प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील एका २९ वर्षीय विवाहितेवर तिच्या मुलांना सांभाळतो व तिच्याशी लग्न करण्याचे अमिश दाखवून तिच्या पेक्षा वयाने लहान असलेल्या गेवराई तालुक्यातील नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सांगवी (सारणी) येथील एका २९ वर्षीय विवाहितेची ऊस तोडणीच्या कामातून गेवराई तालुक्यातील
काजळवाडी येथील भाऊसाहेब लक्ष्मण आंगुडे या (२७ वर्ष) याच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचा भाऊसाहेब आंगुडे याने गैरफायदा घेऊन त्या पीडित महिलेला तिच्याशी लग्न करतो व तुझ्या मुलांचा सांभाळ करतो; म्हणून तिच्यावर नेकनूर येथील डीटीएड कॉलेजच्या समोर असलेल्या पत्र्याच्या खोलीत तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध केला. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर तिला, मुलांना व तिच्या नवऱ्याला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.
पीडित महिलेने दि.२८ जून रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून नराधम भाऊसाहेब आंगुडे याच्या विरुद्ध गु.र.नं. ३१६/२०२१ भा.दं.वि. ३७६ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन याच्या मार्गदर्शनाखाली यसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा कोळी या पुढील तपास करीत आहेत. दरम्यान आरोपीस दि.२९ जून रोजी न्यायालया समोर हजर केले असता त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

