shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कसोटी क्रिकेट विश्व अजिंक्यपद स्पर्धा अंतिम सामना..!!

" पावसाच्या सावटात वर्चस्वाचा महासंग्राम "
गेली कित्येक दिवस आपण ज्या घटकेची वाट बघत होतो तो क्षण आला आहे. इंग्लंडमधील हँपशायर कौटींच्या साऊथॅम्प्टन स्थित एजिस बाऊलवर कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षात प्रथमच कसोटी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट ठरविण्यासाठी भारत व न्यूझिलंड या जगातील दोन अव्वल संघात विश्व कसोटी क्रिकेट अजिंक्यपदाचा अंतिम सामना होत आहे.
                       
सामन्याच्या पूर्व संध्येला दोन्ही संघांनी आपले अंतिम अकरा खेळाडूंचे संघ जाहीर केले. अपेक्षेप्रमाणे भारताने आपल्या संघात २ फिरकी व ३ वेगवान गोलंदाज निवडले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असल्यामुळे त्याच्या खात्यात आयसीसी स्पर्धेचं एक तरी विनिंग मेडल असावं याच एकमेव कारणामुळे कर्णधार कोहलीने आपला दिल्लीवासी साथीदार ईशांतला सामना खेळण्याची अनोखी भेट दिली आहे. नाहीतर आजमितीला मोहम्मद सिराज फिटनेस व फॉर्म या दोन्ही बाबीत ईशांत पेक्षा उजवा आहे.
                         
सामन्याचे पाच निर्धारीत व एक राखीव अशा सहाही दिवशी पावसाचे सावट या सामन्यावर असल्याने प्रत्यक्ष खेळ किती होईल ? मैदानाची अवस्था कशी राहील ? खेळपट्टी काय गुण उधळेल ?  फिरकी गोलंदाज आपली करामत दाखविण्यात यशस्वी होतील का ? असे लाख मोलाचे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे.
                          
दोन्ही संघात जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे या पावसाळी वातावरणात ते हवामान व खेळपट्टीचा अचूक लाभ उठविणार हे उघड आहे. तसेच भारताकडे जडेजा व आश्विन हे अव्वल फिरकीपटू असल्याने ते किवीज फलंदाजांना अडचण पैदा करू शकतात. फक्त प्रश्न एवढाच आहे की, ढगाळ व ओलसर वातावरणात त्यांना खेळपट्टीकडून सहाय्य मिळेल का ? तसे बघाल तर जडेजा व आश्विन जगातल्या कुठल्याही खेळपट्टीवर यशस्वी होऊ शकतात. गोलंदाजीत जरी ते अपेक्षीत यश मिळवू शकले नाही तरी फलंदाजीत त्यांचा संघाला निश्चितपणे लाभ होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे त्या दोघांचे संघात असणे न्यूझिलंड संघावर मनोवैज्ञानिक दबाव वाढविणार आहे.
                          
या सामन्यात खऱ्या अर्थाने बघितले तर दोन्ही संघांच्या फलंदाजांची कसोटी लागणार आहे. ज्या संघांचे जास्त फलंदाज यशस्वी होतील, धावफलकावर आपल्या गोलंदाजांना पाठबळ देणाऱ्या धावा लावतील तो संघ सामन्यावर वर्चस्व गाजविल. कागदोपत्री दोन्ही संघांची फलंदाजी मजबूत असली तरी या प्रेशर कुकर वातावरणाचा दबाव ज्या संघाचे फलंदाज पेलतील तो संघ बाजी मारेल. नेहमीप्रमाणे नाणेफेकीला महत्व असले तरी कोणताही संघ नाणेफेक हरणं पसंत करणार नाही. तरीही नाणेफेक हरणारा संघ सुदैवी राहू शकतो. कारण त्याला तो स्वतःच्या मर्जीप्रमाणे नसले तरी निसर्ग नियमाप्रमाणे प्रथम फलंदाजी करू शकतो. अन्यथा कोणताही संघ नाणेफेक जिंकून ढगाळ हवामानात प्रथम फलंदाजी करणार नाही.
                             
इंग्लंडमधील हवामान खात्याने बऱ्याच दिवसापूर्वी साऊथॅम्प्टनला १८ ते २३ जून दरम्यान पावसाचे भाकीत केले होते. इंग्लंडमधील  हवामान खात्याचे अंदाज आपल्यासारखे नसते. ते जे भाकीत वर्तवितात ते तंतोतंत खरे ठरतात. मग एवढी अद्ययावत माहीती यजमान इंग्लिश क्रिकेट बोर्ड व आयसीसीकडे असताना त्यांनी साऊथॅम्पटन येथे या महत्वाच्या सामन्याचे नियोजन केलेच कसे ? पुर्व नियोजित कार्यक्रमानुसार हा सामना लॉर्डसवर होणार होता. परंतु तेथील कोविड-१९ च्या बिकट परिस्थिती मुळे तो साऊथॅम्प्टनला घेण्याचे निश्चित केले. लॉर्डस मैदान जेथे आहे त्या लंडनमध्ये कोविडची अवस्था गंभीर होती मग २ ते ६ जून २०२१ दरम्यान इंग्लंड व न्यूझिलंड यांच्यातील पहिला सामना तेथे का खेळविला गेला ? त्यावेळी तेथे कोविड नव्हते का ? मग याच सामन्याच्या वेळी कोविड तेथे कसे येणार होते ? लॉर्डस मैदान भारताला धार्जिण आहे तेथे भारत शंभर टक्के जिंकू शकले असते ? साऊथॅम्पन येथील भारताची कामगिरी निराशाजनक आहे व तेथे न्यूझिलंडचा रेकॉर्ड चांगला आहे.  ही बाब लक्षात घेऊन गोऱ्या कातडीच्या न्यूझिलंडला मनोवैज्ञानिक फायदा देण्याचा कुटील डाव गोऱ्या इंग्रज मंडळीनी आखला तर नाही ना ?
                           
बरे असो, शेवटी क्रिकेट मैदानात खेळले जाते. जो संघ सर्वोत्तम कामगिरी करील तो विश्वविजेता होईल. तूर्त तरी आपण भारतीय संघास शुभेच्छा देऊ या !

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close