*
प्रतिनिधी । संजय वायकर :
अ .नगर : (दि .६ ) :राज्य शासनाने आयोजित केलेल्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त नगर जिल्ह्याने आपले नाव कोरले आहे .
राज्यातील सर्वप्रथम क्रमांक
नगरपंचायत गटात शिर्डी नगरपंचायतीने मिळवला आणि द्वितीय पारितोषिक कर्जत नगरपंचायतीला मिळाले.
ग्रामपंचायत गटात मिरजगाव (ता. कर्जत) ने द्वितीय तर लोणी बुद्रुक (ता. राहाता) ने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. नगरपरिषद गटात संगमनेर नगरपरिषदेला उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक मिळाला .
पर्यावरण दिनानिमित्त
२०२० - २०२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिका आणि वैयक्तिक चांगली कामगिरी करणार्या अधिकार्यांना शनिवारी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईनद्वारे पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात गौरवण्यात आले. वैयक्तिक स्तरावर चांगली कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी गटात नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गटात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना ऑनलाईन पद्धतीने पारितोषिके प्रदान करण्यात आली. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अभियानात सहभागी महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी हे ऑनलाईनद्वारे यात सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद आणि वैयक्तिक गटात जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांना मिळालेल्या पारितोषिकांबद्दल महसुलमंत्री थोरात आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या सर्वांचे आणि अभियानात भाग घेतलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन केले .

