shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (१२)...जरासंधाचे पर्यावरण...!!

पर्यावरण हा विषय संतुलन या संज्ञेशी निगडीत आहे. जरासंध हे कौरवांचे समर्थन करणारे महाभारतातील एक पात्र आहे. पांडवांवर कौरवांनी ज्या स्वार्‍या केल्या त्यातील एकूण ४९ वी स्वारी जरासंधाची आहे.

या ठिकाणी आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर विचार, चिंतन केले तर असे दिसून येते की पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये ही जीवसृष्टीशी, मानवाशी निगडित आहेत. 
आपला देह हा पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रीये, पंचकर्मेंद्रीयांचा आहे. पांडव पाच आहेत. त्याअर्थी आपण स्वतः पांडव आहोत आणि वयाच्या ४९ व्या वर्षी आपल्यावर जरासंधाची स्वारी होते.

 जरा म्हणजे आपले शरीर आणि संध म्हणजे आपल्या शरीरातील सांधे. शरीराची त्वचा, इंद्रिये आणि सांधे हे त्रास देऊ लागतात. त्याची दुखणी चालू होतात. म्हणजे जरासंधाची स्वारी आली असे समजायचे.

आता ही दुखणी कशी बरी करायची याबाबत विवेचन समजून घ्या.
 जरासंधाशी भीम म्हणजे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती ही युद्ध करते. आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर औषध देतात. काही काळ सांधेदुखी बंद होते, दुखणी कमी होतात. औषधाचा परिणाम कमी झाला की पुन्हा दुखणी चालू होतात. म्हणजे जरासंध पुन्हा जिवंत होतो.

आता याला कायमचा कसा मारायचा ? यावर श्रीकृष्ण शिष्टाईनुसार या जरासंधाचा कापलेल्या देहाचा उजवा भाग डावीकडे आणि डावा भाग उजव्या बाजूला टाकला की जरासंध मरतो.भीम तसे करतो आणि जरासंधाचा वध करतो.

म्हणजे वयाच्या ४९ व्या वर्षापर्यंत आपला आहार, विहार, सवयी, आचरण हे ज्या पद्धतीने आपण केले आहे ती पद्धत  ४९व्या वर्षानंतर आपण बदलली म्हणजे उलट केली तर ही दुखणी आपोआपच बरी होतात.

उदाहरणार्थ वयाच्या ४९ व्या वर्षापर्यंत खूप धावपळ केलेली असेल तर आता विश्रांती घेणे गरजेचे आहे. आणि जर नुसते बैठेकाम केलेले असेल तर आता सकाळी उठून जरा पायपीट करायला हवी. असं करून शरीरातील दुखण्यावर, सांधेदुखीवर विजय मिळवायला पाहिजे. हा साधा सोपा मतितार्थ यात दिसतो. 

जे जे धन ४९ वर्षापर्यंत कमावलेले असते त्याचे पुढे कसं नियोजन करणार याबाबत अनेक लोक चिंताग्रस्त असतात आणि याच चिंतेतूनच त्यांना पुढे आजार उद्भवतात. त्यांनी हा विचार करायला हवा की आपण जन्माला आल्यानंतर आपली मार्गक्रमणा कशी होती ?. आपण स्वतःच्या पायावर उभे राहिलो तशी आपली नातवंडे पण उभी राहणार आहेत. मग त्यांची काळजी कशाला करायची? 

पण असं आपण करत नाही आणि अजून अजून संसारिक जगामध्ये बूडत जातो.  जरासंध प्रबळ होत जातो .आपण अनेक व्याधीने शिकार होतो.
मात्र आपण जर ४९ वर्षे केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपण रोगमुक्त होतो.
हे प्रत्येकाने समजून घेणे व तसे वागणे म्हणजे शारीरिक संतुलन करणे, शारीरिक पर्यावरण रक्षण करणे होय.
या कृतीने निसर्ग पर्यावरण आपोआपच साधले जाणार आहे.

 कारण मानव आपल्या अमर्याद गरजा भागविण्यासाठी निसर्गाला ओरबडतच असतो. जीवसृष्टी, वनसंपत्ती, खनिज संपत्ती यांतूनच मानवाच्या गरजा भागविल्या जातात.

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल : ९८८१३७३५८५

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जूनपासून वन हुतात्मादिन ११सप्टेंबर२०२१पर्यंत  असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान..!
close