shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्व कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा " न्यूझिलंडने केली भारताची सावध शिकार !!

अजिंक्यपद स्पर्धा न्यूझिलंडने भारताचा एकतर्फी पराभव करून पहिल्यांदाच विश्वविजेते बनण्याचे स्वप्न साकार केले. तसे बघाल तर न्यूझिलंडने सन २००० मध्ये चॅंपियन्स करंडक भारतालाच हरवून जिंकला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षाची प्रतिक्षा करताना दोन वेळा आयसीसीच्या स्पर्धात अंतिम सामन्यात अपयश पचवले होते. न्यूझिलंडने खेळाच्या सर्वच क्षेत्रात भारताला शह देत साऊथॅम्प्टन येथील अंतिम सामना खिशात टाकला.

                        

खराब वातावरण, पावसाचा व्यत्यय, सुर्याचा लपंडाव या सर्वांचा मुकाबल करत बलाढय भारतीय संघाला न्युझिलंडने अगदी नियोजनबद्ध खेळ करत चित केलं. न्यूझिलंडच्या विजयाचे वैशिष्टये म्हणजे या सामन्यात न्यूझिलंडने भारताच्या प्रत्येक खेळाडूचा बारकाईने केलेला अभ्यास व त्यावर केलेले परिश्रम होय !
                       
न्यूझिलंड हा अवघी ५५ लाख लोकसंख्या असलेला देश. अतिशय शिस्तबद्ध व समोरच्याची इज्जत करण्याची अनोखी मनोवृत्ती, स्वतःविषयी कुठलाही बडेजाव न करता 'आपले काम भले व आपण भले ' या साध्या सत्वप्रणालीने चालणारे ही न्यूझिलंडची मंडळी शांत व संयमाने आपले कर्तव्य बजावत आले आहेत. या अंतिम सामन्यात निसर्गाने त्यांच्यावर अतिशय कृपा केली. त्यांना मायदेशात सवय असलेले वातावरण, परिस्थिती, खेळपट्टी त्यांच्या मनाप्रमाणे आपोआप मिळाली. एवढया सगळ्या संधीचा अचूक लाभ त्यांनी उठविला नसता तर नवलच ठरले असते. परंतु त्यांनी जिगरबाज खेळ व कुठलाही उतावीळपणा न करता त्यांना भारतीय खेळाडूंना हसत खेळत पुरते जेरबंद केले. 
                        
न्यूझिलंडने या सामन्यात संघ निवडताना आपल्या बलस्थानांचा बारकाईने अभ्यास करून संघ निवडला. जेथे विरोधी भारतीय संघाने दोन फिरकी गोलंदाज खेळविले असताना त्यांनी आपले नियोजन विस्कळीत होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन फिरकी गोलंदाज संघात न घेता पाच वेगवान गोलंदाज खेळवून भारतीयांना पहिल्याच चालीत मानसिकदृष्टया खच्ची केले.
                         
पहिल्या डावात भारताची सलामी जरी चांगली झाली असली तरी त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या एकाही फलंदाजाला स्थिरावू दिले नाही तर दुसऱ्या डावात त्याही पेक्षा तिखट मारा करत भारताला सावरायची संधीच दिली नाही. त्याउलट न्यूझिलंडच्या तळाच्या फलंदाजांनी पहिल्या डावात डाव गडगडला असताना प्रतिहल्ला करत छोटेखानी का होईना आघाडी मिळवून भारताला खिंडीत पकडले. हा मनोवैज्ञानिक लाभ त्यांना विजय मिळविण्यात फायदेशीर ठरला.
                         
न्यूझिलंडचा कर्णधार केन विल्यमसन विराट कोहलीच्या तुलनेत सर्वच बाबतीत उजवा ठरला. संघ निवडीपासून ते सामना जिंकेपर्यंत त्याची प्रत्येक चाल यशस्वी झाली. तर कोहलीचे प्रत्येक नियोजन चुकीचे ठरले.
                          
आयसीसी स्पर्धांचा विचार केला तर न्यूझिलंडने प्रत्येकी वेळी भारतावर कुरघोडी केली आहे आणि याही सामन्यात त्यांनी तोच कित्ता गिरवून भारताला डोके वर काढण्याची कोणतीही संधी दिली नाही. सन २००० ची चँपीयन्स ट्रॉफी, सन २०१९ ची विश्वचषक उपांत्य फेरीही न्यूझिलंडच्या भारतावरील वर्चस्वाचा एक भागच म्हणावा लागेल.
                          
आयपीएल ही भारताचीच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी व लोकप्रिय लिग होय. याच आयपीएलमध्ये न्यूझिलंडचे बरेच खेळाडू खेळतात. भारतीय वातावरण व भारताच्या खेळाडूंचा त्यांनी मोठा अभ्यास केला. त्याचा लाभ त्यांना या विजेतेपदाच्या रूपाने मिळाला. याचे उदाहरणच बघायचे तर विराट कोहलीने त्याच्या आरसीबी संघात न्यूझिलंडचा स्टार गोलंदाज काईल जेमिसनला घेतले. जेमिसनच्या गोलंदाजीचा जवळून अभ्यास करता यावा व त्याच्या गोलंदाजीवर सराव मिळावा हा त्या मागचा कोहलीचा उद्देश होता. परंतु जेमिसनने कोहलीला त्याच्या गोलंदाजीचा सराव मोठया प्रमाणात दिला तर नाहीच उलट कोहलीचेच कच्चे दुवे बारकाईने अभ्यासले व प्रत्यक्ष अंतिम सामन्यात दोन्ही डावात कोहलीचाच काटा काढून न्यूझिलंडच्या यशाची मुहुर्तमेढ रचली. जेमीसनची गोलंदाजीच या सामन्याचा टर्निंग पाँईट ठरली.
                              
भारताचे खेळाडू न्यूझिलंडच्या खेळाडूंच्या तुलनेत अधिक प्रकाशझोतात असतात त्यामुळे विजेतेपदाचे दावेदार भारतच होते. परंतु न्यूझिलंडने आपल्यावर कुठलाच दबाव येऊ न देता भारताला पराभवाच्या खाईत ढकलले आणि मोठया दिमाखात कसोटीचे जगज्जेतेपद मिळवित मानाची गदा पटकविली.
                              
जगातील इतर संघ भारतासमोर लोटांगण घेत असताना न्यूझिलंडचा संघ भारतावर जगाच्या पाठीवर कुठेही कुरघोडी कशी काय करतो. हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे.
                                
न्यूझिलंडने सावधपणे अचूक जाळे विणून भारताची शिकार केली ही तमाम क्रिकेट प्रेमींना थक्क करणारी घटना होय.  कसोटी क्रिकेटचे पहिले विश्वविजेते बनल्याबद्दल न्युझिलंड संघाचे अतिविशेष अभिनंदन !!

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close