कसोटी क्रिकेटला १४४ वर्षांचा इतिहास आहे. या भल्या मोठया कालावधीत कसोटी क्रिकेट मध्ये अनेक विक्रम - पराक्रम घडले. परंतु काही असे विक्रम आहेत की, ते हाताच्या बोटांवरच मोजू शकतो. असाच एक विक्रम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुरूवार, दिनांक ३ जून २०२१ रोजी क्रिकेटची मक्का म्हणून ओळखले जाणाऱ्या इंग्लंडमधील लंडन स्थित लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड व न्यूझिलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी घडला.
न्यूझिलंडने आपल्या संघात डावखुरा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला पदार्पणाची संधी दिली. न्यूझिलंडने लॅथम, विल्यमसन, टेलर हे महत्वाचे गडी स्वस्तात गमावले. त्यावेळी इंग्लंड गोलंदाज वरचढ ठरत असताना मुळतः आक्रमक स्वभावाचा डेव्हॉन कॉनवे शांत व संयमाने आपला डाव उभा करत होता. बुधवारी सामन्याच्या पहिल्या दिवस अखेर निकोलसला साथीला घेत संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली.
सामन्याच्या पहिल्या दिवशी कॉनवे अतिशय जबाबदारीने खेळला. त्याने नवखेपणाचा लवलेशही दिसू दिला नाही. उलट चौकार मारून शतक साजरे केले. लॉर्डसवर पदार्पणात शतक ठोकणारा तो तिसरा फलंदाज बनला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा हॅरी ग्रॅहम १८९३ व भारताचा सौरव गांगुली १९९६ यांनी हा पराक्रम केला आहे.
न्यूझिलंड कडून पदार्पणात शतक करणारा तो बारावा खेळाडू ठरला. शिवाय दिवस अखेर १३६ धावांवर नाबाद राहात त्याने कसोटी पदार्पणात सर्वाधिक धावा बनविण्याचा सन १९९६ मध्ये केलेला भारताच्या सौरव गांगुलीच्या १३१ धावांचा विक्रम मागे टाकला व लॉर्डसवर सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज बनला. गांगुली व कॉनवे या दोघांमधील साम्य असे की, दोघेही डावखुरे फलंदाज असून दोघांचीही जन्मतारीख ८ जुलै आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही कॉनवेने आपला तोच खेळ सुरू ठेवला. दुसऱ्या बाजूने एका मागोमाग एक गडी बाद होत होते तरी कॉनवे आपलं काम वनवे करतच होता. सर्वप्रथम त्याने लॉर्डसवर पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा रणजीतसिंह यांनी सन १८९६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरूध्द केलेल्या १५४ धावांचा विक्रम मागे टाकला.
कॉनवे खेळत होता तेंव्हा खेळपट्टी निर्जीव व इंग्लंडची गोलंदाजी बोथट वाटत होती. तर दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होत होते तेंव्हा खेळपट्टी भेदक तर इंग्लिश गोलंदाजी धारदार वाटत होती. न्यूझिलंडचा नववा गडी बाद झाला तेंव्हा त्याला द्विशतकासाठी १६ धावांची गरज होती. परंतु शेवटचा फलंदाज निल वॅगनरने त्याला चांगल्या प्रकारे साथ देत स्वतःही नाबाद २५ धावा काढल्या.
कॉनवे खेळपट्टीवर नांगर टाकून उभा होता तेंव्हा इंग्लिश गोलंदाज त्यापुढे हतबल झाले होते. कॉनवेला बाद करणे म्हणजे त्यांच्यासाठी कठीण होऊन बसले होते. त्याला बाद करायचे म्हणजे धावबाद शिवाय दुसरा पर्यायही नव्हता. अखेर तसेच झाले. इंग्लिश कर्णधार ज्यो रूटने त्याला धावबाद करून न्यूझिलंडचा डाव संपुष्टात आणला.
तत्पूर्वी कॉनवेने ३४७ चेंडूत २२ चौकार व एका षटकाराच्या मदतीने बरोबर २०० धावा ठोकल्या. या दरम्यान त्याने षटकार मारून लॉर्डसवर द्विशतक ठोकताना पहिला पदार्पणवीर होण्याचा मान मिळविला. न्यूझिलंडच्या ३७८ पैकी २०० धावा एकट्या कॉनवेच्या होत्या. यावरून त्याच्या खेळीला आणखी महत्व प्राप्त होते.कसोटी पदार्पणातच द्विशतक ठोकणारा तो न्यूझिलंडचा दुसरा फलंदाज ठरला. तर जगातील सहावा फलंदाज बनण्याचा मान त्याला मिळाला.
ह्याच कॉनवे न्यूझिलंडकडून खेळताना स्वतःच्या केवळ तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकण्याचा कारताना केला आहे. सन २०२१ च्या स्थगित आयपीएलमध्ये तो विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा सदस्य होता. परंतु त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

