धन्य-धन्य हा नरदेहो।
येथील अपूर्वता पाहो।
जो जो की जे परमार्थ लाहो।
तो तो पावे सिद्धीते
समर्थ रामदास...
पर्यावरण जनजागरण उपक्रमासंदर्भात एका शेतकऱ्याने मला समर्थ रामदास स्वामींचे पर्यावरण विषयक विचार ऐकवले आणि मी चकितच झालो. त्याने प्रथम मला असे सांगितले की जे पीक येते ते कसे येते? तर जमिनीमध्ये जीवाणू असतात कृमी कीटक हे सर्व असतात आणि ते मुळांना अन्न बनवून देतात आणि मग मुळे ते अन्न शोषतात आणि त्यातून पीक उत्तम येते.
मी म्हटले कसे तर त्याने थोडक्यात सांगितले की तुम्ही गोमूत्र, शेणखत गांडूळ खत कशासाठी वापरता? गांडूळ खताने भूमीमध्ये पोकळी निर्माण होते आणि त्यात असंख्य जिवाणू तयार होतात. शेणखतात प्रचंड प्रमाणात जिवाणू असतात. या पुढे जाऊन त्यांनी असेही सांगितले की परमेश्वर कृपेने आपल्याला हा मानव देह मिळालेला आहे आणि त्याची थोरवी ही अपूर्व आहे. पण त्याचा वापर जर परमार्थासाठी तुम्ही केलात तर तुम्हाला जगाचे भले करणे सहज शक्य आहे. आणि तसे नाही वागलात तर ?. सारेच व्यर्थ!
शेवटी शरीरामध्ये काय आहे तर जे तुम्ही अन्न खाता त्याची विष्ठा होते, अन्नरस होतात. अखेरीस चांगले अन्नरस निर्माण व्हावेत यासाठी चांगले आचरण आणि सात्विक खाणे गरजेचे जसे असते तसेच शेतीचे आहे. पण विधिनिषेध सोडून आपण काहीही खाल्ले तर आपले शरीर हे देखील एक जंतूंचे कोठार होऊन जाते.
जसे आपल्या राहत्या घरामध्ये अस्वच्छता असेल तर घुशी, उंदीर , पाली, मुंगळे, ढेकूण, मांजरे, आळ्या वस्तीला असतात. यासाठी जशी देहाची काळजी घ्यायची तशीच घराची देखील काळजी घेणे गरजेचे असते. पर्यावरणासंदर्भात या शेतकऱ्याने दिलेले ज्ञान हे लाख मोलाचे होते.
झाडे नक्की लावावी कुठली? आता आपण अलीकडे म्हणतो की आम्ही फळझाडे लावली तर माकडे येऊन त्याचा विध्वंस करतात. पण आम्ही फळझाडे लावली की माकडे का येतात? तर आपण जंगलातील वनस्पती तोडल्या आणि वन्यजीवांची आश्रयस्थाने नष्ट केली. तेव्हा पोट भरण्यासाठी जंगलातुन माकडे शहराकडे आली. जर जंगलात जाऊन आपण फळझाडे लावली, औषधी वृक्ष लावले तर त्यांचा उदरनिर्वाह जंगलातच होईल आणि मग गावात लावलेल्या फळ झाडांकडे माकडे,डुकरे येणारच नाहीत. तर हे असे आहे समर्थांचे पर्यावरण विषयक चिंतन! जेवढे आपण चिंतन करू तेवढा उपदेश अधिक मिळत जातो. आज ही वेळ आलेली आहे की संत वांग्ड्मयाचे पर्यावरण विषयक चिंतन करणे आणि समाजाला ते समजवून देणे ही प्रत्येकाचे एक कर्तव्य होऊन बसलेले आहे.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान..!

