shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्राच्या राजकारणातील व समाजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आमदार गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड.

महाराष्ट्राच्या राजकारणातील व समाजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आमदार गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड.
इंदापूर प्रतिनिधी: (३१ जुलै २०२१)शेकापचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांनी शुक्रवारी सव्वानऊच्या सुमारास सोलापूरच्या खाजगी दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.

 *ऋषितुल्य नेतृत्व म्हणजे आमदार गणपतराव देशमुख.* 
गणपतराव देशमुख यांचे मूळ गाव मोहोळ तालुक्यातील पेणूर. वकिली करण्यासाठी ते सांगोल्यात आले. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात सुरू होती. सांगोला तालुक्यात भूमिगत राहून पत्रके वाटण्याचे काम त्यांनी केले. संपूर्ण तालुक्यावर काँग्रेसचा एकछत्री अंमल होता. अशातच निवडणुका लागल्या. राऊत नावाचे विद्यमान आमदार होते. त्यांच्या विरोधात कुणी उभे राहायचे हा प्रश्न होता. उभे राहायचे म्हणजे हमखास पडायचेच होते. पडायचेच आहे, तर गणपतराव देशमुख यांना उभे करूया, असे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या एका बैठकीत ठरले आणि गणपतराव देशमुख विधानसभेचे उमेदवार बनले.

पांढरा शर्ट, पांढरी पँट, हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधर्म्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल्यानंतर या माणसाने विधानसभेच्या अकरा निवडणुका जिंकल्यात, यावर विश्वास बसत नाही. कारण आमदाराची आजच्या काळातील प्रतिमा खूप वेगळी आहे. राजकारणही खूप झपाटय़ानं बदलतंय. माणसांची मनं आणि मतं बदल आहेत. परंतु या काळात  गणपतराव देशमुख  बदलले नाहीत .

ज्या तालुक्यात कापसाचे बोंडही उगवत नाही, तिथे देशमुखांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली दोन सूतगिरण्या यशस्वीपणे चालवल्या. आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट सहकारी सूतगिरणी म्हणून सांगोल्याच्या सूतगिरणीची दीर्घकाळ ओळख राहिली. सांगोला तालुक्याच्या दुष्काळ निवारणासाठी त्यांनी खूप महत्त्वाचे काम केले. 

देशमुख हे आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार होते. शेतकरी कामगार पक्षाची संपूर्ण राज्यात वाताहत झाली असताना यांनी मात्र भलत्या तडजोडी केल्या नाहीत. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा हातात धरूनच मतदारसंघही टिकवला. निष्ठा, चारित्र्य, सचोटी या बाबी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, परंतु मतदारांवरही त्याचे संस्कार केले. म्हणूनच मतदारसंघातील तिसऱ्या पिढीनेही त्यांना मतदान केले.
close