shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उमेश यादवला डावलणे म्हणजे संपविण्याचा प्रकार नाही ना ?



                      ४८ कसोटयात १४८ बळी, ३५९ धावा, १७ झेल, ४ धावबाद. ७५ एकदिवसीय सामन्यात १०६ बळी, ७९ धावा, २२ झेल, ६ धावबाद. ७ टि-२० सामन्यात ९ बळी, २ धावा, ३ झेल व १ धावबाद.  १२१ आयपीएल सामन्यात ११९ बळी, १२२ धावा, २९ झेल, ८ धावबाद. ताशी १५० किलो मीटर वेग. अशी शानदार कामगिरी. भारताकडून सर्वाधिक बळी बळी घेणाऱ्या डावखुरा वेगवान गोलंदाज दस्तुर खुद्द झहीर खानने त्याला भारतीय संघात घेण्याची शिफारस केली. तर, गॅरी सोबर्स आणि ग्लेन मॅकग्रथ यांनी त्याच्या गोलंदाजीची प्रशंसा केली. शिवाय डेल स्टेन जो खुद्द जगातील सर्वात वेगवान गोलंदाज होता,  ते याचे चाहते आहेत. त्याच्या वेगवान गोलंदाजीची शैली बघून अनेक माजी क्रिकेटपटू प्रभावित झाले. जवागल श्रीनाथ नंतर भारतात कसोटीत दहा बळी घेणारा एकमेव वेगवान गोलंदाज. असा उमेश यादव आज भारताच्या संघात असूनही दुर्लक्षित आहे. 
                               
उमेश यादव आजही भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. परंतु काही प्रस्थापित, नव्याने आलेल्या व येऊ पाहात असलेल्या गोलंदाजांमुळे पुर्णपणे झाकोळला आहे. एक वेळ मोहम्मद शमी, ईशांत शर्मा यांच्या संगतीने धारदार मारा करून संघात स्थान पक्के असणारा उमेश जसप्रित बुमराहाच्या आगमना नंतर क्रिकेटच्या तिनही प्रारूपांतून डावलला गेला आहे.
                              
भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तेथे न्यूझिलंडविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपदाची फायनल व इंग्लंडविरूध्द पाच कसोटींची जंबो मालिका खेळली जाणार आहे. तेथील वातावरण जलदगती गोलंदाजांना पोषक आहे. एका कसोटीत ३ ते ४ वेगवान गोलंदाज खेळविले जाऊ शकतात. परंतु आजच्या स्थितीत उमेश यादवला पहिल्या अकरा जणात स्थान मिळण्याची सुतराम शक्यता नाही. 
                              
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याच्या पायाला दुखापत झाली. पारिणामतः तो सामनाच नव्हे तर उर्वरीत दोन कसोट्यांनाही तो मुकला. त्याच्या जागी आलेल्या नवोदित मोहम्मद सिराजने  मिळालेल्या संधीचे सोने केले. त्या बळावर त्याला भारतात इंग्लंड विरूध्द झालेल्या ४ पैकी २ कसोट्यात संधी मिळाली. त्याच मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यात उमेश संघात होता. परंतु पहिल्या अकरा जणांत त्याला स्थान मिळाले नाही.
                               
१८ जून पासून साऊथॅम्प्टन येथे न्यूझिलंड विरूध्दच्या सामन्यासाठी अंतिम संघ निवडण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहे. त्या सामन्यात तीन वेगवान व दोन फिरकी गोलंदाजांना संधी देण्याची शक्यता असून संघ प्रबंधन जसप्रित बुमराहा, मोहम्मद शमी, व ईशांत शर्मा यांना संधी देण्याची शक्यता आहे. जर त्यावेळी वातावरण व खेळपट्टी जर वेगवान गोलंदाजांना पोषक असेल तर चौथा वेगवान गोलंदाज देखील खेळविला जाऊ शकतो. परंतु प्राथमिक माहिती नुसार तो चौथा वेगवान गोलंदाज उमेश यादव नसून मोहम्मद सिराज असेल असे सध्या होत असलेल्या चर्चेतून जाणवते.
                                
जर ऐनवेळी कोणी वेगवान गोलंदाज जखमी झाला तर त्याच्या ऐवजी शार्दूल ठाकूर संघात येऊ शकतो. इतकेच नव्हे तर राखीव खेळाडूत असलेला आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा तसेच अर्नाझ नागासवाला यांना संधी मिळेल परंतु उमेश यादवला कर्णधार कोहली संघात संधी देण्याची कुठलीही शक्यता नाही.
                                  
विदर्भाचा पहिला कसोटीपटू असलेल्या उमेशला जर अंतिम संघातून वारंवार डावलले गेले तर त्याच्या सारख्या गुणवान गोलंदाजाची प्रतिभा कोमेजली जाईल. उमेश सध्या साडे तेहतीस वर्षांचा असून त्याच्यात बरेच क्रिकेट बाकी असून तो सध्या फक्त कसोटी संघातच निवडला जातो, मात्र अंतिम अकरा जणात त्याला संधी मिळत नाही. तसेच वनडे व टि- २० संघातही त्याच्या साठी दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे उमेशला कसोटी संघात कमीत कमी रोटेशन पॉलिसीनुसार तरी खेळविले पाहीजे. सध्या तरी तशी शक्यता दुरूनही दिसत नाही. 
                                 
तरी संघ प्रबंधनाने उमेशला सापत्न वागणुक न देता संघातील इतर खेळाडूंप्रमाणे संधी द्यावी. उमेश यादव सारखा सदा तंदुरुस्त असलेला तगडा जलदगती गोलंदाज नाहक बळीचा बकरा ठरत असून त्याची वाताहत होऊ न देता त्याला मुख्य प्रवाहातच ठेवावे ही भारतीय क्रिकेट व्यवस्थापनास कळकळीची विनंती !

 लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close