून सामील होता. आता तर थेट इंग्लंड दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात तो राखीव खेळाडूत समाविष्ट आहे. सध्या कोरोनाने जगभर घातलेल्या थैमानाने क्रिकेटपटूंनाही सोडले नसल्याने व खेळाडूंचे जखमी होण्याचे प्रमाण बघता अभिमन्यूने भारतीय संघाचा मुख्य दरवाजा भेदून संघात प्रवेश केल्यास कोणीही आश्चर्य मानू नये.
अभिमन्यूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी लक्षवेधी असून ६१ सामन्यात ४९.९६ च्या सरासरीने १३ शतके व १७ अर्धशतकांच्या मदतीने त्याने ४२२७ धावा जमविल्या आहेत. त्याच्यातील गुणवत्ता हेरून निवड समितीने भविष्यातला खेळाडू म्हणून त्याच्यावर गुंतवणूक करायला सुरुवात केली ही नक्कीच स्पृहणीय अशीच बाब म्हणावी लागेल.अभिमन्यूचे वडिल आरपी ईश्वरन सुप्रसिद्ध चार्टर्ड अकौंटट असून त्यांनी अनेक वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील पुरकुल गावात क्रिकेट अकॅडमी सुरू केली असून अभिमन्यूने तेथेच क्रिकेटची बाराखडी शिकायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने दिल्ली मार्गे बंगाल असा क्रिकेट प्रवास करत बंगालच्या रणजी संघाचे कर्णधारपदही मिळविले.
सध्या देशात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सक्रिय क्रिकेट बंद आहे. त्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्याच्या दृष्टीने तयारी करणे अवघड जात असले तरी डेहराडून मधील पुरकुल येथील स्वतःच्या क्रिकेट अकॅडमीत तो आपल्या प्रशिक्षकांच्या मदतीने सराव करत असून इंग्लंडमधील वातावरण, खेळपट्टया या सारखे वातावरण तेथे त्याने तयार केले आहे. विविध सत्रात तो तेथे आपला सराव करत आहे.
इंग्लंडमध्ये ज्या प्रकारे स्विंगला साथ देणाऱ्या खेळपट्टया आहेत तशा खेळपट्टयांवरील सराव त्याला मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यात मदत करेल. तर शिवाय बीसीसीआय त्याला आतंरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव व ड्रेसिंग रूमचे वातावरण बघण्याची जी संधी त्याला देत आहे ती नक्कीच अभिमन्यू व भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्वल असल्याचे संकेत देत आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

