shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण(५१): शुक्रनीति..!



शुक्रनीति हा ग्रंथ शुक्राचार्यांनी लिहिलेला असून यामध्ये गावाजवळ आणि वनामध्ये कोणती झाडे लावावीत याबाबत उल्लेख आढळतात. या ग्रंथाचे एक हजार श्लोक आहेत. हल्ली बरेचदा वन्यपशू, माकडे यांचा उपद्रव शहरे, गावे यांना होत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे पशुपक्ष्यांची अन्नसाखळी तुटलेली आहे. याचा अर्थ पर्यावरणाचे असंतुलन झालेले आहे. जर जंगले भरगच्च असतील तर वन्यप्राण्यांना जंगलामध्ये भरपूर अन्न मिळते. वनातील फळे, पाने, गवत, फुले खाऊन शाकाहारी पशूंची भूक भागते.

त्यांचेवर मांसाहारी प्राणी आपली उपजीविका करतात. याच बरोबर वनात फळे-फुले येतात तेव्हा मधमाशा आणि तत्सम कीटक, पक्षी यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात परागीकरण होते. ते रानात स्वच्छंद विहार करतात. त्यांना जंगलामध्ये आवश्यक ते खाद्य उपलब्ध करून देणे ही मानवाची जबाबदारी आहे. त्यासाठी वनामध्ये विशिष्ट प्रकारची झाडे लावावी याचा विचार आपल्या थोर ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी केलेला आहे.
गावामध्ये विशिष्ट प्रकारची झाडे लावली तर त्यापासून आर्थिक फायदा मिळतो व गाव समृद्ध होते. याचा विचार करून शुक्राचार्यांनी गावाबाहेर लावायची झाडे कोणती आणि वनात लावायची झाडे कोणती त्याची विभागणी केली आहे. जेणेकरून गावातील लोकांची आणि वन्यप्राण्यांची देखील अन्नसाखळी अबाधित राहील.
गावात लावायची झाडे:
उंबर, अश्वत्थ, वड, चिंच, चंदन, जांभूळ, कदंब, अशोक, बकुळ, बेल, आम्रतक (अंबाडा), कवठ, चारोळी, आंबा, कपित्थ, राजदन,  ऊंडी तुती कोकम सोनचाफा, कदंब, हिंदी पाईन डाळिंब अक्रोड, बेहडा, शिसम, शेवगा, बोर, ईडलिंबू, क्षिरीका, खजूर, देवकरंज, काकोडउंबर, तमालपत्र, सिंबला, कांचन, रायआवळा, मोठा आवळा, सुपारी, महाळुंग, 

वनामध्ये लावायची झाडे:
खैर, आपटा, साग, अग्निमंथ, टेटू, बाभूळ, तमालपत्र, साल, कुडा, धावडा, अर्जुन, पळस, सप्तपर्णी, शमी, देवदार, हेंकळ, करवंद, हिंगणबेट, भूर्जपत्र, कुचला, करिर, साल, पाटला, तिंदूक, बिजपुरक, हरितकी, भल्लात, शम्पाक, अर्क, पुष्कर, आरिमेद, पितद्रु, शाल्मली, विभीतक,नरवेलो, मधुक.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
#पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close