shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवोदित खेळाडूंनी संधीवर पाणी सोडलं ; भारताच्या फसव्या तयारीचं पितळ उघडं पडलं..!!

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे श्रीलंका दौऱ्यात शब्दशःखरे ठरले. भारताचा प्रमुख खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी गेला असल्याने बीसीसीआयने श्रीलंकेचा वनडे व टि-२० मालिकांचा दौरा अचानक आयोजित केल्याने नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर सिध्द करण्याची संधी मिळाली. 

                         

कोहली, रोहीतच्या अनुपस्थितीत अनुभवी खेळाडू शिखर धवनकडे भारतीय संघाची कमान दिली तर युवा खेळाडू घडविण्याचा मसिहा म्हणून गणला गेलेला राहुल द्रविड या संघाचा प्रशिक्षक बनला. श्रीलंका दौऱ्यात प्रथम वनडे मालिका खेळविण्यात आली. इंग्लंड दौऱ्यात मानहानिकारक कामगिरी करून आलेल्या श्रीलंका संघाला भारताने अतिशय कमजोर लेखले होते. जगभरातील अनेक तज्ञांनी भारताला या दौऱ्यात ६-० असे निर्भेळ यश मिळेल असे ग्राह्य धरले होते.

                          


पहिल्या दोन वनडेत श्रीलंकेने भारतीय गोलंदाजांचा कुचिंबर करत मोठया धावा रचल्या तरी भारताच्या फलंदाजांनी जोरदार खेळ करत लंकेचे आक्रमण परतवले. वनडे मालिका २-० अशी खिशात पडल्यानंतर भारतीय संघाने पाच नवोदितांना तिसऱ्या सामन्यात संधी दिली खरी परंतु त्या संधीचा लाभ ते उठवू शकले नाही. मात्र लंकन खेळाडूंनी अनेक दिवसांपासून असलेला विजयाचा दुष्काळ थांबविला व भारताला पराभवाचा झटका दिला व ३-० असे निर्भेळ यश मिळविण्याचं भारताचं स्वप्न चिरडून टाकलं.

                             

तिसऱ्या वनडेतील पराभवाच्या चटक्याने भारतीय खेळाडू जागे झाले आणि पहिल्या टि-२० सामन्यात लंकेला पराभवाचा डोस देत मालिकेत आघाडी घेतली खरी, परंतु त्यानंतर कृणाल पांडयाला कोविड-१९ ने घेरलं आणि भारताच्या नशिबाचे फासे उलटे पडले. कृणालच्या संपर्कातील आठ प्रमुख खेळाडू नंतरच्या दोन्ही सामन्याला मुकले आणि तेथेच भारताचे सारे गणित चुकले.

                              

दुसऱ्या सामन्यात खेळायला भारताला अकरा निरोगी खेळाडू मिळविणं मुश्किल झाले. नाईलाजाने भारताला चार नवीन खेळाडूंना पदार्पण करावे लागले. यामध्ये तीन फलंदाज ऋतूराज गायकवाड, देवदत्त पडीक्कल, नितिश राणा व चेतन सकारीया या गोलंदाजाचा समावेश होता. संघात जेमतेम पाचच फलंदाज असल्याने या खेळाडूंच्या खेळात भिती युक्त दडपण दिसले. त्याचा परिणाम भारताच्या धावा १३२ वरच अडकल्या. याचे प्रमुख कारण म्हणजे श्रीलंकन फिरकी गोलंदाजांचा अचूक मारा, चिवट फलंदाजी हे होते. तर भारताचे गचाळ क्षेत्ररक्षण, धवनचे कल्पनाशुन्य नेतृत्व हे होते. भारताचे दुर्देव इथेच थांबले नाही तर गोलंदाज नवदिप सैनी जखमी झाल्याने संघाच्या अडचणीत आणखी भर पडली.

                             

लगोलग दुसऱ्या दिवशी होणाऱ्या निर्णायक सामन्यात भारत झालेल्या चुकांची दुरुस्ती करेल असे वाटले होते. परंतु झाले अगदी उलटे. या सामन्यात भारताला नेट गोलंदाज म्हणून संघा सोबत असलेल्या संदिप वॉरियरला संधी देऊन अंतिम अकरा जणांचा कोरम पुरा करावा लागला.

                             

सामन्याच्या पहिल्याच षटकात कर्णधार शिखर धवन परतला तर ३६ धावा होईपर्यंत प्रमुख पाच फलंदाज धवन शुन्य, पडिक्कल ९, सॅमसन शुन्य, ऋतूराज गायकवाड १४ व नितेश राणा ६ बेजबाबदार खेळ करून श्रीलंकन फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात फसले. भुवनेश्वर १६ व कुलदिप या नाबाद सर्वोच्च २३ धावांमुळे भारताला ८१ धावा उभ्या करता आल्या व टि२० तील निच्चांकी धावा फलकावर लागण्याची नामुष्की टळली.

                               

या सामन्यातील खेळावरून शिखर धवनची टि -२० कारकिर्द संपल्यात जमा झाली. तर संजू सॅमसनचे दुकान बंद होणार हे नक्की. तसेच पडीक्कल, ऋतूराज व राणा यांना अजून खूप काही शिकायचे असल्याचे सिद्ध झाले. त्याचबरोबर प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड अजून परिपक्व नसल्याचे उघड झाल्याने रवी शास्त्रीला शह म्हणून द्रविडला पुढे करणाऱ्यांचे दात त्यांच्या घशात गेले.

                             

भारताचे फलंदाज सेना देशांत जलदगती माऱ्यापुढे जगजाहीर असताना फिरकी गोलंदाजी खेळताना होणारी त्यांची फजिती चव्हाट्यावर आल्याने भारताची बेंच स्ट्रेंग्थ मजबूत असल्याचा गवगवा करणाऱ्यांना तोंडघशी पडायची वेळ आली आहे. 

                              

टि-२० मालिकेत झालेल्या पराभवाने भारताचे सलग ८ मालिका जिंकण्याची मोहीम खंडीत झाली असून भारताचे अनेक कमजोर दुवे उघडे पडले आहेत. त्यावर तातडीने काम करावे लागणार आहे.


लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

close