shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण(46) आधी प्रपंच करावा नेटका..!!


आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका। तेथे आळस करू नका। विवेकी हो।।
समर्थ रामदासस्वामींना अपेक्षित असलेला प्रपंच हा विश्वाचा प्रपंच आहे. ते म्हणतात, “चिंता करितो विश्वाची।“ 

समर्थ रामदासांनी दासबोध या ग्रंथातील बाराव्या दशकात विवेक वैराग्य सांगितले असून पहिला समास विमळ लक्षणाचा आहे.या समासात समर्थ श्रोत्यांना सांगतात की आधी नेटका प्रपंच करा आणि नंतरच  मन-बुद्धीच्या कसोटीवर घासून समाजसेवा,परमार्थ करा. हे करताना कोणत्याही प्रकारे कामचुकारपणा, तडजोड, झटपट व्हावे म्हणून काहीतरी टाळणे असल्या गोष्टी म्हणजे आळस करू नका.

आता याचा पर्यावरणीय दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रपंच हा मानवजातीला चुकलेला नाही. पण प्रपंच म्हणजे केवळ जन्माला येऊन, संसार थाटून, दोन चार मुलांना जन्म देणे आणि घरटे बांधून राहणे एवढाच नव्हे. तर समर्थांना जो प्रपंच दिसतो आहे तो विश्वाचा प्रपंच आहे. या प्रपंचामध्ये जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी समाजाचा विकास, उत्कर्ष कसा होईल, यासाठी जे करायचे आहे ते सर्वांगपरिपूर्ण विवेकाने करावे. 

आता एक गोष्ट लक्षात घ्या की, एखाद्या वृक्षाला फळे चांगली यावी यासाठी अगोदर त्या वृक्षाचे योग्य जागी योग्य रितीने रोपण करावे लागते. त्याचे पाणी देऊन जतन करावे लागते. जेव्हा तो चांगला धडधाकट पुष्ट होऊन त्याचे खोड मजबूत होईल, फांद्यांचा विस्तार होईल, तेव्हाच ते झाड फळाफुलांनी भरून येऊ शकेल. जर त्याच्या पालन-पोषणामध्ये हयगय केली, आळस केला तर ते झाड सशक्त रहाणार नाही, खुरटेल. समाजाला फळे-फुले देण्यामध्ये ते कुचकामी ठरेल.
आपले देखील असेच आहे. आपण आळस केला.

बालपणी विद्या, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, श्रमप्रतिष्ठा, व्यायाम, योग, पाठांतर याकडे दुर्लक्ष केले तर आपले तारुण्य नेटके राहणार नाही. आपण अज्ञानी राहू. आपण अशक्त राहू. आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळणार नाही. मग परमार्थ करणे कसे शक्य होईल? समाजसेवा कशी शक्य होईल? तर ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने अगोदर त्याचा शारीरिक, मानसिक पाया अत्यंत सक्षम करायला पाहिजे. यालाच समर्थ रामदास स्वामी म्हणतात  "आधी प्रपंच करावा नेटका"

आपल्या देशाची #सैन्यदले आहेत आणि ही सैन्यदले परमार्थिक भावनेने देशाचं रक्षण करतात. जर त्यांनी सैनिकी प्रशिक्षण घेतानाच आळस केला तर ते देशाचं रक्षण करू शकतील काय? समर्थांनी दिलेला जो उपदेश आहे तो बहुआयामी आहे. त्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करायला हवा. यालाच परमार्थ विवेक असे म्हटलेले आहे. सद्यस्थितीत आपण प्राणवायू भरपूर प्रमाणात मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत. तेव्हा प्राणवायू देणारी यंत्रणा बळकट असावी यासाठी झाडे लावायला आळस करू नका. झाडे सशक्तपणे वाढतील यासाठी जेवढे कष्ट करावे लागतील तेवढे करा. झाडे अशीच लावा की ज्यांची भरपूर सावली, प्राणवायू देऊन पर्यावरण संतुलित करण्यासाठी मदत होईल. हाच आजचा विवेक होय.

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान..
close