shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आता कोण ठरणार बळीचा बकरा ?

भारतीयच नव्हे तर समस्त जागतिक क्रिकेटमध्ये एक अलिखित परंपरा बनली आहे की कोणत्याही मोठया स्पर्धेत संघ अपयशी ठरला तर त्याचे खापर कोणातरी एका जणावर फोडायचे व काही तरी कारवाई केली असे नाराज झालेल्या क्रिकेट शौकीनांना दाखवायचे. वास्तविक बघाल तर या प्रक्रियेत खऱ्या दोषी व्यक्तीसच सजा दिली जातेच असे नाही. तर या पराभवास फार मोठा जबाबदार नसलेला व ज्याचं उपद्रव मुल्य नगण्य आहे अशा व्यक्तीला बळीचा बकरा ठरविला जातो.  खरा खलनायक वाचवायचा हा सोपा मार्ग निवडला जातो. अगदी तसाच प्रकार भारतीय क्रिकेटमध्येही सुरू आहे.

                           
आपल्याला आठवत असेल सन २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ अतिशय बलाढय होता. साखळी स्पर्धेत भारत आपल्या गटात अव्वल स्थानीही होता. त्यामुळे भारत सर्वांच्या दृष्टीने संभाव्य विजेता होता. परंतु उपांत्य सामन्यात तुलनेने कमजोर ठरविलेल्या न्युझिलंडने भारताला हरवून स्पर्धेतून बाहेर लोटलं. प्रत्यक्ष त्या स्पर्धे दरम्यान संघात काहीतरी गोंधळाचं वातावरण होतं. त्यामुळे संघाचा पराभव झाला होता. परंतु त्या पराभवाला जबाबदार धरले ते फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना. त्याचं कारण म्हणे बांगर यांनी फलंदाजांची क्रमवारी बदलली व त्या बदललेल्या क्रमानुसार महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला यावं लागलं. धोनी सारखा फलंदाज वरच्या क्रमांकावर आला असता तर संघाला फायदा झाला असता व इतर फलंदाजही वाचले असते.
                      
आपणास चांगले ठाऊक आहे की, कर्णधार कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे दोघेच सामन्या दरम्यान धोरणात्मक निर्णय घेत असतात. भले संजय बांगर यांनी ती कल्पना सुचविली असेल परंतु शास्त्री व कोहली यांना ती आवडली म्हणूनच त्यावर अंमलबजावणी झाली ना ? अशा रितीने शांत, गरीब व उपद्व्यावी नसलेल्या बांगर यांना बळीचा बकरा ठरविले व खरे व्हिलन शास्त्री -कोहली ही जोडी अबाधीत राहीली.
                       
नुकताच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन येथे भारत व न्युझिलंड यांच्यात संपन्न झाला. या स्पर्धेतही भारत गुणतालिकेत अव्वलस्थानीच होता. यावेळी संभावित विजेता म्हणून भारतालाच प्रथम पसंती होती. परंतु पाऊस व खराब हवामानामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात परत एकदा न्युझिलंडने भारताला पराभूत केले. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला. वरकरणी हा सामना भारत फलंदाजांच्या अपयशामुळे हरला असे दिसत असले तरी या मागेही संघातील अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमात सुरू आहे.
                          
या सामन्यात भारताचा कोणताही फलंदाज दोन्ही डावात सातत्य दाखवू शकला नाही. शिवाय कर्णधार कोहली स्वतः दोन्ही डावात जम बसल्यावर बाद झाला. शिवाय दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना एक बाजू त्याने लावून धरणे गरजेचे असताना चुकीचा फटका मारून बाद झाला. संघ निवड करतानाही त्याने मनमानीचा गोंधळ परत घातला. ढगाळ वातावरणात वेगवान गोलंदाज फायदेशीर ठरणार हे उघड होते तरी दोन दिवस आधीच संघ जाहीर केला तसेच दोन फिरकी गोलंदाज खेळविले त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात एक वेगवान गोलंदाज कमी पडला. सलामीला अनुभवी राहुल ऐवजी स्वतःच्या मर्जीतल्या नवख्या शुभमन गिलला खेळविले. गिल अपयशी ठरल्याने भारताला मोठा फटका बसला.
                           
ऑस्ट्रेलियातील गाबा कसोटीचा हिरो शार्दूल ठाकूर बॅट व बॉलने करामत करण्यात वाकबगार असतानाही त्याने जडेजाला खेळविले, शिवाय मोहम्मद सिराज भन्नाट फॉर्मात असताना आपला दिल्लीवासी मित्र ईशांत शर्माला खेळवून भारताला स्वतः कोहलीनेच अडचणीत आणले. तसेच गोलंदाजीत योग्य बदल करण्यातही तो कमी पडला.  एक फलंदाज व कर्णधार म्हणून कोहलीचे अपयश हेच भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. तरीही हे कोहली महाशय स्वतःची चुक मानायचे सोडून संघातील इतर खेळाडूंकडे अपयशाचा धनी म्हणून बोट करत आहे.
                            
कोहलीचा पहिला रोष आहे चेतेश्वर पुजारावर. पुजाराकडून या सामन्यात मोठया धावांच्या अपेक्षा होत्या. परंतु पहिल्या डावात ५३ चेंडूत ८ तर दुसऱ्या डावात ८० चेंडूत १५ धावा सर्वांच्या नजरेत आल्या. पुजारा मागील काही सामन्यात अपेक्षीत धावा करू शकला नसला तरी त्याचे जास्त वेळ खेळपट्टीवर उभे राहणे गोलंदाजांना निष्प्रभ करत असतात. यावेळी तो आपत्कालीन समयी मोठं योगदान देण्यात कमी पडला. परंतु कोहली महाशय विसरलेले दिसतात की, याच पुजाराने सन २०१८ व २०२०-२१ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात मालिका जिंकून देण्यात मोलाची कामगिरी केली आहे.
                            कोहलीचा दुसरा रोष उपकर्णधार अजिंक्य राहाणेवर आहे. राहाणेने या संपूर्ण मालिकेत भारतातर्फे सर्वाधिक ११४९ धावा काढल्या असून त्याच्या खालोखाल रोहीत शर्माच्या १०९५ धावा आहेत. कोहली साहेब तिसऱ्या स्थानी आहेत. शिवाय याच अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात सर्वाधिक ४९ धावा राहाणेच्याच होत्या. त्या जर नसत्या तर २१७ धावा सुध्दा झाल्या असत्या का ? दुसऱ्या डावात एका अवघड चेंडूवर तो बाद झाला. यामध्ये त्याचं दुर्देवं मोठं होते. तरीही कोहली जबाबदार ठरवितो.
                           या वर्षाच्या सुरुवातीला भारताने ऑस्ट्रेलियाला तेथे जाऊन हरविले. त्यावेळी कोहलीच्या नेतृत्वात भारत पहिल्या सामन्यात ३६ धावांत बाद झाल्यावर मोठा पराभव झाला. या पराभवानंतर कोहली संघाला वाऱ्यावर सोडून बायकोच्या बाळंतपणासाठी भारतात निघून आला. त्यानंतर राहाणेने एक फलंदाज व कर्णधार म्हणून भारतासाठी ठोस कामगिरी करून भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. त्या विजयामुळेच भारत हा अंतिम सामना खेळू शकला. तेंव्हा राहणेला व्हिलन ठरविण्याचा प्रयत्न कोहलीला भारी पडू शकतो.
                            
पुजारा व राहाणेचे भारतासाठी मोठे योगदान आहे. हे देशवासीयांना पूर्ण माहीती आहे. त्यामुळे या पराभवाचे खापर त्यांच्यावर कोहलीने फोडू नये. उलट या मोठया पराभवाची जबाबदारी त्याने स्वतः घेतली असती तर त्याच्या विषयी लोकांच्या मनात आणखी चांगल्या भावना निर्माण झाल्या असत्या.
                       

      
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close