shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमोलीक जाते वय..! आता तरी करी सोय!पुढे आहे अवघड! यम यातना बा..!!

जसे कराल तसेच भराल...
हा विश्वाचा सिद्धांत आहे. 
म्हणजे आपण जे कर्म करतो त्याचे चांगले वाईट फळ हे आपल्याला मिळत असते.  आपण केलेल्या बऱ्या वाईट कर्माचे कर्मफळ आपला पाठलाग करत फिरत असते.
यासाठी असे सांगितले आहे आहे की कधीही कोणाचे लुबाडून  घेऊ नको. उपकाराची नोंद ठेवू नको. आपला जन्म हा प्रारब्ध कर्मानुसार होतो आणि नेमून दिलेली कामे ही आपल्याला करावीच लागतात. 

पण शरीर धर्म भावनेच्या आहारी जाऊन त्यापासून फारकत घेत स्वतःचा अहंकार जोपासत कुठेतरी अहंकाराच्या, स्वार्थाच्या भोवऱ्यात अडकतो आणि आनंद ऐशारामाच्या क्षणभंगूनर समुद्रात गटांगळ्या  खातो. परिणामी कालांतराने  चिंता, द्वेष, तिरस्कार, लोकनिंदा हे त्याच्या वाट्याला येतो आणि मग तो विविध प्रकारच्या व्याधींची शिकार होतो. असे होत असताना वय वाढत जाते. यावेळी सत्संग, उपकार, समाजसेवा करायची वेळ निघून जाते. 
अमोलीक असे वय वाया जाते आणि  कार्यक्षमता,  शक्ती कमी होते. हितचिंतक दूर दूर जातात. सेवाभावी काही करावे तर शरीर साथ देत नाही. उमेदीत असताना केलेल्या कर्माचे कर्मफल  जेव्हा समोर येते तेव्हा माणूस विचार करतो तो आपल्या या जन्मात केलेल्या दुष्कर्माचा. 
कोणाला कसे नडलो, अपमानित केले, लुबाडले, असुरी आनंद कसा उपभोगला याचा पाढा उतारवयात जेव्हा सभोवती घोंगावतो तेव्हा माणूस मनाने पस्तावतो. त्याला केलेल्या कर्माचा इतका त्रास होतो की त्याला सुखाची झोप लागत नाही. परिणामी तो अनेक शारीरिक व्याधींची शिकार होतो.  मनोरुग्ण होऊन बेशिस्त व्यवहार करू लागतो. कधीकधी पूर्वी केलेल्या चुकीच्या कामापेक्षा अधिक चुकीची कामे त्याच्या हातून घडतात.
हे सारे क्लेशदायी असते. 
म्हणून संत उपदेश करतात की आता तरी करी सोय.
सोय म्हणजे चांगले. तेव्हा उतारवयात जेवढं समाजकल्याण करता येईल तेवढं तरी करा ज्यामुळे आत्मसुख मिळेल . 
संतांनी सांगितलेले आहे की, मानवजन्म सार्थकी लावा. अमोलीक असे तारुण्य सत्कर्मात खर्ची करा. कधी कुणाचे ओरबाडून घेऊ नका. कोणाची मने दुखवू नका. जे काही कष्टाने मिळालेले आहे त्याचा उपभोग  आनंदाने घेऊन त्यातील जास्तीत जास्त भाग हा दीनदुबळ्यांसाठी दान करा. दीनदूबळ्यांचे दुःख हलके करा. हे दान देताना देखील ते गुप्त ठेवा.
अनेकदा आपण दान देताना श्रीमंतांच्या तिजोरीत न कळत भरणा करून मोकळे होतो.  
दान सत्पात्री करा. 

अमोलीक जाते वय ! आता तरी करी सोय !!
पुढे आहे अवघड ! यमयातना बा !! 

लेखक : चंद्रकांत शहासने 
(संत वाग्ड्मयाचे मनोवैज्ञानिक निरूपणकार)
मो. ९८८१३७३५८५
close