पर्यावरण जनजागरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे हवा. हवेचे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणामध्ये झालं की ओझोनची कमतरता जाणवते. हवेचे प्रदूषण म्हणजे मानवी जीवनाचे प्रदूषण होय. कारण हवेशिवाय माणूस जगूच शकत नाही. दूषित हवा वनस्पतींना दूषित करते. मानवी जीवांना, वन्यजीवांना दूषित करते, वनस्पतींना म्हणजे सर्व विश्वाला दूषित करायचं काम हे केवळ हवा प्रदूषणामुळे होते.
पण एवढा महत्त्वाचा विषय असून देखील किंवा वायू प्रदूषण हा एवढा मोठा शत्रू असून देखील आम्ही दररोज वायू प्रदूषण करायला पुढेमागे पहात नाही. वायू प्रदूषणाचा दुष्परिणाम केवळ जीवंत माणसावरच होते का! तर नाही. निर्जीव वस्तूंवर देखील प्रदूषित वायूचा परिणाम होतोच. म्हणजे कोरड्या हवेत लोखंड जितके गंजेल त्यापेक्षा दमट हवेत जास्त गंजते.
रसायने निर्माण करणाऱ्या कंपन्यांमधील वाहने, लोखंडी वस्तू, झाडे कमी वेळात खराब होतात. आपण औद्योगिक क्रांतीच्या मागे लागलो आणि गावच्या कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडू लागलो. मोठ्या प्रमाणात विषारी वायू आणि घनकण धुरांड्यातून सोडू लागलो. यामुळे मोठ्या प्रमाणात घातक खनिजे आणि वायू जनतेच्या घशांपर्यंत पोहोचले आणि असाध्य रोगाचे बळी ठरले ते तेथील सामान्य नागरिक.
Bपूर्वी धूम्रपान हे फारच प्रतिष्ठित समजले जायचे आणि अनेक लोकनेते, समाज प्रतिनिधी खुलेआम सिगरेट ओढून हवा प्रदूषित करत. तोच सिगरेटचा धूर आपल्या आप्तस्वकीय, नातेवाईकांच्या फुप्फुसांपर्यंत पोचवत होते.
आता त्यावर थोडेसे बंधन आलेले आहे. ज्वलनासाठी लाकडांच्या वापरातून कार्बन-डाय-ऑक्साइड बाहेर पडतो. त्यामुळे वनसंपदाही कमी होते. वाहनाच्या इंधनाच्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू बाहेर पडतो. वाहना चालवत असताना समोरच्या गाडीच्या धुरामार्फत तो आपल्या माणसाच्या तोंडामध्ये जातो. ठाणे बेलापूर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात रसायने तयार होत होती तेव्हा त्या भागात श्वास घेणेही अवघड होते. आज संपूर्ण रसायन उद्योगामुळे कोकणपट्टीत वायु प्रदूषण वाढले आहे आणि तेथील रहिवासी अनेक रोगांचे बळी ठरलेले आहेत. रसायने जसे की फार्मलडेहाईल, ऍसिटिक ऍसिड, बेंझीन, नायट्रोक्लोरोबेंझीन अशी अतिघातक रसायने जेव्हा टाकीत साठवली जातात तेव्हा त्यांच्या विषारी वाफा वातावरणात जातात. यातून रक्ताच्या कर्करोगासारखे रोग होतात.
हे आपण कशासाठी करतोय याचा विचार आपण मानवी हिताच्या दृष्टीने करायलाच तयार नाही. आता शिक्षणाचा जरी विचार केला तरी मुलांना बालपणापासून शुद्ध हवा कशी मिळवावी याचे शिक्षण देखील आपण देऊ शकत नाही. आणि कायद्याचा विचार केला तर प्रदूषण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कशी कारवाई करावी याबाबत अज्ञानच आहे. खुद्द प्रदूषण नियंत्रण यंत्रणा याकडे डोळेझाक करत वागताना दिसते. कारखान्यातील प्रदूषित पाण्यामुळे आणि हवेमुळे प्रचंड प्रमाणात गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरणाचे नुकसान झालेले आहे त्याला जबाबदार संबंधित यंत्रणांना धरण्याची मानसिकता आपल्याकडे नाही. केवळ वनविभागाने कोटी कोटी वृक्ष लावावे आणि झाडांनी आम्हाला ऑक्सिजन द्यावा तेवढ्यापुरते पर्यावरण रक्षण काय कामाचे?
अनेक वृक्ष असे आहेत की ते वातावरणातील दूषित हवा शुद्ध करतात. असे लाखो वृक्ष जगवायला हवेत. यासाठी सामान्य माणसाला पर्यावरण साक्षरता शिकवायला हवी.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
चित्र- आंतरजालावरून साभार
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

