अहमदनगर: अहमदनगर जिल्हा न्यायालय आणि जिल्हा मुख्यालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये येत्या रविवारी (दिनांक ०१ ऑगस्ट,२०२१) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करून अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होऊन न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. सुधाकर यार्लगड्डा यांनी केले आहे. ही लोकअदालत आभासी पध्दतीद्वारे देखील आयोजित करण्यात आली आहे,
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे सुचेननुसार आयोजित या राष्ट्रीय लोकदालतीमध्ये दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. सदरचे लोकअदालत आभासी पध्दतीद्वारे देखील आयोजित करण्यात आलेले आहे, त्यानुसार बरीच प्रकरणे आभासी पध्दतीने हाताळण्यात येतील, तसेच प्रत्यक्ष उपस्थित होणा-या लोकअदालतमध्ये देखील ब-याच पक्षकारांना उपस्थित राहण्याबाबत आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे.
अहमदनगर जिल्हा मुख्यालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्टची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे,मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायदयाखालील प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायदयाखालील प्रकरणे, कौटुंबीक वादांची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी ॲक्टची समजोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. पक्षकारांनी परस्पर आपसी समझोत्याकरिता ठेवून ती सामंजस्याने सोडवण्याबाबतचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.रेवती देशपांडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरीकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

