shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी देशाची इज्जत मातीमोल केली

सन १९८२ मध्ये कसोटीचा अधिकृत दर्जा मिळाल्यानंतर श्रीलंकन क्रिकेटने अल्पावधीतच आपल्या दर्जेदार खेळाने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. जेमतेम १४ वर्षांच्या अत्यल्प अनुभवानंतरही त्यांनी विश्वविजेते बनण्याचं अवघड स्वप्न सत्यात उतरवलं. त्याला एक महत्वाचं कारण होते ते म्हणजे त्यांच्याकडे असलेले जिगरबाज क्रिकेटपटू व त्यांच्या अंगी असलेली कडवी शिस्त !
    
                   
जागतिक क्रिकेटला अद्वितीय खेळाडू देण्याची परंपरा  पदार्पणातच दोन्ही डावात शतक ठोकणाऱ्या क्रिकेटपटू दुलिप मेंडीस पासून सुरू होते. श्रीलंका क्रिकेटने दुलिप मेंडीस, रॉय डायस, अरविंदा डिसिल्व्हा, अर्जुना रणतुंगा, सनथ जयसुर्या, मुथय्या मुरलीधरन, रोशन महानामा, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, लसिथ मलिंगा, दिलशान तिलकरत्ने, रुमेश रत्नायके, ब्रेंडन कुरुप्पु तसेच इतरही काही गुणवान खेळाडू जागतिक क्रिकेटला दिले.
                        
अर्जुन रणतुंगाने श्रीलंकेला सन १९९६ मध्ये विश्वविजेता बनविल्यानंतर श्रीलंकेची जागतिक स्तरावर एक प्रबळ संघ म्हणून ओळख निर्माण केली. सन २०१४ पर्यंत त्यांनी तीनदा वनडे विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. चँपियन्स करंडक व टि२० विश्वचषक स्पर्धाही एक एकदा जिंकली.
                         
एवढं मोठं यश मिळवून देणारे खेळाडू एका मागून एक निवृत्त झाल्या नंतर नव्या पिढीच्या खेळाडूंना तो डामडौल टिकवून ठेवता आला नाही. श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळातही स्थैर्य नसणे. सतत होणारा राजकीय हस्तक्षेप, खेळाडूंकडून वेळोवेळी होणारे बंड यामुळे श्रीलंकन क्रिकेटला उतरती कळा लागली.
                          
जागतिक क्रिकेट मध्ये खेळल्या जाणाऱ्या वन डे, टि-२० व कसोटी या तिनही प्रकारात मागील सात वर्ष श्रीलंका संघ इतर सर्व देशांच्या तुलनेत सर्वच बाबतीत पिछाडीवर आहे. सर्वाधिक सामने हारणे, सर्वाधिक धावा देणे, सर्वाधिक चौकार - षटकार खाणे, सर्वात जास्त बळी गमावणे.आयसीसी मानांकनात तळ गाठणे या गोष्टी त्यांच्या वाट्याला आल्या आहेत. इतकेच नाही तर येत्या ऑक्टोबर -नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टि-२० विश्वचषक स्पर्धेत पात्र होण्यासाठी पात्रता फेरी खेळण्याची नामुष्कीही त्यांच्यावर आली आहे.
                            
एवढी कामगिरी खालावली असूनही श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना देऊ केलेल्या मानधनाच्या विरोधात खेळाडूंनी बंड उभारले होते. जोपर्यंत श्रीलंका क्रिकेट बोर्ड त्यांना अपेक्षित मानधन देत नाहीत तोपर्यत सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास खेळाडूंनी नकार दिला होता. परंतु श्रीलंकन क्रिकेट मंडळाच्या कणखर भूमिकेपुढे खेळाडूंना नमते घ्यावे लागले व इंग्लंड दौऱ्यासाठी खेळाडू गेले खरे परंतु त्यांनी तेथे वेगळेच गुण उधळून श्रीलंकेच्या इज्जतीचे लक्तरे जगाच्या वेशीवर टांगले.
                          
सध्या सर्व जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वच देशांसमोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व सुविधा युक्त जैविक सुरक्षा कच ( बायो बबल ) मध्ये खेळाडूंना ठेवले जाते. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेला श्रीलंकेचा संघही बायो बबलमध्ये आहे.
                            
या दौऱ्यातही श्रीलंकेच्या गचाळ खेळाचा प्रताप सुरूच आहे. तीन टि २० सामन्यांची मालिका गमावल्यानंतर शेवटच्या सामन्यानंतर श्रीलंकेचे सर्व खेळाडू आपापल्या रुमवर आराम करत असताना संघाचा उपकर्णधार कुशल मेंडिस, यष्टीरक्षक निरोशन डिकवेला व मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज धनुष्का गुणतिलके बायो बबलचे नियम तोडून रात्री दोन वाजता डरहॅम शहरातील रस्त्यांवर सिगारेट पित भटकत होते. त्याच्या चित्रफीत तेथील काही लोकांनी बनविल्या व सोशल मिडीयावर व्हायरल केल्या. त्यानंतर या तिघांचीही इंग्लंड मधून हकालपट्टी करण्यात आली. यावर श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही कडक पावलं उचलून या तिघांनाही एक वर्षासाठी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली.
                              
या तीन मुजोर खेळाडूंमुळे इतर खेळाडूंच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट मंडळाने घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल. पण एक गोष्ट नाकारता येणार नाही, ती म्हणजे या प्रकरणा नंतर श्रीलंकेची सर्व जगभर नाचक्की झाली.

      लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close