shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात लोखंडी दाताळाने केली मारहाण : चुलता गंभीर जखमी..!!

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :- 
केज तालुक्यातील दरडवाडी येथे पुतण्याने चुलत्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी दाताळ मारून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


केज तालुक्यातील दरडवाडी येथील गुरुलिंग बारीकराव दराडे व गोरख बारीकराव दराडे हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या सामाईक विहिरीवरून सामाईक पाईप लाईन केलेली आहे. या पाईपलाईनच्या कारणा वरून अनेक वेळा गुरुलिंग दराडे व त्यांचे भाऊ गोरख दराडे आणि पुतणे श्रीहरी दराडे यांच्यात भांडणे होत असतात.

दि. १२ जून शनिवार रोजी सकाळी ११:३० वा. च्या. दरम्यान गुरुलिंग दराडे यांनी त्यांचा भाऊ गोरख दराडे आणि पुतण्या श्रीहरी दराडे यास पाईपलाईनचे टोपण का काढले? असे विचारल्या वरून गुरुलिंग दराडे यांना त्यांचा पुतण्या श्रीहरी दराडे याने शेतातील दाताळ म्हणून ओळखल्या जात असलेल्या लोखंडी औजाराने मारहाण केली. तसेच त्यांचा सख्खा भाऊ गोरख दराडे याने लोखंडी पाईपणे मारहाण केली आणि सिमा दराडे आणि सोनाली दराडे यांनी शिवीगाळ करून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. यात गुरुलिंग दराडे यांच्या कपाळावर खोलवर जखम झाली आहे. आरडाओरड ऐकून जवळच शेतात पाळी घालीत असलेला गुरुलिंग दराडे यांचा मुलगा प्रकाश दराडे हा पळत आला व त्याने सोडवासोडवी केली. तो जखमी वडील गुरुलिंग दराडे यास नेकनूर येथील सरकारी दवाखान्यात घेऊन जात असताना पुन्हा गोरख दराडे याने गाडी अंगावर घालून जीवे मारण्याची धमकी दिली. गुरुलिंग दराडे यांच्यावर नेकनूर येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून नंतर त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले. परंतु जखमी गुरुलिंग दराडे यांची प्रकृती गंभीर होती; म्हणून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील फिनिक्स हॉस्पिटलला दाखल केले आहे. जखमी गुरुलिंग दराडे हे अद्यापही बेशुद्ध आहेत.
गुरुलिंग दराडे यांचा मुलगा प्रकाश याने दि.१४ जून रोजी केज पोलीस स्टेशनला हजर होऊन दिलेल्या तक्रारी नुसार श्रीहरी गोरख दराडे, गोरख बारीकराव दराडे, सिमा गोरख दराडे आणि सोनाली श्रीहरी दराडे यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचे उद्देशाने घातक हत्याराने मारहाण करणे व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे. या आरोपाखाली  गु.र.नं. २९२/२०२१ भा.दं.वि. ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुढील तपास वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे करीत आहेत.
close