shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"कसोटी विश्व अजिंक्यपद अंतिम सामना" भारताला अंतिम सामन्यास पात्र ठरविणारेच संघाबाहेर .

शुक्रवार, दिनांक - १८ जून २०२१ रोजी इंग्लंडमधील हँपशायर कौंटीच्या साऊथॅम्प्टन रोझ बाऊलवर आयसीसीद्वारे आयोजित पहिल्या " वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशीप " स्पर्धेचा अंतिम सामना सुरुवात होणार असून या अविस्मरणीय अशा अंतिम सामन्यात खेळण्याचा मान मिळविला आहे तो भारत व न्यूझिलंड या दोन संघांनी मागील दोन वर्षांपासून सर्व जगभर कोरोना व्हायरसची दहशत असल्याने कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी प्रत्येक संघ एक मोठा जथ्या घेऊन जातो. तसा या दौऱ्यावर तटस्थ अशा इंग्लंडमध्ये दोन्ही संघ घेऊन आले आहेत. मात्र आयसीसीच्या नियमाप्रमाणे या अंतिम सामन्यासाठी पंधरा खेळाडूंचाच संघ देणे बंधनकारक होते. त्याप्रमाणे दोन्ही संघांनी आपापले प्रत्येकी १५ खेळाडूंचे संघ जाहीर करून आयसीसीच्या नियमांचे पालन केले.

                         

दौऱ्यावर नेलेल्या २० नियमीत व ४ राखीव खेळाडूंमधून १५ खेळाडूंचा संघ भारताने जाहीर केला. या संघावर एक नजर टाकल्यास या मध्ये सहा निव्वळ फलंदाज, दोन यष्टीरक्षक, दोन फिरकी गोलंदाज व पाच जलदगती गोलंदाज प्राथमिक संघात समाविष्ठ आहे.
                        
या संघात रोहीत शर्मा व शुभमन गिल हे दोनच सलामीवीर असल्याने त्यांची अंतिम अकरा जणांच्या संघातील जागा पक्की आहे. मात्र हे दोघेही प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटीत सलामीवीराची भूमिका बजाविणार आहेत. ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण केल्यानंतर शुभमन गिल चांगलं खेळून नावारूपाला आला. मात्र इंग्लंडविरूध्दच्या चार कसोटयात सफसेल अपयशी ठरला. त्यामुळे त्याची निवड आश्चर्य कारक मानली जाते. विशेष म्हणजे के.एल.राहुल व मयंक अग्रवाल यांना डावलून तो संघात निवडला आहे.
                           
रोहित शर्मा अनुभवी असला तर तो सुद्धा कसोटीत इंग्लंडमध्ये प्रथमच सलामीवीर म्हणून खेळणार आहे. मात्र गिल व रोहित यांच्या यशापयशावरच या सामन्यात भारताचं भवितव्य ठरणार आहे. या जोडीने चांगली सलामी दिली तर नंतरचे फलंदाज बिनधास्त खेळून धावा वाढवू शकतात. जर गिल -रोहित ही जोडी अपयशी ठरली तर नंतरच्या फलंदाजांवर दबाव येऊन डाव कोलमडण्याची शक्यता आहे. न्यूझिलंडकडे असलेला वेगवान गोलंदाजांचा फौजफाटा व त्यांची वैविध्य पूर्ण गोलंदाजी भारतीय डावाला लगाम घालू शकते.
                          
चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य राहणे यांची निवड  अपेक्षेप्रमाणे झाली. या सर्वांना कव्हर म्हणून हनुमान विहारीची निवड झाली आहे, पण तो अंतिम अकरा जणांच्या संघात असण्याची सुतरामहही शक्यता नाही.
                          
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंत व वृध्दीमान साहा यांची निवड झाली असली तरी ऑस्ट्रेलियात मिळालेल्या संजिवनी बुटीनंतर रिषभ पंतच्या खेळात बहार आली आहे. त्यामुळे वृध्दीमान साहा अंतिम संघात दिसणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे.
                          
न्यूझिलंड संघात डावखुऱ्या फलंदाजांचा मोठा भरणा असल्याने रविचंद्रन आश्विन व रविंद्र जडेजाची निवडही अपेक्षित अशीच आहे. अंतिम संघ निवडताना जर काही जादू झाली नाही तर हे दोघेही आपल्याला रोझ बाऊलवर खेळताना दिसतील.
                            
या संघात जसप्रित बुमराहा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव व मोहम्मद सिराज यांचा समावेश असला तरी अंतिम संघात उमेश यादव नसणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. तीनच वेगवान गोलंदाज खेळवायचे ठरल्यास ईशांत व सिराज यांच्यातील एक जण संघात असेल. किंवा चार वेगवान व एक फिरकी गोलंदाज असं समीकरण ठेवलं तर जडेजा व आश्विन यांच्यातील एकाला बाहेर बसावे लागेल. परंतु संघ व्यवस्थापनाने असे न करता दोन फिरकी व तीन वेगवान गोलंदाज खेळविणे जास्त योग्य ठरेल. कारण जडेजा - आश्विन चांगल्या प्रकारे फलंदाजीही करू शकतात. त्यांच्या फलंदाजीची या सामन्यात तरी मोठी गरज लागण्याची शक्यता आहे.
                           
केवळ १५ जणांचा संघ निवडण्याचे बंधन असले तरी आज ज्या अंतिम सामन्यासाठी भारताचा हा संघ पात्र ठरला त्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या तीन खेळाडूंना वगळल्याने काहीसं आश्चर्य वाटतं.
                           
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गाबाच्या निर्णायक कसोटीत पहिल्या डावात भारताचा संघ कोलमडला असताना नवख्या शार्दूल ठाकूर (६७ धावा ) वॉशिंग्टन सुंदर ( ६२ धावा ) यांच्या १२३ धावांच्या भागिदारीने भारत ऑस्ट्रेलियाच्या धावांच्या जवळ पोहोचले. शिवाय याच सामन्यात ठाकूरने ( ३ + ४ ) असे एकूण ७ बळी घेतले तर सुंदरनेही ( ३ + १ ) असे ४ बळी दुसऱ्या डावात निर्णायक क्षणी २३ धावा ठोकून विजयात वाटा उचलला. या विजया मुळेच भारताचा अंतिम सामन्याकडे पोहण्याचा प्रवास सुरू झाला. 
                          
त्यानंतर इंग्लंडविरूध्द पहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतर कसोटी पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने तीन कसोट्यात २६ बळी घेऊन इंग्लंडला ३-१ असे लोळविण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच भारताचं अंतिम सामन्याचं तिकीट बुक झालं.
                             
ठाकूर, सुंदर व अक्षर यांच्या शानदार कामगिरी नंतरही ते संघाबाहेर आहेत. या महत्वाच्या सामन्यात त्यांची हाय लागली नाही तर भारतीय संघाला विजय मिळविणे सुलभ जाईल. अन्यथा आपल्याला ठाऊकच आहे, कोहलीला आयसीसी स्पर्धा धार्जिण नाही !

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close