भारत आणि न्यूझिलंड यांच्या दरम्यान येत्या १८ जून पासून इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन कौंटीच्या रोझ बाऊल मैदानावर कसोटी क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार असून या सामन्याद्वारे जागतिक क्रिकेटला कसोटीचा खराखुरा बादशहा मिळणार आहे. या सामन्यासाठी न्यूझिलंड संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असून भारताबरोबरील सामन्यापूर्वी ते इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळून स्वतःला तयार करणार आहेत. तर भारताचा संघ २ जूनला इंग्लंड साठी रवाना होईल. सध्या भारतीय संघ मुंबईत एका विशेष बायो बबलमध्ये कॉरंटाईन झाला आहे.
कसोटी क्रिकेटचा विश्वविजेता ठरविणारा हा सामना सर्वच दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. सध्या कोरोनाच्या अति प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांना स्टेडीयममध्ये जाऊन सामना बघण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र इंग्लिश क्रिकेट बोर्ड व आयसीसी या सामन्यास चार हजार प्रेक्षकांना प्रत्यक्ष मैदानात जाऊन सामना बघण्यास परवानगी देणार आहे. या सामन्यास ज्यादा तर भारतीय प्रेक्षकच आपल्याला प्रत्यक्ष मैदानात सामना बघताना दिसल्यास आश्चर्य मानू नये.
केवळ चार हजार प्रेक्षकच स्टेडीयममध्ये सामन्याचा आस्वाद घेणार असले तरी जगभरातील कोट्यावधी क्रिकेट शौकीन आपल्या घरी बसून दूरचित्रवाणीवर हा सामना बघू शकणार आहे. त्यासाठी आयसीसीने विशेष नियोजन केले असून या सामन्याच्या थेट प्रक्षेपणा वेळी पाच सदस्यीस समालोचकांची निवड केली आहे.घरात बसून सामने बघणाऱ्या प्रेक्षकांना आपल्या ओघवत्या वाणीने मंत्रमुग्ध करणाऱ्या या पाच समालोचकात तटस्थ समालोचक म्हणून इंग्लंडचे दोन माजी कर्णधार नासिर हुसेन व मायकेल आथरटन यांचा समावेश असेल. तर न्यूझिलंड व भारत यांच्याही समालोचकांना सहभागी करून घेतले आहे. यामध्ये न्यूझिलंडकडून सायमन डुल व भारताकडून महान क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनिल गावस्कर व सर्वांना आश्चर्याचा धक्का देत अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त न झालेला भारताचा सध्या संघात नसलेला यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा समावेश असेल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस वाहीनी व त्यांच्या संलग्न चॅनेलवरून केले जाणार आहे.
या पाच सदस्यीस कॉमेंटेटर पॅनेलमधील सदस्यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ या.
२३ मार्च १९६८ रोजी लॅंकेशायर कौंटीतील फेल्सवर्थ येथे जन्मलेल मायकेल अँड्रयू आथरटन हा माजी इंग्लिश कर्णधार सक्रिय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर समालोचक म्हणून नावारूपाला आला. इंग्लंड कडून ११५ कसोटी व ५४ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचा अनुभव असलेल्या मायकेलचे क्रिकेट ज्ञान विस्तृत आहे.
२८ मार्च १९६८ रोजी मद्रास येथे रझा जावेद हुसेन यांचा सुपुत्र असलेला नासिर याचा जन्म झाला. पुढे जात तो इंग्लंड क्रिकेट संघात समाविष्ट झाला. आपल्या सातत्यपूर्ण खेळाच्या बळावर तो इंग्लंड संघाचा अविभाज्य घटक बनला. नासिर इंग्लंडकडून ९६ कसोटी व ८८ वनडे सामने खेळला आहे. एक कर्णधार म्हणून त्याचा इंग्लिश संघावर चांगलाच वचक होता. एक समालोचक म्हणून निर्भिड मत मांडण्यास तो प्रसिद्ध आहे.
६ ऑगष्ट १९६९ रोजी न्यूझिलंडमधील ऑकलंड मध्ये जन्मलेला सायमन डुल न्यूझिलंडकडून वेगवान गोलंदाज म्हणून नावारूपाला आला होता. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्याने समालोचन क्षेत्र निवडण्याचा निर्णय घेतला. सोज्वळ मनाचा डुल सडेतोड समालोचक असून सन २०१९ च्या आयपीएल सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने अतिशय निराशजनक कामगिरी केली होती. तेंव्हा डुल याने समालोचन करताना आरसीबीच्या खेळावर टिका केली होती. यावर चिडून आरसीबीचा चाहता असलेला धर्नेश मूर्ती याने सायमन डुल याला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
१० जुलै १९४९ रोजी मुंबईत जन्मलेले सुनिल मनोहर गावस्कर भारतीय क्रिकेटमधीलच नव्हे तर संपूर्ण जागतिक क्रिकेटमधील आदरणीय व्यक्तीमत्व आहे. भारताकडून १२५ कसोटी व १०८ एकदिवसीय सामने खेळताना भारतीय संघाचं यशस्वी नेतृत्वही केलं आहे. क्रिकेटपटू म्हणून १६ वर्ष तर एक समाचलोक म्हणून ३३ वर्षांचा त्यांचा अनुभव त्यांच्या विषयी खूप काही सांगून जातो. सडेतोड व निर्भिड समालोचक म्हणून ते ख्यातनाम आहेत.
१ जून १९८५ रोजी तामिळनाडूतील मद्रास येथे जन्म झालेला दिनेश कार्तिक असूनही क्रिकेट खेळाडू म्हणून सक्रिय आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेला दिनेश भारतासाठी २३ कसोटी व ७९ वनडे व १८ टि २० सामने खेळला आहे. अद्याप तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला नाही, तसेच त्याला समालोचनाचा विशेष अनुभवही नसल्याने या समालोचन पॅनेलमध्ये त्याची झालेली निवड आश्चर्यकारक वाटते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

