shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारताला हरवून आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा न्यूझिलंडला अनुभव..!



                         येत्या १८ जून पासून भारत व न्यूझिलंड या दोन संघात वर्ल्ड टेस्ट चॅंपीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना तटस्थ ठिकाणी म्हणजे इंग्लंडमधील साऊथॅम्पटन येथे खेळला जाणार असून या महत्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ इंग्लंडमध्ये डेरेदाखल झाले आहेत. भारताचा संघ सध्या कॉरंटाईन असून न्यूझिलंड संघ आपला कॉरंटाईन पूर्ण यजमान इंग्लंडविरूध्द दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे.

                           मागील दोन वर्षांपासून कसोटी क्रमवारीतील अव्वल दहा संघात प्राथमिक फेरीचे सामने झाले. त्या सामन्यानंतर भारत व न्यूझिलंड संघ पहिले दोन क्रमांक मिळवून पहिल्या कसोटी विश्व अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.आयसीसीचा कसोटीचा विश्वकप आयोजित करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.
                           भारत तटस्थ ठिकाणी आपला पहिला कसोटी सामना खेळत असून न्यूझिलंडचा तटस्थ ठिकाणी हा सातवा सामना असेल. आयसीसीने आतापर्यंत वनडे व टि -२० चे विश्वचषक आयोजित केले असून वनडेची मिनी विश्वचषक स्पर्धाही अनियमितपणे आयोजित करत आहे.
                             भारताने वनडेचे दोन विजेतेपद सन १९८३ व सन २०११ मध्ये मिळविले असून एकदा ( सन २००३ ) उपविजेतेपदही मिळविले आहे. तसेच सन २००७ मध्ये टि-२० चा पहिला विश्वकरंडकही भारताने पटकविला असून २०१४ मध्ये भारत उपविजेते ठरले. आयसीसीच्या चँपियन्स ट्रॉफीत भारताने २०१३ मध्ये इंग्लंडला हरवून विजेतेपद तर सन २००० व सन २०१७ मध्ये उपविजेतेपद मिळविले आहे.
                              आयसीच्या विश्वकरंडक स्पर्धात न्यूझिलंडला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धात सन २०१५ व सन २०१९ मध्ये अंतिम सामन्यात पराभूत होऊन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असून   चँपियन्स ट्रॉफीत न्यूझिलंड सन २००० ला विजेते तर सन २००९ ला उपविजेते ठरले.
                    या दोन संघात सन २००० मध्ये केनियाची राजधानी नैरोबी येथे चॅम्पीयन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता. तो न्यूझिलंडचा आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील पहिला अंतिम सामना ठरला. त्या उत्कंठावर्धक सामन्यात न्यूझिलंडने भारताला हरवून विजेतेपद पटकविले होते. आतापर्यंत आयसीसीच्या स्पर्धेत मिळविलेले न्यूझिलंडचे ते एकमेव विजेतेपद असून भारताला अंतिम सामन्यात हरविण्याचा त्यांना अनुभव आहे. 
                     १५ ऑक्टोबर सन २००० रोजी झालेल्या त्या अंतिम सामन्यात भारताने कर्णधार सौरव गांगुलीच्या १३० धावांच्या जोरावर ५० षटकात ६ बाद २६४ धावा ठोकल्या तर प्रत्युत्तरात न्यूझिलंडने ख्रिस केर्न्सच्या १०२ धांवाच्या झुंजार शतकाच्या जोरावर ४९.४ षटकात ६ बाद २६५ धावा बनवून ४ गडी राखून सामना जिंकला व आपला पहिला आयसासी करंडक पटकविला.
                     आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेंमध्ये भारताची न्यूझिलंडविरुद्धची कामगिरी बेताचीच आहे. आपल्याला आठवतच असेल की, सन २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात याच न्यूझिलंड संघाने भारताला हरवून स्पर्धेतून बाद केले होते. विशेष म्हणजे १८ जून पासून सुरू होणारा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ज्या मैदानावर होणार आहे त्याच साऊथॅम्पट कौंटीच्या रोझ बाऊल स्टेडीयमवर तो सामना झाला होता. 
                       इंग्लंड व न्यूझिलंडमधील वातावरण, हवामान, खेळपट्टया सारख्याच असून न्यूझिलंडला भारताच्या तुलनेत अशा मैदानावर खेळण्याचा अनुभव जास्त आहे. न्यूझिलंड यावेळीही भारताला आस्मान दाखवून कसोटीचे पहिले ऐतिहासिक विजेतेपद मिळवेल का ? हा प्रश्न असंख्य क्रिकेट प्रेमींच्या मैदानात घर करून बसला आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close