विनया मेढेकर । रायगड :-
कोरोनावरील उपचारासाठी अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील कोविड सेंटरमध्ये दाखल असलेला जिल्हा कारागृहातील कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवा मारुती दगडे (वय 24) असे पळून केलेल्या कैद्याचे नाव आहे.तिथून त्याने पलायन केल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
12 जुलै रोजी अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील 68 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. या सर्व कैद्यांना नेहुली येथील क्रीडा संकुलात उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामध्ये देवा दगडे याचाही समावेश होता.मात्र देवा दगडे याने कोविड सेंटरमधून पलायन केल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी (20 जुलै) मध्यरात्री खिडकीचे गज कापून तो पळून गेला. या घटनेने प्रशासनासह पोलिसांची झोप उडाली आहे. पळून गेलेला देवा दगडे हा पोक्सोच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. या बाबत कोणासही माहिती मिळाल्यास अलिबाग पोलीस ठाण्याला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, अलिबाग पोलीस या फरार कैद्याचा शोध घेत आहेत.

