सन १९९६ मध्ये काहीशा कमजोर समजले जाणाऱ्या श्रीलंका क्रिकेट संघाला विश्वविजेते बनविणारा कर्णधार व क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर राजकारणात गेलेल्या अर्जुना रणतुंगाची जिभ जरा जास्तच घसरली. ज्या भारतीय क्रिकेट बोर्डाने श्रीलंकन क्रिकेटला मदतीचा हात पुढे केला त्याच भारतीय संघावर अपमानास्पद वार रणुतंगाने केला आहे. श्रीलंकेत सध्या रणतुंगाच्या विरोधी पक्षाचे सरकार आहे व श्रीलंका क्रिकेट बोर्डावर श्रीलंका सरकारचे वर्चस्व असल्यामुळे राजकीय लालसेपोटी रणुतंगाने आपले वाकबाण सोडले, परंतु सध्या ते त्याच्यावरच उलटल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या श्रीलंका क्रिकेट एका विचित्र संक्रमणातून जात असून ना त्यांचा संघ चांगला खेळत आहे ना त्यांच्या क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती भक्कम आहे. आजमितीला श्रीलंकेचा संघ क्रिकेटचे तिनही प्रारूपे वनडे, टि-२० व कसोटीच्या मानांकनात तळाला असून त्यांच्या प्रमुख खेळाडूंनी क्रिकेट बोर्डा विरोधात बंडाचे निशाण फडकविले आहे. तसेच जे खेळाडू त्यांच्या कडे उपलब्ध आहेत त्यांचेही वर्तन लज्जास्पद असून त्यामुळे संपूर्ण श्रीलंकेला शरमेने मान खाली घालावी लागली आहे.
सध्या श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. मैदानात इंग्लंडने त्यांची नाकाबंदी केली असताना त्यांचे तीन खेळाडू बायो बबल तोडून बाहेर मजा मारत फिरताना पकडले. नंतर त्यांना इंग्लंडमधून तडीपार केले व मायदेशी परतल्यावर श्रीलंका क्रिकेटने त्यांना एक वर्षासाठी निलंबीत केले. ही बाब ताजी असताना श्रीलंकेचा बुजूर्ग क्रिकेटर अर्जुना रणतुंगाने श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाविषयी अभद्र वक्तव्य करून आपली लायकी स्वतःच बाहेर काढली. भारताच्या संघाला दुय्यम दर्जाचा ठरवून या भारतीय संघाचा दौरा आयोजित करण्यास लाज वाटते असे त्याने म्हंटले आहे.
वास्तविक पाहता भारताचा संघ विश्व कसोटी अजिंक्यपद फायनल व इंग्लंडविरूध्द पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडला गेला आहे. विश्व कसोटी अंतिम सामन्यानंतर इंग्लंडविरूध्दच्या मालिकेला ४३ दिवसांचा अवधी आहे. परंतु कोविड -१९ मुळे प्रत्येक देशाचे कॉरंटाईन नियम वेगळे असल्याने भारताचा संघ मायदेशी येणे, श्रीलंका येथे जाणे व परत इंग्लंडला जाणे परवडणारे नव्हते. त्यातच बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या विनंतीवरून श्रीलंकेला वनडे व टि-२० मालिकेसाठी संघ पाठविण्याचे निश्चित केले.
आगामी टि-२० विश्वकप लक्षात घेता इंग्लंड दौऱ्यावर न गेलेल्या खेळाडूंना प्रत्यक्ष सामन्यांचा अनुभव यावा व श्रीलंका क्रिकेटची सध्या असलेली बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला अर्थार्जन व्हावे या उद्देशाने आपला संघ पाठविला. या विस जणांच्या संघात १४ खेळाडू असे आहेत की, ज्यांनी वनडे, टि-२० व कसोटी यापैकी कमीत कमी एका प्रारूपात तरी भारताचं आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. शिवाय कसोटी, वनडे व टि-२० हे आयससीचे मान्यताप्राप्त वेगवेगळे प्रारूप असताना त्यासाठी पाठविलेले संघ आपोआप आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठरतात.
तरीही अर्जुना रणतुंगाने भारतीय खेळाडूंना दुय्यम दर्जाचे ठरविले. भारताच्या यातीलच काही खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करताना ऑस्ट्रेलियात दणदणीत विजय मिळविला होता हे रणतुंगा विसरला वाटतं. वास्तविक बघता श्रीलंकेचा आजचा संघ भारताच्या या संघाला हरविण्याच्या लायकीचाही नाही. त्यामुळे रणतुंगाने भारतीय संघाला नव्हे तर श्रीलंका बोर्डाला टारगेट करायला हवे होते.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक विशेष निवेदन जारी करून या दौऱ्यावरील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची माहीती जाहीर करून बेताल रणतुंगाला घरचा दिला. उलट रणतुंगाने संकटमय स्थितीत श्रीलंका क्रिकेट बोर्डाची मदत केल्या बद्दल बीसीसीआयचे आभार मानायला हवे होते. परंतु एवढी नैतिकता दाखविण्या एवढीही अक्कल नसल्याबद्दल या विश्व विजेत्या कर्णधाराची किव सुध्द करावीशी वाटत नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

