इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सील अर्थात आयसीसी ! जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवणारी ही अधिकृत संस्था. या संस्थेचं मुख्यालय दुबई येथे असून मेरीलीबोर्न क्रिकेट कौन्सिल ( एमसीसी ) ने बनविलेले नियम आयसीसीद्वारे सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये राबविले जातात.
येत्या १८ जून पासून भारत व न्यूझिलंड या दोन संघात इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन कौंटीच्या रोझ बाऊल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. आयसीसीद्वारे प्रथमच कसोटीचा विश्वविजेता ठरविण्यासाठी ही स्पर्धा खेळविली जात आहे. कसोटीचा अधिकृत दर्जा असलेल्या मानांकनातील पहिल्या दहा संघांमध्ये मागील दोन वर्षापासून हे सामने खेळविले जात आहे.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने क्रिकेटलाही मोठा फटका बसला असून आयसीसीचे बरेचसे नियोजनही विस्कळीत झाले आहे. सन २०२० मध्ये जवळ जवळ चार महीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प होते, तर सन २०२१ च्या मे महिन्यातही या कोरोना व्हायरसने सर्वच स्तरावराच्या क्रिकेटला बाधा आणली होती.
आपल्याला माहीती आहे की, क्रिकेटमध्ये चेंडूला चकाकी आणण्यासाठी खेळाडू लाळेचा ( थुंकींचा ) उपयोग करायचे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. म्हणून आयसीसीने वरील प्रकारे चेंडूला चकाकी आणण्यावर बंदी घातली आहे. तसेच खेळाडू पंचांकडे सांभाळण्यास आपले स्वेटर, टोपी, चष्मा अथवा इतर वस्तू देत नाहीत. शिवाय सामन्या दरम्यान एखादा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळला तर त्याच्या बदली त्याच गुणवत्तेचा खेळाडू संबंधीत संघास दिला जातो.
नव्या नियमानुसार तिसरा पंच फलंदाजाने घेतलेली अर्धवट धाव ( शॉर्ट रन ) याची शहानिशा करू शकेल. तसेच पायचित ( एलबीडब्ल्यू ) बाबत बाद दिला गेलेला फलंदाज अथवा क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार मैदानातील पंचाच्या निर्णयावर दाद मागू शकतो. मैदानातील पंचाने दिलेला निर्णय "अंपायर्स कॉल " हा नियम कायम ठेवण्यात आला असून पूर्वी पायचित देताना फक्त स्टंपची उंची ग्राह्य धरली जायची. नव्या सुधारीत नियमानुसार आता स्टंप्सवर ठेवलेल्या बेल्सला (विट्टी) देखील स्टंप्ससोबतच गणले जाणार आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपदाचा सामना कोणत्याही कारणास्तव निकाली निघाला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्याचे आयसीसीने ठरविले आहे.
कसोटी क्रिकेट हे पाच दिवस खेळले जाते. परंतु ह्या अंतिम सामन्याला एक अतिरिक्त दिवस जास्त दिला आहे. मात्र या अतिरिक्त दिवशी फक्त नियमित पाच दिवसांच्या कालावधीत वाया गेलेल्या वेळे इतकाच खेळ खेळला जाणार आहे.
हा अंतिम सामना सहा दिवसांचा असला तरी आयसीसीने खास या सामन्यासाठी नियम क्रमांक तेरा अर्थात " फॉलोऑन " बाबत कुठलाच बदल केलेला नाही. पाच दिवसांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केलेल्या धावांपेक्षा दोनशेपेक्षा कमी धावा दुसऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघाने केल्यास त्या संघाला पुन्हा लगोलग दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याचा नियम आहे. मात्र या नियमात कुठलाही बदल करणार नसल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे.
आपण टिव्हीवर सामना बघताना एका गोष्टीचं निरीक्षण केलं असेलच. चेंडूला थुंकी लावली जात नाही. पंच खेळाडूंची कोणतीही वस्तू सांभाळत नाही. फलंदाजाने मैदानाबाहेर टोलावलेला चेंडू मैदानात आल्यानंतर सॅनिटाईझ ( निर्जंतुक ) करूनच गोलंदाजाकडे दिला जातो. दौरा सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना कॉरंटाईन केलं जातं, बायो बबलमध्ये ठेवतात. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू, पंच हस्तांदोलन करतात. मग त्यावेळी खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होत नाही का ? आयसीसीने या बाबीकडेही जरा बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर पुढचं पाठ व मागचं भुईसपाट व्हायचं.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

