१८ ते २३ जून २०२१ दरम्यान पहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. मागील दोन वर्ष ९ संघ आपसात लढले व त्यातील गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेले भारत व न्यूझिलंड हे दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. भारताने अवघड परिस्थितीवर मात करून अंतिम सामन्यासाठी स्थान पक्के केले, तर तुलनेने न्यूझिलंडचा मार्ग सोपा होता. त्यामुळे विजेतेपदासाठी अनेकांनी भारताला पहिली पसंती दिली होती.
प्रत्यक्ष सामन्याच्या काळात पाऊस व अपुरा सुर्य प्रकाशाने जवळ जवळ अडीज दिवस वाया गेले. तरीही सामना निकालात निघाला. दुर्देवाची गोष्ट म्हणजे हा कौल भारताच्या विरोधात गेला. भारताचा पराभव अनपेक्षित असल्याने जगभरातील भारताचे हितचिंतक निराश झाले. त्यानंतर संपूर्ण क्रिकेट जगतात विविध विचारधारांच्या लोकांचे विविध मतं प्रसिध्दी माध्यमातून बाहेर येऊ लागले. त्यामध्ये प्रथम क्रमांक होता विराट कोहलीच्या नेतृत्वाचा !
२० जून २०११ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीच्या सक्रीय अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला याच सामन्याच्या काळात दहा वर्ष पूर्ण झाले. या दशक पूर्तिचा आनंदमय नजराना कसोटी विश्व अजिंक्यपदाच्या रूपात कोहली समस्त भारतीय क्रिकेट रसिकांना देईल अशी अपेक्षा होती. परंतु २३ जूनला त्याने सर्वांचा हार्ट फेल होईल असा ४४० होल्टचा पराभवाचा झटका दिल्याने त्याच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले.
सन २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतर तेंव्हाचा उपकर्णधार असलेल्या कोहलीच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली. तत्पूर्वी सन २०१२ पासून त्याला आयपीएलमध्ये आरसीबीचे नेतृत्व करण्याचा अनुभव होता. शिवाय दिल्लीचं रणजी स्पर्धेत कर्णधारपदही त्याने भूषविलं होतं. तर सन २००८ मध्ये १९ वर्षाखालील मुलांचा विश्वचषकही त्याच्या नेतृत्वात भारताने जिंकला होता.
आक्रमक स्वभाव व ठरवलेली गोष्ट करायचीच ही मनोवृत्ती असलेल्या कोहलीला स्वतःची मनमानी करण्याची मोठी सवय झाली. त्याला हवे ते तो करू लागला. शिवाय एक फलंदाज म्हणून चांगलं यश मिळत गेलं व कर्णधारपद प्राप्त झाल्यानंतर त्याची मनमानी आणखीच वाढली. संघ निवडताना त्याला पाहिजे त्या खेळाडूला तो झुकते माप देत असे. त्यामुळे त्या विशिष्ट जागेसाठी लायक असलेल्या खेळाडूच्या भावना दुखावत असतील. कोहलीच्या मनमानीमुळे कसोटीत भारतातर्फे दुसरंच त्रिशतक ठोकणारा करूण नायर, कसोटीत शतक ठोकणारा जयंत यादव सारखा गोलंदाज, कुलदिप यादव सारखा दुर्मिळ चायनामन गोलंदाज पडद्याआड गेले. अजूनही काही गुणवान खेळाडूंवर त्याच्याकडून अन्याय झाले असतील ?
काही जिगरबाज खेळाडूंच्या बळावर संघाला विजय मिळत गेले. त्यामुळे त्याचा रूतबा वाढत गेला. बीसीसीआयने त्याला काही बाबीत मोकळीक दिल्याने तो जास्तच ताकदवान बनला. याच काळात जबरदस्त नैपुण्य असलेले काही दमदार खेळाडू संघात असल्याने कोहलीला आव्हान मिळू लागले. त्यामुळे बाहेर बोभाटा होत नसला तरी अंतर्गत धुसफूस सुरूच होती.
सन २०१७ च्या आयसीसी आयोजित चँपियन्स करंडक स्पर्धेदरम्यान त्याचे व तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळेचे काही मुद्द्यांवर पटत नव्हते. त्यांच्या या वादाचा परिणाम अंतिम सामन्यात पाकिस्तानविरूध्द पराभवात झाला. त्या सामन्यानंतर कुंबळेची प्रशिक्षक पदावरून गच्छंती झाली व खास कोहलीच्या आवडीचा प्रशिक्षक रवी शास्त्री आला. त्यानंतर कोहलीचा मस्तवालपणा वाढत गेला. त्याचा परिणाम त्याचे काही प्रमुख खेळाडूंशी मतभेद होण्यात झाला.
द्विपक्षीय मालिकांदरम्यान हे खेळाडू संघासाठी चांगले योगदानही देत गेले. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वपदाचा आलेख उंचावत गेला. परिणामत: तो देशातला सर्वोत्तम कर्णधार सिध्द झाला. आयसीसीने याच आकडेवारीच्या जोरावर दशकातील सर्वोत्तम कसोटी कर्णधार म्हणून त्याला निवडले.
त्याच्या विरोधी गटातले खेळाडू त्यामुळे काहीसे अस्वस्थ झाले. मग हे दुखावलेले खेळाडू आयसीसी स्पर्धात महत्वाच्या निर्णायक सामन्यात हातचं राखून प्रदर्शन करतात असं भासू लागलं. याचा परिणाम असा होऊ लागला की कोहली सगळे सामने जिंकूनही करंडक उंचावण्याऐवजी रिकाम्या हाताने परत येतो.
त्याच्या उलट महेंद्रसिंग धोनी शांत व संयमी स्वभावाचा होता. सहकारी खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घ्यायची कला त्याच्याकडे अवगत होती. संघ सहकाऱ्यांना चांगली वागणूक मिळाल्यामुळे ते आपल्या कुवतीपेक्षाही चांगली कामगिरी करायचे. त्याचा परिणाम असा की, धोनीने आयसीसीचे तीन विश्वकरंडक व कसोटीत अव्वल स्थानही मिळविले.
आताच्या संघातले बरेचसे खेळाडू दोघांच्याही नेतृत्वात खेळले असल्याने त्यांना या दोघांमधील फरक समजला आहे. त्यामुळे कोहली महत्वाच्या व निर्णायक सामन्यात यशस्वी होत नाही.
शिवाय कोहलीच्या गैरहजेरीत वनडे व टि-२० मध्ये रोहीत शर्मा व कसोटीत अजिंक्य राहाणेने कोहलीच्या तुलनेत अनेक पट यशस्वी कामगिरी केली आहे. शिवाय रोहीत व राहाणे यांचे स्वभाव धोनीच्या कार्यप्रणालीशी मिळते जुळते असल्याने इतर खेळाडूही त्यांना मनापासून सहकार्य करतात.
कोहलीला जर त्याच्या नेतृत्वात आयसीसी स्पर्धा जिंकायची असेल तर आपल्या मनमानी करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालावा लागेल. सहकारी खेळाडूंवर विश्वास ठेवावा लागेल, तरच तो आयसीसी ट्रॉफी जिंकू शकेल. अन्यथा त्याला कधीही आयसीसी स्पर्धा जिंकता येणार नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

