पंचमहाभूते हेच अन्न होय. अन्नापासून प्राण, म्हणजेच जीवाची उत्पत्ती होते. प्राणापासून मन तयार होते आणि मनातून सत्य निर्माण होते. जिवंतपणा जेथे आहे तेथेच मन असते. मनाला भावना असतात हेच सत्य होय.
सत्यापासून लोक तयार होतात. एखादा विचार/ सत्य मानणारे अनेकजण एकत्र आले म्हणजे समाज निर्माण होतो. आता हा समाज मानवाचा असायला पाहिजे असे काही नाही. पशुपक्षी, कीटक हे समुहाने राहतात, तो त्यांचा समाज. मुंगीला वाटते की पडलेले साखरेचे दाणे जमा करावेत. मग अनेक मुंग्या एकत्र येतात आणि साखरेचे दाणे घेऊन जातात. हे वागणे त्यांना योग्य म्हणजे सत्य वाटते अशा समुहाला लोक म्हणतात आणि मग लोक कर्मे करतात.
एकट्याने कर्मे होतील काय? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. कर्म करायला सोबत म्हणजेच एकाहून अधिक जीव एकत्र यावे लागतात. पावसाळ्यात दूर डोंगरात मी गुहेत एकटाच असताना तेथे एक वाघ आला.त्याने माझ्यावर हल्ला केला. म्हणजे एकाला दूसरा भेटला म्हणून कर्म झाले. केवळ एकटाच माणूस कुठेतरी बसला आहे, झोपला आहे,आराम करतोय हे काही कर्म समजू नये. अशाप्रकारे अनेकजण एकत्र येऊन जी बरी वाईट कामे करतात त्याला कर्म असे म्हटले जाते.
केलेल्या कर्माचे फळ हे मिळतेच. दाणे पेरले की त्याचे भरघोस उत्पादन काही कालावधीत मिळते हे त्या कर्माचे कर्मफल होय. आपण केलेले कर्म हे त्याचे फळ देण्यासाठी आपला पाठलाग करत असते. मात्र ते फळ कधी मिळेल हे आपल्या हातात नसते. तेव्हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून चांगले काम करणे म्हणजे पर्यावरणाचे संतुलन राखणे होय आणि वाईट काम करणे म्हणजे निसर्गाचा समतोल बिघडविणे.
सर्वसाधारणपणे नम्रतेने वागणे, थोरांचा आदर करणे, परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे, निसर्ग सुदृढ करण्यासाठी विविध प्रकारची झाडे लावून त्याची जोपासना करणे वन्य प्राणी, वन्यजीव, वनस्पती तसेच जलचर, जलसृष्टीची काळजी घेणे, त्याचा विध्वंस थांबवणे, प्रदूषण रोखणे ही सर्व कामे चांगल्या कर्मात येतात. वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

