येवला । प्रतिनिधी :-
येवल्याचे कलाशिक्षक व प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट संतोष राऊळ सर यांची वोसप आर्ट फॉर्म हार्ट या दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत जगातील 23 देशातून अंतिम फेरीत निवड झाली.
सदर स्पर्धेसाठी डिसॅबिलिटी म्हणजेच दिव्यांग हा विषय असून या स्पर्धेत 23 देशातून लाखो कलाकारांनी आपला सहभाग नोंदविला होता.तसेच रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेतही राज्यात तृतीय क्रमांक मिळविल्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तसेच येवला, लासलगाव मतदार संघाचे आमदार मा. छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आला.
सदर स्पर्धा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. या आधीही राऊळ सर यांना राज्यस्तरीय अनेक पारितोषिक चित्रकला स्पर्धांमधून मिळाले आहेत.संतोष राऊळ यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल भुजबळ साहेबांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास मा. छगन भुजबळ साहेबांबरोबरच त्यांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे साहेब, येवला राष्ट्रवादी शहराध्यक्ष दिपक लोणारी, उपाध्यक्ष गोटू मांजरे व येवला राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

